Tarun Bharat

रत्नागिरी : खेड पोलिसांनी ५ तासातच आवळल्या मारेकऱ्याच्या मुसक्या

होडखाड येथील नारायण शिगवण खूनप्रकरण, आर्थिक वादातून खून झाल्याचे स्पष्ट

प्रतिनिधी / खेड


खेड तालुक्यातील होडखाड-वरचीवाडी येथील ४० वर्षीय प्रौढाच्या खूनप्रकरणी येथील पोलिसांनी अवघ्या ५ तासातच उलगडा करत गावातीलच रूपेश नारायण शिगवण ( २४ ) या मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या. हा खून आर्थिक देवाणघेेवाणीच्या वादातून झालेल्या तपासाअंती स्पष्ट झाले आहे.
होडखाड-वरचीवाडी येथील नारायण सदू शिगवण या ४० वर्षीय अपंग प्रौढाचा मृतदेह जंगलमय भागात आढळला होता. या प्रौढावर लाकडी दांडक्याने प्रहार करून खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार येथील पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. मारेकऱ्याचा माग काढण्यासाठी श्वानपथकही मागवण्यात आले होते. अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे हे देखील घटनास्थळी पोहचून तपासाबाबत सूचना केल्या.
पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या तप्तरतेमुळे अवघ्या ५ तासातच मारेकऱ्यास गजाआड करण्यात यश आले. या कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले. पथकात पोलीस कर्मचारी मंगेश शिगवण, संजय मारळकर, संदीप कदम, चरणसिंग पवार, निलेश माने यांचा समावेश होता. प्रौढाच्या खूनासाठी वापरलेल्या दांडक्यासह मनगटी घड्याळ, मृत प्रौढाच्या कुबड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सुरुवातीला संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या रूपेशला पोलिसी हिसका दाखवल्यानंतर प्रौढाच्या खूनाची कबुली दिली.
खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रूपेश शिगवण याने आजोबांचा मृत्यू दाखला काढून देण्यासाठी दीड वर्षापूर्वी नारायण शिगवण यास १० हजार रूपये दिले होते. दाखल्यासाठी तगादा लावून देखील दाखला देण्यास त्याने असमर्थता दर्शवली होती. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रूपेश हा मुंबईहून गावी आला होता. यानंतर त्याने पुन्हा दाखल्यासाठी नारायण शिगवण याच्याकडे तगादा लावला असता त्याने आणखी ४ हजार रूपयांची मागणी केली होती.
त्यानुसार रूपेश २५ रोजी रात्रीच्या सुमारास ४ हजार रूपये घेवून नारायण शिगवण याला भेटण्यासाठी होडखाड येथील बसस्टॉपवर गेला होता. यादरम्यान नारायणने आणखी २ हजार रूपयांची मागणी करत रूपेशला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, झालेल्या शाब्दीक बाचाबाचीनंतर रागाच्या भरात त्याच्या डोक्यात लाकडी दांडका घालून खून केल्याचे रूपेशने पोलिसांना सांगितले. मृत प्रौढाच्या मोबाईलचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे करत आहेत.

Related Stories

दापोलीत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Archana Banage

राष्ट्रीय काँग्रेस पर्यावरण सेल प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक यांची जिल्हाध्यक्ष संपर्क कार्यालयास भेट

Anuja Kudatarkar

महत्वाची बातमी! यंदा दहावी,बारावी निकाल २० जूनच्या आधी

Rahul Gadkar

रत्नागिरीत ‘महाराष्ट्र बंद’ ला संमिश्र प्रतिसाद

Patil_p

हेदवी समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फीन मासा

Patil_p

ओटवणे विकास सोसायटी चेअरमनपदी दाजी गावकर तर व्हाईस चेअरमनपदी स्वप्नील उपरकर

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!