Tarun Bharat

येत्या सोमवारपासून किलबिलाट वाढणार

पहिलीतेपाचवीपर्यंतचेवर्ग 25 ऑक्टोबरपासून‘ऑफलाईन’

प्रतिनिधी/ बेंगळूर

कोविड टास्क फोर्सने (कोविड तांत्रिक सल्लागार समिती) संमती दर्शविल्याने राज्यतील पहिली ते पाचवीपर्यंतचे ऑफलाईन वर्ग 25 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पाचवीपर्यंतच्या शाळा भरविण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला असून यासंबंधीची मार्गसूची प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पालकांचे संमतीपत्र सक्तीचे असणार आहे. सार्वजनिक शिक्षण खात्याकडून नियमावलीसंबंधीची विस्तृत मार्गसूची एक-दोन दिवसांत प्रसिद्ध होईल.

पालक आणि शिक्षकांच्या मागणीवरून तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने पाचवीपर्यंतचे वर्गही सुरू करण्यास परवानगी दिली आहे. वर्गांमध्ये 50 टक्के हजेरी असावी. दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान 1 मीटर अंतर असावे, सामाजिक अंतर, थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझिंग सक्तीचे असल्याचेही मार्गसूचीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शिक्षक व शालेय कर्मचाऱयांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. वर्गांमध्ये मास्क वापरणे सक्तीचे असले तरी कोणत्याही विद्यार्थ्याला वर्गांमधील हजेरी सक्तीची असणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी यासंबंधीची मार्गसूची जारी केली आहे.

राज्यातील सर्व जिल्हय़ांमधील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर 1 टक्क्याच्या खाली आला आहे. त्यामुळे पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करून भरविण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर मार्च 2019 पासून सर्व शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली होती. मागील शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2020-21 या वर्षी विद्यागम पद्धतीने वर्ग भरविण्यात आले होते. परंतु, पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग शाळेमध्ये भरविण्यात आले नाहीत. 2021-22 हे शैक्षणिक वर्ष जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल तसतसे टप्प्याटप्प्याने शाळा-महाविद्यालये टप्प्याटप्प्याने ऑफलाईन पद्धतीनेही सुरू करण्यात आली. सुरुवातीला पदवी महाविद्यालये सुरू झाली. त्यानंतर 23 ऑगस्टपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले तर त्यानंतर काही दिवसांनी सहावी ते आठवीपर्यंतचेही वर्ग सुरू करण्यात आले. आता कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याने पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्गही सोमवार दि. 25 ऑक्टोबरपासून भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जलतरणही 50 टक्के क्षमतेने खुले

राज्यातील जलतरण तलावही सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणे नसणाऱयांसाठी प्रत्येक बॅचमध्ये 50 टक्के क्षमतेने जलतरण तलावात प्रवेश देता येईल, असे मार्गसूचीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी केवळ क्रीडापटूंना सराव व स्पर्धांकरिता जलतरण सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. आता सर्व प्रकारचे जलतरण तलाव प्रत्येक बॅचमध्ये 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, तास, सर्दी, खोकला, श्वसनासंबंधीचे विकार आदी लक्षणे नसणाऱयांनाच प्रवेश द्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे. प्रत्येक बॅचनंतर पोहोणाऱयांनी वापरलेले रेस्ट रुम, वॉक वे आणि इतर साहित्यांचे सोडियम हायपोक्लोराईड द्रावणाचा वापर करून निर्जंतुकीकरण करावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे

विमानतळांवरील काही निर्बंधही शिथिल

विमानतळांवरील काही निर्बंधही शिथिल करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कोविड मार्गसूचीनुसार विमानतळांवर सर्व प्रवाशांची दैनंदिन आरोग्य तपासणी (ताप, सर्दी, खोकला, श्वसनासंबंधीच्या समस्या वगळून) स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत सरकारने सूचित केलेल्या निवडक देशांमधील प्रवासी वगळता इतर प्रवाशांच्या आगमनानंतर आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पडताळण्याची सक्ती हटविण्यात आली आहे.

Related Stories

17 सप्टेंबरपासून रक्तदान अमृतमहोत्सव

Patil_p

नारायण राणे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Archana Banage

राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोडीची आवश्यकता नाही

Amit Kulkarni

गुजरातमध्ये लम्पी विषाणूमुळे बैल-गायींचा मृत्यू

Patil_p

‘भारत जोडो’मधून दीर्घ लढा देणार

Patil_p

दिल्लीत 150 नवे कोरोना रुग्ण; 1,208 ॲक्टिव्ह रुग्ण

Tousif Mujawar