Tarun Bharat

यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे 22 जानेवारीला अनावरण

अध्यक्ष बजरंग पाटील व उपाध्यक्ष सतीश पाटील यांची माहिती


शरद पवार यांच्या हस्ते होणार अनावरण

प्रतिनिधी / कोल्हापूर

देशाचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा पुर्णाकृती पुतळा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात राजर्षी शाहू सभागृहासमोर उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते 22 जानेवारीला करण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम नियोजित केला असून 3 ते 4 हजार नागरीक या कार्यक्रमास उपस्थित राहतील असा अंदाज आहे. त्यानुसार या कार्यक्रमाचे ठिकाण लवकरच निश्चित केले जाणार आहे, अशी माहिती जि.प.चे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांतून लोकप्रतिनिधींना सतत प्रेरणा मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या परिसरात त्यांचा पुर्णाकृती पुतळा उभा करावा, म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱयांनी पुढाकार घेतला होता. 1986 साली स्थापना स्थापन झालेल्या प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱयांनी यशवंतराव चव्हाण यांचा 9.5 फूट उंचीचा ब्राँझचा पुर्णाकृती पुतळा तयार केला असून जिल्हा परिषदेने दहा लाख रूपयांचा चबुतरा उभा करून दिला आहे.

उपाध्यक्ष पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राजची स्थापना करुन सत्तेचे विकेंदीकरण केले. ग्रामीण विकासाला चालना दिली. शिवाय नव्या नेतृत्वाला संधी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करणाऱया लोकप्रतिनिधींना त्यांच्या कार्यापासून स्फूर्ती मिळावी हा उद्दात्त हेतू असून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी राजर्षी शाहू सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोरील जागा यासाठी सुचविली. या ठिकाणी हा पुतळा उभारल्यामुळे सदस्याना कायम प्रेरणा मिळत राहील. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विजयसिंह पाटील, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, राजेश पाटील, अशोक पोवार, रमेश मोरे आदी उपस्थित होते.

राज्यातील कोणत्याही जिल्हा परिषदेच्या प्रांगणात असा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आलेला नाही. पचांयत राज व्यवस्थेबाबत आग्रही असणाऱया यशवंतराव चव्हाण यांना ही एक आदरांजली ठरणार आहे. अशा भावना यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठान कोल्हापूरच्या पदाधिकारी तसेच बांधकाम व्यावसायीक व्ही.बी.पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

चव्हाण साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाबद्दल अभिमानाने सांगेल

यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा उभारण्याची कल्पना, स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे, भिकशेट पाटील, एम. के. जाधव, रशिदभाई शहा, एस.आर.पाटील, बळीराम पोवार आणि माझ्यासह आणखी कांही कार्यकर्त्यांची होती. यापैकी अनेकजण आता हयात नाहीत. पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर जरी माझे देहावसन झाले, तरी मी माझ्या सर्व मित्रांना चव्हाण साहेबांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याबद्दल अभिमानाने सांगेल असे भावनिक उद्गार यशवंतराव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विजयसिंह पाटील यांनी काढले.

       40 रूग्णवाहिकांचे लोकार्पण

सतीश पाटील म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शासनाकडून जिह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये 40 रूग्णवाहिकांसाठी 5.80 कोटी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची सोय उपलब्ध होणार आहे. या रूग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळाही यावेळी केला जाणार आहे.

पवार यांच्या हस्ते चौथ्या मजल्याचेही उद्घाटन व्हावे अशी इच्छा

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जि.प.च्या चौथ्या मजल्यासाठी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या हस्ते या मजल्याच्या बांधकामाचे उद्घाटन व्हावे अशी आमची इच्छा आहे, असेही उपाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

पुतळ्याची तांत्रीक माहिती वजन – एक टन

उंची- 9.5 फुट
पाया- 3.5 फुट
धातू- ब्रांझ
किमत 15 लाख रूपये
कारागिरी- संजय तडसकर कोल्हापूर

       

Related Stories

सद्यस्थितीला धोका पातळीची स्थिती नाही, पण कोणत्याही क्षणी परिस्थिती बदलू शकते

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची असंमती

Archana Banage

वारणा साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक गोविंदराव जाधव यांचे निधन

Archana Banage

कोल्हापुरातील फॉरेन्सिक लॅब राज्यात अव्वल ठरावी : सतेज पाटील

Archana Banage

कोल्हापूरला येणारच, हिम्मत असेल तर अडवून दाखवा, किरीट सोमय्यांचं राष्ट्रवादीला आव्हान

Archana Banage

संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या अडचणीत वाढ, शिवसेनेने केली ‘ही’ घोषणा

Archana Banage