Tarun Bharat

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे ‘फायर ऑडिट’ ऐरणीवर

भंडाऱ्यातील आगीच्या घटनेचे रत्नागिरीतही पडसाद
जिल्हा रुग्णालयात अग्निरोधक सिलिंडरचा तुटवडा, मुदतही संपण्याच्या मार्गावर

प्रतिनिधी / रत्नागिरी

भंडारा येथील सामान्य शासकीय रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागातील आगीच्या दुर्दैवी घटनेने सारा महाराष्ट्र हळहळला. या घटनेचे पडसाद आरोग्य विभागात उमटले आहेत. यातूनच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांच्या ‘फायर ऑडिट’चा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरजही यामुळे चर्चिली जाऊ लागली आहे.

भंडारा येथे सामान्य शासकीय रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीमध्ये सेंटरमधील 17 पैकी 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. नवजात शिशु केयर सेंटरमध्ये कमी वजनाची बालके व प्रकृती नाजूक असलेल्या बालकांना विशेष निगराणीखाली ठेवले जाते. मात्र येथील अनुचित घटनेनंतर अशा सर्वच ठिकाणी फायर ऑडिटची गरज प्रकर्षाने पुढे येत आहे.

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातही नवजात शिशु अतिदक्षता विभाग कार्यरत आहे. येथे 15 नवजात बालकांना ठेवण्याची क्षमता असून शनिवारी 10 बालकांची काळजी घेतली जात आहे. पूर्वी कार्यरत असलेल्या विभागाच्या दुरूस्तीनंतर त्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सध्या हा विभाग कार्यरत आहे. या विभागात आगीसारखी अनुचित घटना घडल्यावर परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवता यावे, या हेतूने फायर ऑडिट गरजेचे बनले आहे.

या विभागाकडे जाण्यासाठी एकच जिना आहे. तसेच या ठिकाणी अग्निरोधक सिलिंडरचीही कमतरता असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर महिला प्रसुती विभागातही `फायर ऑडिट’ होणे गरजेचे बनले आहे. या ठिकाणीही अग्निरोधक सिलिंडरचा तुटवडा आहेच. उपलब्ध असलेल्यापैकी काही सिलिंडरची मुदत संपण्याच्या मार्गावर तर काही सिलिंडरची मुदत संपल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणेबाबतही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तातडीने आढावा घेणार

जिल्हा शासकीय रुग्णालयात असे प्रसंग उद्भवू न देण्यासाठी योग्य खबरदारी घेतली जात आहे. गतवर्षी आगीसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात मॉक ड्रिल घेण्यात आले होते. अलिकडे कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती व या ठिकाणी आवश्यक यंत्रणेबाबत तातडीने आढावा घेऊन त्यानुसार उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक-रत्नागिरी

Related Stories

शिवसेनेच्या ‘चिल्लर गँग’ची स्वार्थी कोल्हेकुई!

NIKHIL_N

‘माझे कुटुंब…’रंगलय फक्त कागदावर!

Patil_p

आणखी 32 जण पॉझीटीव्ह – मंगळवारी रात्री 25, तर बुधवारी 7 नवे रूग्ण

Patil_p

एकाच रुग्णवाहिकेचे दोन वेळा लोकार्पण

NIKHIL_N

दगडही बोलू पाहताहेत खूप काही…

tarunbharat

एकाच दिवसात 21 रुग्ण

NIKHIL_N