Tarun Bharat

युपी योद्धा संघाचा सलग तिसरा विजय

वृत्तसंस्था/ बेंगळूर

आठव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील शुक्रवारी येथे झालेल्या चुरशीच्या सामन्यात युपी योद्धा संघाने जयपूर पिंक पँथर्सचा 41-34 अशा 7 गुणांच्या फरकाने पराभव करत स्पर्धेच्या गुणतक्त्यात चौथे स्थान पटकाविले. युपी योद्धा संघाचा हा सलग तिसरा विजय आहे.

या सामन्यात युपी योद्धा संघातील प्रमुख रायडर प्रदीप नरवालने आपल्या शानदार चढाईच्या जोरावर 14 गुण नोंदविले. त्याने या सामन्यातील आपल्या शेवटच्या चढाईत 5 गुण घेत जयपूर पिंक पँथर्सचे आव्हान संपुष्टात आणले. प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या इतिहासात प्रदीप नरवालने आतापर्यंत चढायावर 200 पेक्षा अधिक गुण नोंदविण्याचा विक्रम केला आहे. शुक्रवारच्या सामन्यात युपी योद्धा संघातील सुरिंदर गिलने 9 तर आशु सिंगने 6 गुण नोंदविले.

प्रदीप नरवालने या स्पर्धेत 65 वेळा सुपर दहा गुण नोंदविण्याचा पराक्रम केला आहे. सामना सुरू झाल्यानंतर जयपूर संघाने सुरूवातीला 5-0 अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर युपी संघाने काही मिनिटांतच 7-7 अशी बरोबरी साधली. पूर्वार्धात जयपूर संघाने युपी योद्धा संघाचे सर्व गडी बाद केले. सामन्यांच्या मध्यंतरापर्यंत जयपूर संघाने युपी संघावर एका गुणाची आघाडी घेतली होती. सामन्याच्या उत्तरार्धात प्रदीप नरवालने आपल्या चढाईवर 3 गुण घेत आपल्या संघाला आघाडी माळवून दिली.

युपी संघाने या आघाडी जवळपास शेवटपर्यंत राखली. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना जयपूर संघाने युपी संघाची आघाडी 2 गुणांनी कमी केली. 37 व्या मिनिटाला दोन्ही संघ 33-33 असे बरोबरीत होते. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना युपी संघाने जयपूर संघाचे दुसऱयांदा सर्व गडी बाद केल्याने हा सामना त्यांनी 7 गुणांच्या फरकाने जिंकला.

हरियाणा स्टीलर्सचा आज यु मुंबाविरुद्ध सामना

आठव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत रविवारी येथे हरियाणा स्टिलर्स आणि यु.मुंबा यांच्यात लढत होणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील रविवारी दुसरा सामना बेंगळूर बुल्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात खेळविला जाईल.

या स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात हरियाणा स्टिलर्स संघाला पुणेरी पलटणकडून 27-45 अशा गुणांनी पराभव पत्करावा लागला होता. हयाणाचा संघ पुन्हा मुसंडी मारण्यासाठी सज्ज झाला आहे. हरियाणा संघाची भिस्त प्रामुख्याने कर्णधार विकास कांडोला अशिश नरवाल यांच्या कामगिरीवर राहील. आशिष नरवालने तामीळ थलैवास संघाविरूद्धच्या सामन्यात 16 गुण मिळविले होते. तो या संघातील एक उत्कृष्ट अष्टपैलू म्हणून ओळखला जातो.

यु मुंबा संघाला कमी लेखून चालणार नाही, असा इशारा कर्णधार विकास कांडोलाने आपल्या साथीदारांना दिला. या स्पर्धेत यु मुंबा संघाने अनेक बलाढय़ संघाविरूद्ध दर्जेदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात हरियाणा स्टिलर्स पहिले किंवा दुसरे स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यांना या स्पर्धेतील उर्वरित तीन सामने जिंकणे जरूरीचे आहे.

या स्पर्धेत रविवार बेंगळूर बुल्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात दुसरा सामना खेळविला जाणार आहे. बेंगळूर बुल्सचा संघ या स्पर्धेत पहिल्या सहा संघामध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. बेंगळूर बुल्स संघाचा कर्णधार पवन सेरावत याच्या कामगिरीत सातत्य असले तरी तो सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. सामन्यात अधिक गुण मिळविण्यासाठी पवन प्रयत्नशील आहे. बेंगळूर बुल्सची कामगिरी गेल्या पाच सामन्यांमध्ये चांगली झालेली नाही. त्यांनी एकमेव सामना जिंकला आहे. जयपूर पिंक पँथर्स संघाची बचावफळी भक्कम आहे.

 संदीप धुल, विशाल आणि सेऊल यांच्यावरच जयपूर संघाची भिस्त आहे. शुक्रवारी झालेल्या या स्पर्धेतील सामन्यात युपी योद्धा संघाने जयपूर पिंक पँथर्सवर 41-34 अशा गुणांनी विजय मिळविला असल्याने जयपूरचा संघ रविवारच्या सामन्यात बेंगळूर बुल्सला विजयापासून रोखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल.

Related Stories

चेतेश्वर पुजाराचा सराव सुरू

Patil_p

काळय़ा फिती बांधून बापू नाडकर्णी यांना भारतीय खेळाडूंकडून आदरांजली

Patil_p

मोटरस्पोर्ट रेसर अलीशा अब्दुल्लाचा भाजपप्रवेश

Patil_p

टी-20 मानांकनात भारत अग्रस्थानी

Patil_p

चौशिंगाची शिकार करणारे दोन जण वनविभागाच्या ताब्यात

Patil_p

कोलकात्याविरुद्ध लखनौचे पारडे जड

Patil_p