Tarun Bharat

युती, आघाडीमुळे सत्तेत येऊ शकलो नाही : राऊत

यंदा स्वबळावर 25 जागा लढवणार : सत्तेत आल्यास कॅसिनो बंद

प्रतिनिधी /पणजी

गोव्यात एवढी वर्षे आम्ही केवळ युती आणि आघाडीच करत राहिलो. त्यामुळे पक्षाचा विस्तार होऊ शकला नाही, सत्तेतही येऊ शकलो नाही. त्यामुळे यंदा कोणतीही आघाडी वा युती न करता स्वबळावर निवडणुकीत उतरून 22 ते 25 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. निकाल काहीही लागो, आम्ही लढणार आहोत. गोव्यात सुरू असलेल्या आमच्या कामाची पावती निश्चित मिळणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. गोव्यात सत्ता मिळाल्यास कॅसिनो कायमस्वरुपी बंद करण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी खासदार अरुण शेवाळे, राज्यप्रमुख जितेश कामत, संपर्क प्रमुख जीवन कामत यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री. राऊत यांनी, गोव्यातील विद्यमान राजकारणाने निर्लज्जपणाची पातळी गाठली आहे. येथील सत्ताधाऱयांना पक्षांतराचा रोग लागला आहे. त्यातूनच एका पक्षात निवडून यायचे आणि सत्ता व स्वार्थासाठी निर्लज्जपणे अन्य पक्षात उडी मारायची असे प्रकार मोठय़ा प्रमाणात वाढीस लागले आहेत. परंतु हे प्रकार थांबले पाहिजेत व गोमंतकीयांनी ते थांबविले पाहिजेत, ते कसे थांबवायचे त्याची योजना शिवसेनेकडे आहे, असे प्रतिपादन केले.

गोव्यात अनेक निवडणुकांचा अनुभव घेतला आहे. परंतु यंदा जरा जास्तच धुरळा उडाला आहे. आप, तृणमूल यासारख्या पक्षांचा प्रवेश झालेला आहे. बेडुकउडय़ा मारण्याचे राष्ट्रीय कार्यक्रमही वाढले आहेत. आजपर्यंत त्या उडय़ा दिल्लीपर्यंत जात होत्या. यावेळी ती मजल पश्चिम बंगालपर्यंत गेली आहे. तरीही अखंड देश असल्यामुळे कुणीही कुठेही उडय़ा मारू शकतो. परंतु त्यातून गोव्याला काय मिळणार याचा विचार झाला पाहिजे.

कितीही पक्ष आले, कुणीही निवडणुका लढवल्या म्हणून गोव्याच्या जनतेचे भाग्य बदलेल का? हा व असे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे गोव्यासमोर आहेत. मात्र त्यांची उत्तरे व प्रत्यक्ष किती प्रश्न सुटले हेही कुणीच सांगू शकत नाहीत. त्यामुळे केवळ निवडणुकीपुरतेच नव्हे तर निवडणूक असो वा नसो, आम्ही काम थांबवलेले नाही. ते सदैव चालूच राहणार आहे, असे ते म्हणाले.

गत अनेक निवडणुकांमध्ये आम्ही मगो, गोवा सुरक्षा मंच या सारख्या स्थानिक पक्षांसोबत युती-आघाडी केली. परंतु त्यातून साध्य काहीच झाले नाही. त्यामुळे यंदा आघाडय़ा व युत्या टाळण्याचा निर्णय घेतला आहे. गोमंतकीयांना गोव्याची अस्मिता जपणारे, गोव्याच्या प्रश्नांचा आवाज उठवणारे एक चांगले व मजबूत सरकार हवे असेल तर त्यांनी शिवसेनेला संधी द्यावी. गोव्यात चांगले शासन, सुशासन द्यावे ही आमची भूमिका असेल, असे राऊत म्हणाले.

गोव्याला एक परंपरा आहे, पावित्र्य आहे. गोव्याकडे आम्ही देवभूमी म्हणून पाहतो. भाऊसाहेब बांदोडकरांच्या काळात गोव्यात जे राजकारण होत हेते त्याच पद्धतीचे राजकारण महाराष्ट्रात शिवसेना करत होती. त्यामुळेच भाऊंना महाराष्ट्रातही प्रचंड मान सन्मान होता. परंतु अलीकडच्या काळात गोव्यातील राजकारण निर्लज्जतेच्या पातळीवर पोहोचले आहे. प्रमोद सावंत मुख्यमंत्रीपदी असले तरीही मनोहर पर्रीकरांनंतर गोव्याची अवस्था तितकीशी बरी नाही. गोव्याला सध्या नेतृत्वच नाही, असेही श्री. राऊत म्हणाले.

Related Stories

अविश्वास ठराव आणण्यात आमदारांची भूमिका नाही

Patil_p

जि.पं. निवडणूक 12 रोजी घेण्यावर एक‘मत’

Patil_p

मुसळधार पावसातही फोंडा पोलिसांचा कोरोनाशी लढा

tarunbharat

’जेथे आपण, तेथे योग’ संकल्पनेवर यंदा योग दिवस

Amit Kulkarni

200 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद

Patil_p

नेसाय येथे 24 लाख किंमतीचे अवैध तंबाखू पदार्थ जप्त

Patil_p