Tarun Bharat

रत्नागिरी : खेडमध्ये कोरोना रूग्ण वाढीचा वेग मंदावतोय

दोन दिवसात एकाही रूग्णाची नोंद नाही, आरोग्य प्रशासनासह ग्रामस्थांना दिलास

प्रतिनिधी / खेड

तालुक्यात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने आरोग्य प्रशासनासह ग्रामस्थांची धास्ती वाढलेली असतानाच गेल्या दोन दिवसात कोरोनाचा एकही रूग्ण न आढळल्याने प्रशासनासह ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रूग्ण वाढीचा वेग मंदावत चालल्याने प्रशासनाने काहीअंशी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. तालुक्यात आतापर्यंत १३२७ रुग्णांची नोंद झाली असून ११९८ रूग्णांनी कोरोनावर भात केली आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गतच्या करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत १ लाख ६४ हजार १९४ जणांपैकी ५६ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. दिवसागणिक ३० हून अधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळत होते. यामुळे आरोग्य यंत्रणेसह ग्रामस्थांची धास्ती कमालीची वाढली होती. आतापर्यंत आंबवली प्राथमिक केंद्रांतर्गत २१०, फुरुस १२४, कोरेगाव ४४, लोटे ३३५, शिव बुदुक १२५, तळे ७३, तिसंगी १० ९, वावे ३६ तर खेड नगरपरिषद हद्दीत २७१ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. सर्वाधिक रूग्ण लोटे प्राथमिक केंद्रांतर्गत आढळल्याची नोंद झाली आहे.

तालुक्यातील १८३ गावांपैकी ९५ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून ८८ गावामध्ये अजूनही कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नसून कोरोनाला गावच्या वेशीबाहेर थोपवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह अन्य प्रशासकीय यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात येत आहे. आरोग्य प्रशासनाच्या अथक प्रयत्नांसह ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे कोरोना रूग्ण वाढीचा वेग मंदावत चालल्याने साऱ्यांनाच हायसे वाटले आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत १८ सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर अखेरपर्यत तालुक्यातील १८३ गावसह शहरातील १७ प्रभागांमध्ये आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. यासाठी ग्रामीण भागात ६९ पथकांमध्ये २०७ तर नगरपरिषद हद्दीतीस ९ पथकांमध्ये २२ कर्मचारी मोहिमेत कार्यरत होते. तालुक्याची लोकसंख्या १ लाख ६४ हजार ८०४ इतकी असून ग्रामीण भागात १ लाख ४७ हजार ७२१ तर शहराची लोकसंख्या १७ हजार ८३ इतकी आहे.

यातील ग्रामीण भागात १ लाख ४८ हजार २४९ तर शहरात १५ हजार ९४५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी ग्रामीण भागात ४२ तर शहरी भागात १४ कोरोनाचे रूण आढळले असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली. कोरोनाचा वेग मंदावत असला तरी नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक असून शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केली आहे.

Related Stories

गाडय़ा सुरू झाल्या की निघून जाऊ, पण तोवर..!

NIKHIL_N

सिंधुदुर्ग पूरग्रस्त भागासाठी विशेष पॅकेज द्या- जिल्हा भाजपच्यावतीने निवेदन

Anuja Kudatarkar

कार्तिकी एकादशीच्या उत्सावाला सशर्त परवानगी

Omkar B

दापोलीत दोघा दुचाकीस्वारांवर बिबटय़ाचा हल्ला

Patil_p

पोलीस बंदोबस्तात ‘वाईन शॉप’ खुली

Patil_p

वस्त्रहरणकारांचे ‘विठ्ठल विठ्ठल’ लवकरच रसिकांच्या भेटीला!

Patil_p