Tarun Bharat

यशस्वी मध्यस्थीनंतर कमांडोची सुटका

सहा दिवस होता नक्षलींच्या ताब्यात : जम्मूमधील निवासस्थानी आनंदाला उधाण

वृत्तसंस्था / विजापूर

चकमकीनंतर नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडलेल्या सुरक्षा कमांडो राकेश्वर सिंह मनहास यांची अखेर सहा दिवसांनंतर सुरक्षितपणे सुटका झाली आहे. राकेश्वर सिंहला रुग्णवाहिकेतून

 गुरुवारी सायंकाळी विजापूर येथे आणण्यात आले आहे. त्यांच्या सुटकेनंतर कुटुंबीयांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. यशस्वी सुटकेनंतर राकेश्वर सिंह यांच्या पत्नीने मध्यस्थांचे पथक, प्रसारमाध्यम प्रतिनिधींसह सरकारचे आभार मानले.

विजापूर येथे झालेल्या चकमकीनंतर कोब्रा बटालियनचा सुरक्षा कमांडो राकेश्वर मनहास यांचे 3 एप्रिल रोजी नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर 6 दिवसांनी त्यांना सोडले. त्यांना सरकारने गठीत केलेल्या 2 सदस्यीय मध्यस्थ पथकाच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. पद्मश्री धर्मपाल सैनी व गोंडवाना समाज अध्यक्ष तेलम बोरैया हे या मध्यस्थांच्या पथकात होते.

…आता मी समाधानी : पत्नी

कोब्रा कमांडोजच्या सुटकेची बातमी समजताच जम्मूमधील त्यांच्या घरात आणि कुटुंबात आनंदाची लाट पसरली. यावेळी परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने कमांडोच्या घरी जमा झाले होते. यावेळी आनंदाने नाचण्याबरोबरच मिठाईचे वाटपही करण्यात आले. प्रत्येकाच्या चेहऱयावर हास्य पसरलेले दिसत होते. कमांडोची पत्नी मीनू मनहास हिनेही आनंद व्यक्त केला आहे. “ज्यांनी माझ्या पतीची सुरक्षित सुटका केली आहे, त्यांचे मी आभार मानते. हा अविस्मरणीय क्षण मी कधीही विसरणार नाही’ असे ती म्हणाली. तसेच पती बेपत्ता झाल्याची वार्ता कानी पडलेला रविवारचा दिवस मी कधीही विसरणार नाही. अशा कठीण काळात माझ्या कुटुंबाचे मला खूप मोठे पाठबळ मिळाले, असेही तिने पुढे स्पष्ट केले. तसेच पती सुरक्षित सुटल्यानंतर मी आता पूर्णपणे समाधानी असल्याचे तिने सांगितले.

बिनशर्त सुटका की अटींची पूर्तता?

नक्षलवाद्यांनी पद्मश्री धर्मपाल सैनी, गोंडवाना समाज अध्यक्ष तेलम बोरैया या सरकारद्वारे गठीत करण्यात आलेल्या दोन सदस्यांसह शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत कमांडोची सुटका झाली आहे. मात्र, या सुटकेसाठी नक्षलवाद्यांनी कोणत्या अटी लादल्या की नाही याबाबत तातडीने कोणतीही माहिती जारी करण्यात आलेली नाही. जवानांच्या सुटकेसाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दोन सदस्यांच्या चमूसमवेत बस्तरमधील 7 पत्रकारांचे पथकही हजर होते. नक्षलवाद्यांच्या आवाहनानुसार पत्रकारांसह एकूण 11 जण बस्तर भागात कमांडोच्या सुटकेसाठी पोहोचले होते.

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिह्याच्या सीमेवर 3 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत 22 जवान हुतात्मा झाले होते. तर इतर 31 जवान जखमी झाले आहेत. नक्षलींच्या मिलिटरी बटालियनचा मुख्य कमांडर हिडमा या भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी एकत्रित मोहीम राबवून त्याला जेरबंद करण्याची योजना आखली होती. त्यासाठीच सीआरपीएफ, राज्य पोलीस, डीआरजी युनिट तसेच एसटीएफचे शेकडो जवान विजापूर आणि सुकमा जिह्यातून टेकुलगुडा आणि जुनागुडा च्या दिशेने निघाले असताना चकमक झाली होती.

Related Stories

‘वन टाईम पासवर्ड’ नका करू फॉरवर्ड!

Amit Kulkarni

पंतबाळेकुंद्री यात्रेसाठी अतिरिक्त बस

Amit Kulkarni

फुटपाथवर फेरीवाले अन् सायकल ट्रकमध्ये दुचाकी वाहने

Amit Kulkarni

अवयवदानामुळे तिघा जणांना जीवदान

Amit Kulkarni

बोरगाव येथे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Patil_p

मराठी विद्यानिकेतनला दानशूरांकडून देणगी

Omkar B