प्रतिनिधी- रत्नागिरी
रत्नागिरी शहर विस्ताराचा भविष्यातील 30 वर्षांचा विचार करून दांडेआडोम येथे सुमारे 15 कोटींचा अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प उभारला जाणार आहे. सुमारे अडीच हेक्टर जागेवर प्रकल्प असून कचऱ्यावर 100 टक्के प्रक्रिया होणार आहे. यावर बायोगॅस प्रकल्प, खत प्रकल्प, वीज प्रकल्प, मैलाप्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत.
यामुळे प्रदूषणही नाही किंवा काही वायाही जाणार नाही, असा दावा पालिकेने केला आहे. याचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, सध्या कंपाउंड आणि अंतर्गत रस्त्यांचा 1 कोटी 65 लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. पालिका सभागृहापुढे तो लवकरच ठेवण्यात येणार आहे.

