Tarun Bharat

यालाच मनोरंजन असे नाव

Advertisements

मनोरंजनाचे संदर्भ व्यक्तीपरत्वे बदलत चाललेत. पूर्वी भजन, कीर्तन यातून आधी उद्बोधन व नंतर मनोरंजन हा हेतू होता. प्रेम हे मानवी मनाला पडलेलं सुंदर स्वप्न, एक आविष्कार, पण त्याच्याकडे सुद्धा मनोरंजन म्हणून पाहिलं जात आहे. एकाचं दुसऱयावर दुसऱयाचं तिसऱयावर, अमर्यादित, तीन तासांचा चित्रपट पाहून पोरगी गटवणं, प्रेम हा जन्मसिद्ध अधिकार, प्रेम एकांवर, विवाह दुसऱयाबरोबर, संबंध तिसऱयाबरोबर व यातून मनोरंजन हेच ध्येय तरुणांसमोर आहे. त्यातून मनोरंजन स्वस्त झालं आहे. जळी, स्थळी, काष्टी मनोरंजनच शोधणारी पिढी वास्तवापासून खूप दूर चालली आहे व भयानक वास्तवाला सामोरी जात आहे. जीवन म्हणजे स्वप्न, मनोरंजन शब्दांच्या पलीकडे शरीराच्या पलीकडेही काही आहे, याचं भान राहिलं नाही. आधुनिकतेमुळे भरपूर वेळ मिळत आहे. बोअर होतं म्हणून भोगवाद, चंगळवाद, मनोरंजनाच्या नावाखाली चालू आहे. संस्कार व श्रमसंस्कारपासून दूर गेलेल्या समाजात मनोरंजनाने धुमाकूळ घातलाय. तृप्ती, समाधान नाहीच. ‘ये दिल मांगे मोर’ म्हणत असमाधानच. ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ ही वृत्ती राहिलीच नाही. भ्रष्टाचाराने घरात लक्ष्मी नव्हे तर भौतिक वस्तूंची रेलचेल नांदत आहे. कीव आणणाऱया गोष्टीतून मनोरंजन शोधलं जात आहे. नैतिकतेला गाडून भौतिकता आली की, काय होणार? मनोरंजन हे जीवनाचे वास्तव नव्हे. विरंगुळा आवश्यक पण जीवनाचा पांगुळगाडा ओढण्यास तोच कामी येत नाही. व्यक्तिमत्वाला आकार देणारं, घडविणारं मनोरंजन हवं, व्यक्तिमत्त्व दुभंगणारं मनोरंजन धुमाकूळ घालत आहे.

 देवाची स्थळे ही सहलीची स्थळे झाली आहेत. देवाला देवीला जाण्यातही मनोरंजन, महाविद्यालयात जाण्यातही मनोरंजन. थ्रीलच्या नावाखाली मनोरंजन शोधणं सुरु आहे. मनोरंजनाच्या नावाखाली नको ते खाणं, पिणं, पाहणं आलं आहे. जीवनातल्या प्रश्नापेक्षा मनोरंजनाचे प्रश्न पिढीला पडत आहेत. प्रसारमाध्यमांतून मनोरंजनाच्या नावाखाली अंधश्रद्धेबाबत, प्रेमाबाबत, विवाहबाह्य संबंधाबाबत, काम जीवनाबाबत, मानवी स्वभावाबाबत संभ्रम होणार असेल तर त्याचे विकृतीचे संस्कार कशाला? आपल्या मनोरंजनाच्या माध्यमातून लोक फसत असतील तर त्याचा माध्यमांनी गांभीर्याने विचार करावा. मनोरंजनातून फसवणूक जोपासली जाणार असेल तर आदर्शतेचे अग्रलेख कशासाठी? ‘आहे मनोहर तरी’ शरदाच्या चांदण्यांची दुसरी बाजूही लोकांसमोर यायला हवी. क्षणाची प्रसारमाध्यमे अनंतकाळची प्रसारमाध्यमे ठरत आहेत. कोणत्या गोष्टीचा प्रचार करायचा व कोणत्या गोष्टी पसार करायच्या, हे आजच्या मनोरंजनाच्या जगात महत्वपूर्ण ठरणार आहे.

