Tarun Bharat

यशस्वी वकिलीचे सूत्र नाही : कपिल सिब्बल

 पुणे / प्रतिनिधी :

वकिलाला मानवी भावनांचे कंगोरे समजून घेता आले पाहिजेत. तरच, तो आपला मुद्दा न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडू शकतो. आपण कोणाची बाजू मांडत आहोत, हे समजून घेऊन बारकाईने अभ्यास करून बाजू मांडली पाहिजे. वकिलीमध्ये यशस्वी होण्याचे कोणतेही निश्चित सूत्र नाही. कायद्याचे मूळ आणि त्याची योग्य उकल समजून घेतली, तर वकिलीत यश मिळवता येऊ शकते, असे मत सुप्रसिद्ध वकील व खासदार कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज येथे ‘डॉ. पतंगराव कदम स्मृती व्याख्यानमालें’तर्गत आयोजित ‘वकिली कौशल्य (ऍडव्होकसी स्किल्स)’ या विषयावरील व्याख्यानात सिब्बल बोलत होते. या वेळी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. भाग्यश्री देशपांडे, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते.

सिब्बल म्हणाले, वकिलीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणतेही एक सूत्र ठरलेले नाही. स्वयंपाकगृहात पाककृती करण्यासाठी कोणता पदार्थ किती व कसा वापरायचा याचे जसे पक्के सूत्र ठरलेले नाही, तसेच वकिली क्षेत्राचेही आहे. मात्र, वकिली करताना वकिलांना कायदा नेमका काय आहे, त्याची निर्मिती, तो तयार करण्यामागे कोणत्या भावना होत्या, हे समजून घेणे आवश्यक आहे. कायदा तोच असला, तरी प्रत्येक दाव्यात त्याचे संदर्भ देताना गुन्ह्यामागील मानवी भावना नेमकी काय होते हे वकिलाला मांडता आले पाहिजे.

आपल्या पक्षकाराची न्यायालयात बाजू मांडण्यासाठी जाताना दाव्यांचा बारकाईने अभ्यास करून नेमका वाद काय आहे, हे समजून घेऊन मांडता आले पाहिजे. कायदेशीर बाजू मांडताना आपण स्वतः आपल्या मुद्यांवर ठाम आहोत का, हे वकिलाने पाहिले पाहिजे. वकिली हे असे एकमेव क्षेत्र आहे, जिथे सर्व कायदा या मुद्यामुळे समान असतात. कोणीही पदाने, वयाने लहान किंवा मोठा नसतो, त्यामुळे वकिली करताना कोणतीही भीती बाळगू नये,’ असेही सिब्बल यांनी सांगितले. तसेच, कायद्याचा बारकाईने अभ्यास, त्यातील साध्या-साध्या गोष्टी समजून घेणे, आपली बाजू मांडण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेऊन विचार करून उत्तर देणे, आपली बाजू धाडसाने मांडणे, दाव्याचा सखोल अभ्यास करणे, या गुणांचा अंगीकार केला, तर वकिली अधिक चांगली होऊ शकते, असेही सिब्बल म्हणाले.

Related Stories

आषाढी वारीचे नियोजन नेटकेपणाने करा

Archana Banage

भारती विद्यापीठ : माजी विद्यार्थी मेळाव्यास चांगला प्रतिसाद

prashant_c

सोलापूर जिल्ह्याची गुणवत्ता राज्यामध्ये प्रथम येण्यासाठी प्रयत्न करा – सीईओ

Archana Banage

भीमसैनिकांचा पार्क चौकात रास्ता रोको

Archana Banage

सोलापूर : करमाळ्यात शिवसेनेची ऑक्सिजन बँक सुरू

Archana Banage

मकाई साखर कारखान्यास 5 कोटी 63 लाख दंड

Abhijeet Khandekar