Tarun Bharat

युवा कीर्तनकाराचा आवाज पोहोचला मुंबई दरबारी

Advertisements

किरहलशीच्या हभप विठ्ठल पाटील यांच्या कीर्तनाची ‘फक्त मराठी’ चॅनेलने घेतली दखल : बालपणापासूनच जपली कीर्तनाची आवड

आण्णाप्पा पाटील / बहाद्दरवाडी

‘मागणे ते एक मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा। काय उणे तयापासी, रिद्धी-सिद्धी ज्याचे दासी। काया वाचा करू देवासी अर्पण, तुका म्हणे विश्वंभर ज्याच्याने हे चराचर।।’

आयुष्यभर तुझी सेवा घडू दे, तुझ्याकडे भरपूर आहे देण्यासारखे, रिद्धी-सिद्धी आहेत, मला यातले काही नको, पण माझे शरीर, काया, वाचा, मन तुलाच अर्पण करीत आहे. तूच या जगाचा मालक आहेस. तुझे नामस्मरण सतत घडो, हीच माझी इच्छा आहे, अशा या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे किरहलशी येथील युवा कीर्तनकार विठ्ठल पाटील यांनीही आपल्या आयुष्यात पांडुरंगाकडे हेच मागणे मागून आपला आध्यात्मिक प्रवास चालू ठेवला आहे.

अगदी बालवयात कीर्तनाला सुरुवात करून महाराष्ट्र-कर्नाटक व गोवा या ठिकाणी कीर्तनाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘फक्त मराठी’ चॅनेलवरील ‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी’ या कार्यक्रमामध्ये त्यांना कीर्तन करण्याची संधी मिळाली. खानापूर तालुक्मयातील किरहलशीसारख्या खेडेगावातील एका 26 वर्षाच्या युवा कीर्तनकाराचा आवाज मुंबईनगरीत दुमदुमला अन् या खेडय़ातल्या तरुणाच्या कीर्तनाचे थेट चित्रिकरणही चॅनेलवर अनेकांना पहायला मिळाले. यानंतर मात्र खानापूरसह बेळगाव तालुक्मयातील नागरिक भारावून गेले.

दहाव्या वर्षापासून कीर्तनास सुरुवात

वयाच्या दहाव्या वर्षापासून हभप विठ्ठल नागोजी पाटील यांनी विविध ठिकाणी होणाऱया पारायण सोहळय़ांमध्ये कीर्तन करण्यास सुरुवात केली. त्यांचे पहिले कीर्तन मानकवाडी ता. खानापूर या ठिकाणी झाले. अवघ्या दहा वर्षांचा बालकीर्तनकार कीर्तन करत असतानाचे त्यांचे बोल ऐकण्यासाठी परिसरातील वारकऱयांनीही गर्दी केली होती. प्रारंभीच्या पाच-सहा कीर्तन कार्यक्रमांमध्ये विठ्ठल महाराज थोडे अडखळत होते. मात्र, त्यांची विठ्ठलावर अपार श्रद्धा होती. रोज नित्यनेमाने ज्ञानेश्वरी ग्रंथवाचन, गाथावाचन करून आपण कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला चांगले प्रबोधन करण्याची जिद्द त्यांच्या मनात कायम होती. यामुळेच ते नंतर उत्तमरित्या कीर्तन करू लागले.

बेळगाव परिसरातील वडगाव, येळ्ळूर, धामणे, किणये, मुचंडी, अष्टे, कलखांब, बेकिनकेरे, हंगरगा, तुरमुरी, राकसकोप तसेच खानापूर भागातील ओलमणी, उचवडे, माडीगुंजी, तिओली, शेडेगाळी, सावरगाळी, कामतगे, कारलगा, चापगाव, शिवोली, नंदगड, हलशी, खैरवाड याचबरोबर महाराष्ट्रातील कोवाड, कोल्हापूर, तुर्केवाडी, सांगली, सातारा, इचलकरंजी, पंढरपूर, औरंगाबाद, बीड, लातूर, रत्नागिरी, चिपळूण, मुंबई, पुणे आदींसह गोवा राज्यातही त्यांचे कीर्तनाचे कार्यक्रम झाले आहेत.

महाराष्ट्र-गोव्यातही कीर्तनाचे कार्यक्रम

‘जे जे भेटे भूत, ते ते मानी जे भगवंत’ या ओवीप्रमाणे त्यांना चांगले-वाईट दुर्जन-सज्जन असे लोक भेटत गेले. या सर्वांशी ते नम्रतेने वागू लागले. कोणी कितीही वाईट बोलले तरी त्यांच्याबरोबर आपुलकीनेच बोलून त्यांना आपलेसे करायचे, परमार्थाच्या दिशेने वळवायचे, हे कार्य त्यांनी चालू केले आणि कीर्तन सेवेला वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरुवात केली. त्यांची कीर्तनातील अभंग सोडविण्याची पद्धत, भावार्थ आणि दृष्टांत देण्याची पद्धत साऱयांनाच आवडू लागली. यामुळे ते बालकीर्तनकार म्हणून नावारुपाला आले. यानंतर त्यांचे महाराष्ट्र व गोव्यासारख्या ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम होऊ लागले.