माहिती व तंत्रज्ञान युगात मनोरंजनाच्या नावाखाली नको ते उथळ, संस्कृतीचं विपर्यास्त स्वरुप, विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घालणारं, सासू-सुनांचे द्वेष, अंधश्रद्धा, पसरविणाऱया गोष्टी येत आहेत. प्रत्येक मनोरंजन विकृतीच घेऊन येत असेल तर संस्कृतीचे तीन तेरा होणारच. मनोरंजनापुढे ज्ञान, माहिती, मूल्ये, संस्कृती दुय्यम ठरत आहेत. आधी मनोरंजन, मग त्यातील गोष्टींचा हव्यास, मनोरंजनाच्या वेळापत्रकात अभ्यासाला वेळच नाही. आधी अभ्यास, मग मनोरंजन ठीक. दप्तर फेकून दिलं की खेळ, नंतर गप्पा मग अभ्यास, हा क्रमच बदलला. गप्पा बंद झाल्यामुळे व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा कप्पा बंद झाला. ‘हाताची घडी तोंडावर बोट’ हे शाळेआधी कुटुंबातच प्रसारमाध्यमांनी घडवून आणलं. माहिती व तंत्रज्ञानाचे केवळ मनोरंजन व तंत्रज्ञान होऊ नये. आजच्या मुलांचा मनोरंजनाचा कालावधी अभ्यासापेक्षा वाढलाय. मुले अनुकरणप्रिय असतात. टी.व्ही. वरील जाहिरात, गाणे, अंगविक्षेपासह म्हणणाऱया चिमुरडय़ांना कवितेचे एक कडवेही म्हणता येऊ नये, हा मनोरंजनाचा अभाव का शिक्षण पद्धतीचा पराभव समजावा? प्रबोधनासाठी आलेली समूहसंपर्क साधने मनोरंजनाच्या मलीद्यावर जगत आहेत. जे मोठय़ांनी मोठेपणी पाहिलं ते मुले पाहून बसलीत. मनोरंजनाच्या नावाखाली लैंगिक शिक्षण ऐवजी विकृत बाजू मुलांच्या भावविश्वात खळबळ उडवत आहे. प्रसारमाध्यमांतून ज्ञान कमी व मनोरंजन जास्त होत आहे.

मनोरंजनाने आजच्या समाजाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. ज्या प्रमाणात भोवतालचा निसर्ग कमी झाला, सजीव माणसांचा गोतावळा कमी झाला, निसर्गाचा आनंद कमी अनुभवायला मिळाला, प्रसारमाध्यमातील मनोरंजनाने निसर्ग जो खरा गुरु त्याची जागा घेतली. ज्ञान मिळत आहे, पण नको ते ज्ञानही मिळत आहे. सजीव माणसांची घरातील आंतरक्रिया बंद होऊन प्रसारमाध्यमांतील मनोरंजनाने माणसांना गुंतवण्यात यश मिळवले. प्रेम, वासना, विकृती, अंगविक्षेप, हसणं, खिदळणं, उपहास, रॅगींग, द्वेश यातही मनोरंजन शोधणारे आहेत. वैचारिक नाळ तोडून मनोरंजन फोफावत आहे. कुटुंब या मालिकेत एकमेकांशी द्वेषापोटी, बदला घेण्यासाठी विवाह दाखवून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यापर्यंत मजल गेली आहे. संस्कार मोडीत काढत, व्यभिचार रुजवणारं मनोरंजन, आचार-विचाराला तिलांजली देणारं मनोरंजन, रुजतच नाही तर रुचत आहे.

Related Stories

फेम फिएस्टा -उत्सव महिलांचा

Patil_p

जलवैभव सुरक्षित राखू

tarunbharat

कचऱयाचा पुनर्वापर

Patil_p

हॉस्टेल लाईफ

Patil_p

आता डेन्मार्कमध्ये रोबोटच्या मदतीने होणार कोरोना चाचणी

Patil_p

बाजरीचे दिवस

Patil_p
error: Content is protected !!