Tarun Bharat

योग्य ‘व्यक्ती’ची योग्य निवड…

राजेंद्र आर्लेकर यांच्या अंगी असलेले गुण व संस्कार पाहता ते नक्कीच राज्यपाल पदाला न्याय देतील, यात शंका नाही. त्यांची निवड ही तमाम गोवेकरांसाठी अभिमानाची गोष्ट नक्कीच आहे.

गोव्याचे माजी सभापती राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदासाठी निवड झाल्यानंतर भाजप सरकारच्या विरोधातील राजकीय पक्षांनी ही निवड म्हणजे पेडणे मतदारसंघासाठी भाजपने केलेली तडजोड असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झाल्या. या प्रतिक्रियांकडे बघताना त्या राजकीय प्रतिक्रिया म्हणून पहाव्या लागतील. विरोधी पक्षांकडून अशा प्रतिक्रिया व्यक्त होणे स्वाभाविक असते. मात्र, राजेंद्र आर्लेकर यांचे आजवरचे काम पाहिल्यास त्यांना भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी दिलेली योग्य संधी व योग्य व्यक्तीची निवड असेच म्हणावे लागेल.

राजेंद्र आर्लेकर हे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ परिवारातील सदस्य. त्यांचे वडिल विश्वनाथ आर्लेकर हे तर संघाचे सक्रीय कार्यकर्ते व कट्टर समर्थक. साहजिकच राजेंद्र आर्लेकर यांच्यावर बालपणीच संघाचे संस्कार झालेले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांनी संघाचे कार्य आपल्यापरीने पुढे नेले. गोव्यात जेव्हा भाजपचे आगमन झाले, तेव्हा स्व. मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक तसेच इतरांच्या सोबत राजेंद्र आर्लेकर यांनी देखील पक्षाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले.

भाजपमध्ये राजेंद्र आर्लेकर यांनी विविध पदे भूषविली. पक्ष देईल ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली. पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत राहिले. पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना उमेदवारी दिली व 2002 मध्ये वास्को मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. पुन्हा 2012 मध्ये पेडणे मतदारसंघातून निवडणुकीत विजयी झाले. यावेळी त्यांची गोवा विधानसभेचे सभापती म्हणून निवड करण्यात आली.

गोवा विधानसभेला ‘पेपरलेस’ बनविण्याचे श्रेय त्यांना जाते. विधानसभेत कागदाचा होणारा वापर व त्यावर होणारा खर्च टाळण्यासाठी त्यांनी विधानसभेचे बहुतेक कामकाज हे पेपरलेस होईल याकडे लक्ष दिले व त्यात ते यशस्वी झाले. विधानसभेत प्रश्नोतर असो किंवा इतर कामकाज कोकणी भाषेतून व्हावे यासाठी ते आग्रही होते. सभापती म्हणून विधानसभेचे कामकाज हाताळताना त्यांनी स्वतः कोकणी भाषेवर भर दिला होता.

1980 पासून ते गोवा भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. पक्षात त्यांनी विविध पदे भूषविली. ज्यात दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष, भाजप राज्य कार्यकारिणी सरचिटणीस, 2003 ते 2006 दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष, 2006 ते 2009 दरम्यान भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य. 2010 ते 2012 दरम्यान भाजपचे प्रवक्ते अशी पदे त्यांनी भूषविली.

राजेंद्र आर्लेकर हे स्पष्ट व सरळ बोलणारे, मृदूभाषिक. सहसा आक्रमक न होणारे, कोणत्याही क्षणी व कोणत्याही वेळी पक्षाची बाजू समर्थपणे मांडणारे अशीच त्यांची भाजपमध्ये ओळख होती. हे सर्व संस्कार त्यांच्यावर रा.स्व.संघाच्या कार्यातून झालेले.

