- अखिलेश यादव म्हणाले होते, ही भाजपची लस…
ऑनलाईन टीम / लखनऊ :
समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांनी सोमवारी कोरोना लसीचा पहिला डोस लखनऊमध्ये घेतला आहे. यापूर्वी त्यांचे पुत्र आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कोरोना लसीचा विरोध करत, मी लस नाही घेणार नाही असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी राग व्यक्त केला होता.
अखिलेश यादव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले होते की, ही भाजपची लस आहे. मी याच्यावर कसा विश्वास ठेवू असे म्हणत मी लस घेणार नाही असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी हा शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांवरील अविश्वास आहे, असे सांगत अखिलेश यादव यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती.
मात्र, काही वेळातच अखिलेश यादव यांनी आपले वक्तव्य मागे घेत म्हटले होते की, पूर्ण परीक्षण झाल्यावर मी लस टोचून घेणार असे सांगितले होते. दरम्यान, आता मुलायम सिंह यादव हे लस घेत असतानाचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.


दरम्यान, केशव प्रसाद मौर्य यांनी मुलायम सिंह यादव यांनी स्वदेशी लस टोचून घेतल्यामुळे त्यांचे धन्यवाद मानले आहेत. ते म्हणाले, आपण स्वतः लस टोचून घेतली हे या गोष्टीचे प्रमाण आहे की, सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लसीकरण बाबत अफवा पसरवली होती. त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे.