40-42 लाख रुपयात मनाजोगे अपत्य घरी नेतात लोक
आई होणे प्रत्येक महिलेसाठी सर्वात सुखद क्षण असतो, पण अनेकदा कित्येक महिलांना मातृत्व अनुभवता येत नाही. अशा स्थितीत मातृत्वाचा आनंद घेण्यासाठी अशा महिला सरोगसीची मदत घेतात. भारतात यावर बंदी असल्याने आईवडिल होण्याची इच्छा असणारी अशी जोडपी अनेक देशांमधून युक्रेनमध्ये पोहोचत आहेत. युक्रेनमध्ये सरोगसीला कायदेशीर मान्यता मिळाली असल्याने दरवर्षी हजारो जोडप्यांना अपत्यप्राप्ती होत आहे.
रशियाला लागून असलेला युक्रेन तसा नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो, पण आता तो सरोगसीद्वारे अपत्य निर्माण करणाऱया फॅक्ट्री चालविण्यासाठी जगात चर्चेत आला आहे. या सुंदर देशात सरोगेट मातेला एखाद्या प्राण्याप्रमाणे राबविले जाते हे दुर्दैव आहे.


युक्रेनमध्ये कुठलेही जोडपे 40-42 लाख रुपये खर्च करून अपत्यासाठी व्यवहार करू शकते. काही महिन्यांमध्ये स्वतःचे अपत्य मिळवू शकते. हे पूर्ण काम अत्यंत व्यावसायिक पद्धतीने पार पाडले जाते. याचमुळे संबंधित महिलेने कुठल्या स्थितीत अपत्याला जन्म दिला हे संबंधित जोडप्याला कळत नाही.
युक्रेनमध्ये अन्य व्यवसायांप्रमाणेच सरोगसीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर चालविला जात आहे. कंपन्या याचे प्रमोशन आणि ईव्हेंटही करवित आहेत. या ईव्हेंटमध्ये सरोगसीद्वारे जन्मलेल्या मुलांना बोलावून यासाठी प्रचार-प्रसार केला जातो.
भारत, नेपाळ आणि बांगलादेश यासारख्या देशांमध्ये सरोगसीवरून अत्यंत कठोर कायदे असल्याने लोक या देशाकडे धाव घेतात. ब्रिटनमध्ये सरोगसीला कायदेशीर मान्यता मिळाली असली तरीही तेथे नियमांचे कसोशीने पालन केले जाते.