सध्या राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारातील अनेक मंत्र्यांना व आमदारांना ‘संघ’ म्हणजे काय? भाजप म्हणजे नेमका काय याचा गंधदेखील नाही. केवळ सत्तेचे वाटेकरी होण्यासाठीच ते भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. बऱयाच वेळा या मंत्र्यांकडून व आमदारांकडून बेताल वक्तव्य होते व पक्ष अडचणीत येतो. पक्षाची बाजू लंगडी पडते. अशा कठीण प्रसंगी पक्षाची बाजू समर्थपणे मांडण्यात राजेंद्र आर्लेकर नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. कुणालाही न दुखवता पक्षाची बाजू ते मांडत आलेले आहेत. मग त्यासाठी ते सोशल मीडियाचा व खास करून ‘ट्विटर’चा वापर करत.

2014 मध्ये जेव्हा मनोहर पर्रीकर यांना केंदात संरक्षणमंत्री म्हणून नेण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी राजेंद्र आर्लेकर यांचा विचार केला जात होता व गोव्यातही तशी जोरदार चर्चा होती. पण, त्यांच्याऐवजी पक्षाने लक्ष्मीकांत पार्सेकर यांची निवड केली व श्री. आर्लेकर यांची मुख्यमंत्री होण्याची संधी हुंकली. 2015 मध्ये मंत्रिमंडळात फेरबदल करताना पर्यावरण व वनमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

राजेंद्र आर्लेकर यांच्या कार्याची देखल भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी घेताना त्यांना राज्यपालपदाची ऑफर देण्यात आली. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण स्वीकारणार असे सुरुवातीपासून सांगत आलेल्या आर्लेकर यांनी राज्यपालपदाची ऑफर स्वीकारली व त्या संदर्भातील अधिकृत घोषणा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली. राज्यपाल म्हणून अधिकृत घोषणा झाल्यावर राजेंद्र आर्लेकर यांनी पक्षाचे आभार मानले. यावेळी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती ती ‘भाजप’ हा असा राजकीय पक्ष आहे, जिथे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत असतो. जिथे प्रत्येक सदस्याचे काम मान्य केले जाते.

राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक हे दर्शविते की, भाजपमध्ये नेते आणि नेतृत्व महत्त्वाचे आहे. श्री. आर्लेकर म्हणाले की, हा पक्ष आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि पक्षावर त्यांचा विश्वास आहे.

यापूर्वी अँथनी डायस व सुनित रॉड्रिग्ज या गोमंतकीयांना हा मान मिळाला होता पण ते गोव्यात कार्यरत नव्हते. त्यामुळे राजेंद्र आर्लेकर हे गोव्यातून थेट राज्यपालपदी निवड होणारे पहिले गोमंतकीय ठरले आहेत. राज्यपाल हे पद खूपच महत्त्वाचे आहे याची आपल्याला जाणीव असून या पदाला न्याय देण्यासाठी आपले प्रयत्न असेल. तटस्थ राहून जबाबदारी निभावली जाईल. याकामी विधानसभेत सभापती म्हणून कार्य करताना जो अनुभव पदरी आहे त्याचा वापर करीन, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

राजेंद्र आर्लेकर यांच्या अंगी असलेले गुण व संस्कार पाहता ते नक्कीच राज्यपाल पदाला न्याय देतील, यात तिळमात्र शंका नाही. त्यांची निवड ही तमाम गोवेकरांसाठी अभिमानाची गोष्ट नक्कीच आहे. राजेंद्र आर्लेकर यांची निवड म्हणजे एका योग्य व्यक्तीची योग्य निवड असेच म्हणावे लागेल.

महेश कोनेकर

Related Stories

यांचे करायचे तरी काय….

Patil_p

‘सायबर’मधील अदृश्य चेहरे

Patil_p

आभासी जगातला खरा माणूस

Patil_p

कोरोना की कंगना

Patil_p

लस प्रत्येकाला नव्हे, रुग्णांना!

Omkar B

बुडत्याचा पाय खोलात म्हणजे सध्याची काँग्रेस

Patil_p