देवरूख रत्नागिरी मार्गावर झाडे कोसळली
प्रतिनिधी / संगमेश्वर
शनिवार संध्याकाळपासूनच संगमेश्वर तालुक्याला तौकते वादळ दाखल झाले असून रविवारी दुपारनंतर त्याचा वेळ वाढला. संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक घरांची पडझळ झाली असून घरांवर झाडे कोसळल्याने अंदाजे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. देवरुख रत्नागिरी रस्त्यावर काल निवे बुद्रुक येथे संध्याकाळी झाडे कोसळून रस्ता काही वेळ ठप्प होता तर नायरी ते फणसवणे मुख्य रस्त्यावर झाड कोसळले मात्र ग्रामस्थांनी ते बाजूला केले. महसूल यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई गोवा महामार्गालगत पैसा फंड इंग्लिश स्कूल जवळ असणारे जाखमाता मंदिर हे संगमेश्वरवासीयांचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. कालपासून संगमेश्वर परिसरात वादळामुळे रिमझिम पाऊस सुरु असून आज सकाळी जोरदार वादळी वाऱ्यांमुळे जाखमाता मंदिरावर आंब्याचे झाड कोसळून मंदिराचे नुकसान झाले आहे. महामार्गाचे रूंदीकरणाचे काम सुरु असल्याने मंदिराच्या प्रवेशद्वाराकडील बराचसा भाग तोडण्यात आला असतानाच आज वादळी वाऱ्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत मंदिराजवळ असणारे आंब्याचे मजबूत झाड उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे.

