Tarun Bharat

युवकाचा खून करुन मृतदेह नदीत टाकला

पोत्यात कोंबलेला मृतदेह मालखेड येथे नदीत आढळला

कराड/ प्रतिनिधी

अंदाजे 35 वर्षीय पुरूषाचा निर्घृण खून करून मृतदेह पोत्यात घालून नदीपात्रात फेकल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. मालखेड हे कराड व सांगली जिल्हय़ाच्या सीमेवर व महामार्गालगत असल्याने पोलिसांनी तीन जिल्हय़ात तपास सुरू केला आहे. कराड तालुक्यातील मालखेड येथील मार्तंडेश्वर घाट परिसरात नदीपात्रात मच्छिमारांना मृतदेह दिसल्याने खळबळ उडाली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करत तपासाचा वेग वाढवला आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. 

 दरम्यान, याप्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा दूधभाते यांनी सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांची फिर्याद नोंदवून घेतली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याबाबत स्पष्ट माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरा या प्रकरणी अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 पोत्याचे तोंड बांधून नदीत टाकले 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बुधवारी सकाळी मालखेड येथील मार्तंडेश्वर घाट परिसरात काही मच्छिमार मासे पकडत होते. दुपारी साडेअकराच्या सुमारास त्यांना नदीपात्रात एक संशयास्पद अवस्थेत पोते आढळून आले. पोत्याच्या जवळ जाऊन पाहिले असता प्रचंड दुर्गंधी येत होती. यावरून संशय आल्याने हा प्रकार तत्काळ कराड तालुका पोलिसांना कळवला. साहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा दूधभाते या पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाल्या. नदीपात्रात झाडाझुडपात अडकलेले पोते बाहेर काढण्यात आले. पोत्यात अंदाजे 35 वर्षीय पुरूषाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. पोते एका बाजूने फाटलेले होते. पोत्याचे तोंड कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची पाहणी केल्यावर हा गंभीर प्रकार असल्याचे लक्षात आले. या घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, उपअधीक्षक रणजीत पाटील, भरत पाटील, एएसआय जाधव, धनंजय कोळी, सज्जन जगताप, विजय म्हेत्रे, शशिकांत घाडगे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. अपर पोलीस अधीक्षक बोराडे यांनी परिस्थितीची पाहणी करून पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू करत मृतदेहाची ओळख पटते का? याची पाहणी सुरू केली. 

खिशात हेडफोन आणि कंगवा

 मृतदेहाच्या अंगावर पांढरा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट आहे. खिशात हेडफोन व कंगवा आढळला तर गळ्यात मास्क होता. मात्र मृतदेह जास्त काळ पाण्यात राहिल्याने तो सडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. हे आव्हान स्वीकारत पोलिसांनी प्रत्येक गोष्टीचा पंचनामा करून ती ताब्यात घेत वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती मात्र पोलिसांनी जमावाला हटकले. दरम्यान, संशयितांनी खून करून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पोत्यात बांधून नदीपात्रात फेकून दिला.

तीन जिह्यात तपासाला गती

कराड तालुक्याच्या हद्दीत मालखेड येथे कृष्णा नदीपात्रात खून झालेल्या पुरूषाचा मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी तपासाचा पहिला टप्पा म्हणून सातारा, सांगली, कोल्हापूर जिह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता असलेल्यांची माहिती घेणे सुरू केले आहे. त्यासाठी अपर पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक रणजीत पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा दूधभाते यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पोलीस पथके तपासासाठी रवाना झाली आहेत. या प्रकरणाचा तपास हे पोलिसांसमोरील एक आव्हान असणार आहे. त्यामुळे पोलिसांनी वेगाने चौकशीसत्र सुरू केले आहे. 

Related Stories

सातारा : कोंडव्यात राजकीय वादातून वाहनांची तोडफोड

datta jadhav

कृषी कायद्याला विरोधासाठी विरोध नको

Patil_p

सातारा हिल मॅरेथॉनचा उद्या होणार थरार!

Patil_p

…तरच राज्यात लॉकडाऊन : आरोग्यमंत्री

Archana Banage

सातारा आगारातून धावते दोन ठिकाणी एसटी बस

Patil_p

आमदारांनी आपल्याच फंडातील रस्त्याचे काम पाडले बंद

Archana Banage