ऑनलाईन टीम / बागपत :
आंतरराष्ट्रीय शूटर आणि राष्ट्रीय स्तरावर 50 पेक्षा अधिक पदके जिंकलेली बागपत मधील जौहडी गावातील रहिवासी असलेली आंतरराष्ट्रीय शूटर चंद्रो तोमर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सध्या त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या वर उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे, अशी माहिती त्यांची नात शूटर सीमा तोमर यांनी दिली आहे.


चंद्रो तोमर यांचा मुलगा विनोद तोमर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, आता माझ्या आईच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या आहेत, त्याचे रिपोर्ट आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत मिळतील. सध्या तिच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत. लवकरच आईला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
चंद्रो तोमर यांच्याबाबत :
चंद्रो तोमर यांना ‘शूटर दादी’ या नावाने ओळखले जाते. दादीचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील जोहडी. आजही त्या गावात प्रचंड गरीबी आहे. 1999 साली या गावात पहिली शूटिंग रेंज उभारण्यात आली. चंद्रो तोमर दादी आपल्या नातीला या रेंजमध्ये घेऊन शिकवण्यासाठी भरती करायला गेली. एके दिवशी दादीने पिस्तूलमध्ये काडतूस घातले आणि निशाणा लावला. तो निशाणा अगदी अचूक लागला. त्यावेळी त्यांना एका प्रशिक्षकांने सांगितले की, दादी तुम्हीही शूटिंग शिकायला या. त्या दिवशी दादीची हिंमत आणि विश्वास वाढला आणि वयाच्या 65 व्या वर्षी तिच्या शूटिंगच्या प्रवासाला सुरुवात झाली. आतापर्यंत दादीने 25 पेक्षा जास्त मेडल जिंकले आहेत.
दादी स्त्रीवाद्यांसाठी आदर्श आहे आणि गेल्या 20 वर्षात तिने अनेक मुलींना शूटिंगमध्ये प्रशिक्षण दिले आहे. चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर यांच्या जीवनावर ‘सांड की ऑंख’ नावाचा एक हिंदी चित्रपटही बनवण्यात आला आहे.