प्रतिनिधी / खेड
कोरोनाच्या महामारीतआई किंवा वडिलांच्या मृत्यूनंतर अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अनाथ मुलांच्या शिक्षणाचा भार उचलणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रशालेत सीबीएसई बोर्डाचे मोफत शिक्षण देणार असल्याची माहिती संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे यांनी दिली.
आधीच कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत अडकलेल्या कुटुंबाचा आधारवडच नियतीने हिरावल्यानंतरच अशा मुलांच्या शिक्षणाची होणारी परवड अटळ असते. आई किंवा वडील यापैकी कोणत्याही कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास त्यांच्या मुलांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येवू नये, यासाठी संस्था शैक्षणिक मदतीचा हात देणार आहे.
ही मुले शिक्षणापासून वंचित राहून बालकामगार होण्यापलिकडे त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नसतो. यापार्श्वभूमीवर प्रशालेकडून अनाथ मुलांना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय दहावीच्या परीक्षेत प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या कुठल्याही शाळेतील विद्यार्थ्यास कनिष्ठ महाविद्यालयात ११ वी विज्ञान व वाणिज्य शाखेत मोफत प्रवेश देवून शिक्षण दिले जाणार आहे. तसेच जीईई, नीट एनडीए एमएचटी-सीईटी यासारख्या स्पर्धा परीक्षांचेही मार्गदर्शन व शिक्षण दिले जाणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ७२१९८१९८०६ , ७२१९८१९८१४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