कोल्हापूर येथे अलीकडेच दत्त जयंतीनिमित्त लाळेवाडी या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम झाला. या कीर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतरच त्यांना ‘फक्त मराठी’ या चॅनेलवरून फोन आला आणि ‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी’ या कार्यक्रमात कीर्तन सादर करण्याची संधी मिळाली. मुंबईतील डोंबिवली येथे गेल्या महिनाभरापूर्वीच सुमारे 50 मिनिटांचे शूटिंग झाले आणि त्याच कीर्तनाचे प्रक्षेपण ‘फक्त मराठी’ या चॅनेलवर दि. 12 व 13 एप्रिल रोजी प्रसारित झाले. या कार्यक्रमानंतर त्यांचे सर्वत्र
कौतुक झाले.

त्यांना कीर्तनासाठी आळंदी येथील प्रसिद्ध गायक हभप धनंजय ओलेकर व मृदंगसाथ कोल्हापूर येथील हभप मयुरजी सुतार तसेच हभप नारायण काळे, हभप गणेश पाटील आदींचे सहकार्य मिळाले.

‘पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत। व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी मुखी नाम। नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे।।’

या अभंगाप्रमाणेच विठ्ठल महाराज पांडुरंगाची भक्ती करतात. गेल्या बारा वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायीदिंडी करीत आहेत. आचारविचार आणि उच्चार यांची साधना करतो तोच वारकरी होय. गळय़ात माळ, हातात टाळ, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, खांद्यावर पताका, मनी शुद्ध भाव व मुखाने विठ्ठलनामाचा जयघोष करत दिंडीमध्ये सहभागी होणे आणि दिंडीतील पंधरा दिवस कोणताही थकवा न जाणवता केवळ विठ्ठलाच्या दर्शनाची आस आणि पंढरपुरात गेल्यानंतर सावळय़ा विठुरायाचे दर्शन हेच खरे आपल्या जीवनाचे सार्थक आहे, असे विठ्ठल महाराज सांगतात.

कीर्तन-प्रवचनातून व्यसनमुक्तीचा संदेश

कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश ते देतात. त्यांची यापूर्वी आध्यात्मिक व्याख्यानेही बऱयाच ठिकाणी झालेली आहेत. त्यांनी आपल्या गावात काही दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून विठ्ठल-रखुमाई मंदिर बांधले आहे. 2015 साली या मंदिराचा उद्घाटन सोहळाही झाला. सद्गुरु गोपाळअण्णा वास्कर महाराज यांचे दरवषी वर्धापन दिनानिमित्त कीर्तनाचे कार्यक्रम होत असतात, असेही ते म्हणाले.

कोरोनाचे संकट दूर व्हावे हीच इच्छा

कोरोनाचे संकट दूर व्हावे आणि पुन्हा एकदा साऱया वारकऱयांना विठ्ठलाचे दर्शन पूर्वीप्रमाणे व्हावे, ही एक आशा आहे. तसेच बेळगाव-खानापूर ग्रामीण भागातही युवा कीर्तनकार तयार व्हावेत, अशी तळमळ आहे, असेही विठ्ठल यांनी सांगितले.

वयाच्या नवव्यावषी घेतली पंढरीची माळ

विठ्ठल महाराज यांनी वयाच्या नवव्या वषी पंढरीची माळ धारण केली. घरात आई-वडील दोघेही वारकरी असल्यामुळे त्यांच्यावर अगदी बालवयापासूनच वारकरी संप्रदायाचे संस्कार घडत गेले. वयाच्या नवव्या वषी वडिलांसोबत पायी दिंडीमध्ये सहभाग घेतला आणि आषाढी वारीला त्यांनी पंढरपूरची तुळशीमाळ धारण केली. घरची परिस्थिती हलाखीची होती. यामुळे त्यांनी केवळ सहावीपर्यंतच शिक्षण घेतले. कायम विठ्ठलाच्या नामस्मरणात विविध आध्यात्मिक ग्रंथ वाचनात ते दंग रहायचे. ज्ञानेश्वरी गंथ, तुकाराम महाराजांच्या गाथामधील अभंग माणसाला आयुष्य कसे जगावे, हे शिकवितात. परमार्थ कसा करावा, हे शिकवितात आणि आपल्या वाचनातून जी माहिती समजलेली आहे, ती समाजालाही समजावून सांगण्याच्या उद्देशाने त्यांनी कीर्तन करण्याचा निर्णय घेतला.

Related Stories

तरुण भारतच्या वृत्ताची हेस्कॉमकडून दखल

Amit Kulkarni

‘पुण्यकोटी दत्तक योजने’साठी नागरिकांचा पुढाकार आवश्यक

Patil_p

केंद्राप्रमाणे राज्य सरकारने नोकरवर्गाला वेतन द्यावे

Patil_p

कंझ्युमर आयुक्त फोरमसाठी वकिलांचे आजही कामबंद आंदोलन

Tousif Mujawar

दोन लाख कुटुंबे हक्काच्या छप्पराविना

Amit Kulkarni

हेस्कॉम कर्मचाऱयांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

Patil_p
error: Content is protected !!