Tarun Bharat

यशाला अनेक बाप, अपयश अनाथ..!

Advertisements

प्रतिनिधी/ पणजी

‘यशाला अनेक बाप असतात, मात्र अपयश हे अनाथ मुलासारखे असते’. गिरीश चोडणकरांच्या बाबतीत तेच घडले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजय प्राप्त झाला असता तर श्रेय घेण्यासाठी सर्वचजण पुढे आले असते, परंतु आता अपयशाचे खापर एकटय़ा गिरीशवर फोडले जात आहे, असे उद्विग्न मत काँग्रेस निरीक्षक दिनेश गुंडू राव यांनी व्यक्त केले. राजकारणात यश-अपयश हे कुणा एकटय़ाचे असत नाही, ती एकत्रित जबाबदारी असते व ती प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असेही त्यांनी काँग्रेसजनांना सुनावले.

 जिल्हा पंचायत निवडणूक निकालाचा आढावा तसेच पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गोव्यात आलेले गुंडू राव मंगळवारी पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस पक्ष संघटना बळकट करणे व गोमंतकीयांचा गमावलेला विश्वास पुन्हा मिळविणे या दोन प्रमुख कामांसाठी आपण गोव्यात आलो असून पक्षाचा प्रत्येक नेता व कार्यकर्ता तसेच जिल्हा पंचायत निवडणुकीतील उमेदवारांकडे चर्चा करून आढावा घेणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

 भाजपची योग्य रणनीती, जोरदार प्रचारकार्य

जिल्हा पंचायत निवडणूक नक्की केव्हा होणार यासंबंधी आम्हाला अंधारात ठेवण्यात आले, त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. दुसऱया बाजुने भाजपने आपली रणनीती योग्य प्रकारे आखली व आतून जोरदार प्रचारकार्य केले. तसेच हजारो नोकऱया, खाणी सुरू करणे यासारखी अनेक आश्वासने लोकांना दिली. त्याशिवाय पैशांचा तर वारेमाप वापर करण्यात आला, या सर्वांचा त्यांना मोठय़ा प्रमाणात फायदा झाला. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप हा कोणत्याही थराला जाणारा पक्ष आहे, असा दावा गुंडूराव यांनी केला.

अनेक कारणांमुळे आम्ही मागे पडलो

भाजपचे सर्व बडे नेते प्रचारात उतरले होते. आमचे बरेच उमेदवार जिंकण्याची ठाम खात्री असलेले असेच होते, परंतु अनेक कारणांमुळे आम्ही मागे पडलो व पराभवाचा सामना करावा लागला. या सर्व कारणांचा आता आपण अभ्यास करणार असून गट पातळीपासून सर्व नेते, कार्यकर्त्यांशी बोलणी, चर्चा करून भविष्यातील रणनीती ठरविणार आहे, असे गुंडूराव यांनी पुढे सांगितले.

यापुढे आम्ही गोव्यातील सध्याचे खाण, कोळसा, महामार्ग, नोकऱयांची खोटी आश्वासने, महागाई, यासारखे असंख्य ज्वलंत विषय घेऊन लोकांसमोर जाणार आहोत. गिरीश चोडणकर यांनी पाठविलेल्या राजीनाम्यावर पक्षश्रेष्ठीच काय तो निर्णय घेणार आहेत. दोन दिवसांच्या गोवा भेटीनंतर आपणही पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार आहे.

भाजप देशातील सर्वात भ्रष्ट, कोणतीही नीतीमत्ता नसलेला पक्ष

स्थानिक काँग्रेस नेत्यांचे भाजपशी अंतर्गत लागेबांधे असल्यामुळेच जिल्हा पंचायत निवडणुकीत दारूण पराभव पत्करावा लागला का? असे विचारता, त्या विषयावरही आपण पक्षश्रेष्ठींकडे बोलणी करणार असल्याचे ते म्हणाले. भाजप हा वरकरणी सोज्वळतेचे कितीही आव आणत असला तरी आतून देशातील सर्वात भ्रष्ट व कोणतीही नीतीमत्ता नसलेला पक्ष आहे, असा आरोप गुंडूराव यांनी केला.

पक्ष नेतृत्वात बदल आवश्यकच : आलेक्स लॉरेन्स

पक्ष नेतृत्वात बदल होणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत आमदार आलेक्स लॉरेन्स यांनी व्यक्त केले. परंतु अद्याप राजीनामा स्वीकृत करण्यात आलेला नसल्यामुळे सध्या या विषयावर ठाम बोलणे शक्य होणार नाही. कधीकधी स्पष्ट बोलणेही अंगलट येत असते, त्यामुळे चोडणकर यांच्या राजीनाम्यावर माझे काहीच मत नाही. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा की नाही, हा त्यांचा वैयक्तिक अधिकार, असे लॉरेन्स म्हणाले. मी भ्रष्ट नाही, विकावू नाही. त्यामुळे न बोलण्यासंबंधी माझ्यावर कुणी दबाव आणू शकत नाही, आणि तसे सांगण्याचे धाडस कुणीच करू शकणार नाही, असेही एका प्रश्नावर लॉरेन्स यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या मतदारांची अपेक्षा पूर्ण झाली नाही : आलेक्स

जिल्हा पंचायत निवडणुकीसंबंधी बोलताना, या निवडणुकीत भाजपच्या विजयामागे दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत. त्यातील पहिला म्हणजे त्यांनी 10 हजार नोकऱयांचे आश्वासन दिले. निवडणुकीच्या अगदी शेवटच्या दिवसात विविध सरकारी योजनांचा आधारनिधी लोकांच्या हातात दिला. अशाप्रकारे सरकारचा पैसा स्वतःच्या फायद्यासाठी वापरला. त्यामानाने काँग्रेस मतदारांच्या हाती काहीच पडले नाही. त्यांनाही तशीच अपेक्षा होती, परंतु काँग्रेस ती पूर्ण करू शकली नाही.

काँग्रेस उमेदवारांच्या पराभवास गिरीश चोडणकर यांचे नेतृत्व जबाबदार आहे का? असे विचारले असता, प्रत्येकाने ती जबाबदारी स्वीकारण्याचे धाडस दाखवावे. स्वतः केलेल्या चुकीसाठी माफी मागण्याची धमक असावी, यालाच नेतृत्व म्हणतात. जो जबाबदारी स्वीकारू शकत नाही, तो नेता बनू शकत नाही, असेही लॉरेन्स यांनी सांगितले.

Related Stories

सासष्टी दर वर्षी किमान दीड हजार जण पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारतात

Patil_p

पणजी आजपासून बनणार मायानगरी

Amit Kulkarni

‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत ३२६ भारतीय लंडनहून मायदेशी दाखल

Abhijeet Shinde

सत्तरी अर्बनच्या भरभराटीसाठी सभासदांनी सहकार्य करावे

Amit Kulkarni

एटीके बागान-चेन्नईन एफसी लढत आज फातोडर्य़ात रंगणार

Amit Kulkarni

मडकई मतदारसंघात लवकरच भूमिगत वीजवाहिन्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!