Tarun Bharat

रणजी स्पर्धेची 87 वर्षांची परंपरा खंडित

कोरोनामुळे यंदा रणजी स्पर्धेचा हंगाम रद्द

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

प्रथमश्रेणी स्तरावरील सर्वात अव्वल स्पर्धा म्हणून गणल्या गेलेल्या रणजी चषक क्रिकेट स्पर्धेची परंपरा यंदा खंडित होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. यानुसार, यंदा रणजी चषक स्पर्धा होणार नाही व त्याऐवजी संलग्न संघटनांनी सूचित केल्याप्रमाणे विजय हजारे चषक, विनू मंकड चषक व वरिष्ठ महिला गटात राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

याशिवाय, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यू-19 राष्ट्रीय वनडे विनू मंकड चषक स्पर्धा आणि महिला राष्ट्रीय वनडे स्पर्धा भरवणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी सर्व संलग्न संघटनांना या बदलाची लेखी कल्पना दिली आहे.

वास्तविक, बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली व सचिव जय शाह हे खेळाडूंना कमाल मानधन अदा करणारी रणजी चषक स्पर्धा यंदाही घेण्यासाठी आग्रही होते. (रणजी स्पर्धेत खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी दीड लाख रुपयांचे मानधन अदा केले जाते). ही स्पर्धा आयोजित करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे त्यांनी सातत्याने सांगितलेही होते. मात्र, विविध ठिकाणी, दोन महिने बायो-बबल प्रणाली अंमलात आणणे व्यावहारिकदृष्टय़ा आव्हानात्मक असल्याने त्यांना यंदाची रणजी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

‘यंदा आम्ही वरिष्ठ महिला गटात वनडे चषक स्पर्धा, तसेच विजय हजारे चषक व त्यानंतर 19 वर्षाखालील वयोगटासाठी विनू मंकड चषक स्पर्धा आयोजित करत आहोत. 2020-21 प्रथमश्रेणी हंगामातील अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार आम्ही हा निर्णय घेतला आहे’, असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी संलग्न राज्य क्रिकेट संघांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

पुढील महिन्यात खेळवल्या जाणाऱया हजारे चषक स्पर्धेत समान गट व समान बायो-बबल प्रणाली कायम ठेवण्याचा मंडळाचा प्रयत्न असणार आहे, असे संकेत आहेत. कोव्हिड-19 नंतरच्या युगात प्रथमश्रेणी क्रिकेट कॅलेंडर निश्चित करणे कसे आव्हानात्मक होते, याचा शाह यांनी आपल्या पत्रात उल्लेख केला. ते यात म्हणतात, ‘कोरोनाच्या आपत्तीमुळे आपण बराच अवधी गमावला. सर्व सामने, स्पर्धा निर्धोकपणे संपन्न व्हावेत, यासाठी आवश्यक ती काळजी घेत हंगामाचे कॅलेंडर निश्चित करणे कठीण होते’.

खेळाडूंना नुकसानभरपाई देणार

यंदाचा हंगाम न झाल्याने प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणाऱया खेळाडूंचे आर्थिक नुकसान झाले. त्याची उचित प्रमाणात भरपाई करण्याचा निर्णय बीसीसीआयने यापूर्वी आपल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घेतला. त्याचीही लवकरच अंमलबजावणी करण्यासाठी मंडळाचा प्रयत्न असणार आहे. शाह यांनी आपल्या पत्रात सय्यद मुश्ताक अली टी-20 चषक क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या भरवल्याबद्दल सर्व राज्य क्रिकेट संघटनांचे यावेळी कौतुक केले. ही स्पर्धा यशस्वी संपन्न झाल्यानंतर आयपीएल स्पर्धा भारतात घेण्याच्या प्रयत्नांना ताकद मिळेल, असे ते म्हणाले. इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी पूर्ण सुसज्जतेचे प्रयत्न सुरु आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक मालिकाविजय संपादन केल्यानंतर या पार्श्वभूमीवर, इंग्लंडविरुद्ध मालिकेबद्दल विशेष औत्सुक्य आहे. त्या दृष्टीने आयोजनात काहीही कसर राहू नये, यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्नशील आहोत’, असे ते म्हणाले.

Related Stories

न्यूझीलंडची बांगलादेशवर मालिकेत विजयी आघाडी

Patil_p

‘क्लीन स्वीप’ हा विराटसेनेचा निर्धार

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

Patil_p

दिलशानच्या सर्वोत्तम वनडे संघामध्ये सचिनचा समावेश

Patil_p

न्यूझीलंडच्या वर्ल्ड कप संघाची घोषणा

Amit Kulkarni

यु मुम्बा, पाटणा पायरेट्स विजयी

Patil_p