ऑनलाईन टीम / लखनऊ :
योगी सरकारने आपल्या अर्थसंकल्पात तरुणांसाठी अनेक घोषणांसह योग्य विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याची घोषणा केली आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, सरकार मुख्यमंत्री अभ्युदय योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थांना लॅपटॉप देणार आहेत.


यासोबतच ज्या मंडळांमध्ये राज्य विद्यालये नाही आहेत, अशा ठिकाणी विश्व विद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. तसेच ओपन एअर जिम आणि गावागावात मुलांना खेळण्यासाठी मैदाने तयार केली जाणार आहेत. तसेच प्रत्येक गावामध्ये एक तरी मैदान असावे असा आमचा प्रयत्न असणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, योगी सरकारने सोमवारी 2020-21साठी 5,50,270.78 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या या पहिल्या पेपरलेस अर्थसंकल्पात 27,598.40 कोटींची भर घालून योगी सरकारने अर्थव्यवस्थेला एक ट्रिलियन डॉलर आकार देण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.


यामध्ये शिक्षण, आरोग्य, महिला कल्याण, कृषी, सिंचाई, औद्योगिक विकास, पर्यटन, क्षेत्रीय विकास यासह राज्यातील सगळ्या गोष्टींचा या अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर कन्या सुमंगला योजना आणि परिष्कृत कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 1200 कोटी रुपयांची तरतूद आणि महिला सामर्थ्य योजनेसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
महिला आणि लहान मुलांच्या कुपोषण समस्येच्या उपाय योजनेसाठी मुख्यमंत्री सक्षम सुपोषण योजनेकरीता 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.