Tarun Bharat

रणकुंडये येथे युवकाची भीषण हत्या

उधारी वापस मागितल्याने हल्ला : घरातून ओढून नेऊन परत मृतदेह आणून फेकला घरासमोर

प्रतिनिधी /बेळगाव

रणकुंडये, ता. बेळगाव येथील एका युवकाचा भीषण खून करण्यात आला आहे. पाच ते सहा जणांच्या एका टोळक्याने शनिवारी मध्यरात्री घरातून ओढून नेत खुनानंतर त्या युवकाला पुन्हा त्याच्या घरासमोर फेकून दिले आहे. आर्थिक व्यवहारातून ही भीषण हत्या झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. हल्ल्यात आणखी एक तरुण जखमी झाला आहे.

नागेश भाऊसाहेब पाटील (वय 31) असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. त्याचा लहान भाऊ मोहन हा हल्ल्यात जखमी झाला असून त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून नागेशचा खून करण्यात आला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात खुनाची नोंद झाली आहे.

त्याच गावातील प्रमोद सहदेव पाटील, त्याचा भाऊ श्रीधर, महेश कंग्राळकर यांच्यासह आणखी तिघा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे प्रभारी एसीपी सदाशिव कट्टीमनी, पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींना अटक करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलिसांची धडपड सुरू होती.

चार महिन्यांपूर्वी आला होता गावी

या भीषण हत्येने गावात खळबळ माजली आहे. खून झालेला नागेश व त्याचा भाऊ मोहन या दोघा जणांना कारमधून नेऊन त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

नागेश मर्चंट नेव्हीमध्ये काम करीत होता. या नोकरीचा राजीनामा देऊन गुजरातमध्ये त्याने दुसरी नोकरी धरली होती. चार महिन्यांपूर्वी तो गावी आला होता. गुजरातला जाण्यासाठी त्याने तिकीटही बुक केले होते.

प्रमोद पाटीलला काही वर्षांपूर्वी दिलेले 20 हजार रुपये परत मागितल्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी प्रमोद काही सहकाऱयांसह नागेशच्या घरी आला होता. परत पैसे मागितलास तर तुझा खात्मा करेन, अशी धमकी देऊन गेला होता. त्यावेळी दोघांमध्ये वादावादीची घटना घडली होती. शनिवारी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास नागेशच्या घराचा दरवाजा ठोठावण्यात आला. दरवाजा उघडताच लाठय़ा-काठय़ा, तलवार व रॉडने हल्ला करण्यात आला. घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या दुचाकीची मोडतोड करण्यात आली. शिवाय घरात घुसूनही तोडफोड करण्यात आली.

नागेश व त्याचा भाऊ मोहन यांना हल्लेखोरांनी कारमधून आपल्या सोबत नेले. खुनानंतर या दोघांना त्यांच्या घरासमोर टाकून दिले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मोहन व त्याच्या आईला सिव्हिल हॉस्पिटलला हलविले. पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

प्रत्येकामध्ये लेखनाची उर्मी असणे आवश्यक

Patil_p

वक्फ बोर्डच्या मागणीसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

mithun mane

क्लोजडाऊनची घोषणा होताच बाजारपेठेत झुंबड

Amit Kulkarni

अपघातात टिळकवाडी येथील महिला ठार

Tousif Mujawar

कुठल्याही वयात व्यायाम करा!

Patil_p

कंचवीर तलाव रिकामा होण्याची भीती

Amit Kulkarni