प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट जगातील 9 देशांमध्ये आढळला असून भारतात या व्हेरियंटचे 22 रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील जळगाव व रत्नागिरीत आहेत. याशिवाय केरळच्या पलक्कड आणि पथनमथिट्टा जिह्यात आणि मध्य प्रदेशात भोपाळ आणि शिवपुरी जिह्या डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत, असे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिले.
देशात करोनाची दुसरी लाट अजून पूर्णपणे ओसरलेली नाही. अशातच कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या शक्यतेने तज्ञांसह नागरिकांचीही चिंता वाढवली आहे. देशावर करोनाच्या डेल्टा व्हेरियंटचे संकट घोंगावत आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षाही डेल्टा प्लस व्हेरियंट (delta plus variant) अधिक घातक असल्याचे बोलले जात आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तीन राज्यांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी काही दिवसांपूर्वी डेल्टा विषाणू आढळल्याबद्दल व रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यांमध्येही त्याचा शिरकाव झाल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट करून काळजी घेण्याचे आवाहन केले होते. मात्र स्थानिक प्रशासनाला याची कोणतीच माहिती नव्हती किंवा ती लपवण्याचे धोरण स्वीकारण्याच्या सल्ल्याची अंमलबजावणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी रत्नागिरीचा स्पष्ट उल्लेख करत राज्यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. यामुळे ‘डेल्टा’चा जिह्यातील शिरकाव नाकारणारी स्थानिक प्रशासन व जिह्याचे धोरण निश्चित करणारी मंडळी पुन्हा एकदा उघडी पडली आहेत. या विरोधाभासाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.