Tarun Bharat

रविवारचा संपूर्ण लॉकडाऊन शिथिल

राज्य सरकारचा आदेश : इतर दिवसांप्रमाणे व्यवहार सुरू राहणार

प्रतिनिधी/ बेंगळूर

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात चौथ्यांदा लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्यानुसार काही क्षेत्रांना सूट देण्यात आली असली तरी रविवारी संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. आता या निर्णयातून सरकारने माघार घेतली आहे. जनतेची होणारी गैरसोय विचारात घेऊन आज रविवारी लॉकडाऊन नेहमीच्या दिवसांप्रमाणे शिथिल राहणार आहे. याबाबतचा अधिकृत आदेश शनिवारी जारी करण्यात आला आहे.

चौथ्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र रविवार सुटीचा दिवस असल्याने जनतेची गैरसोय होऊ नये तसेच हिताच्या दृष्टीने रविवारी संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यानुसार केएसआरटीसी, बीएमटीसीच्या बसेस, ऑटो रिक्षा, टॅक्सी, कॅब, दुकाने, मद्यविक्री, मांसविक्री, भाजीपाला, फळे तसेच इतर व्यवसाय सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंप देखील सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, सुरक्षा उपाययोजनांबाबत यापूर्वी जारी केलेल्या आदेशांचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे.

मॉल, लॉज, चित्रपटगृहे, हॉटेल (पार्सल वगळून), रेस्टॉरंट, पब, गोल्फ क्लब, जीम, फिटनेस सेंटर, मंदिरे, मशिदी, चर्च यापूर्वीप्रमाणे बंदच राहणार आहेत. मागील आठवडय़ात शनिवारी रात्री 7 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जारी केल्याने संचारबंदीसदृश वातावरण होते. तथापि, कामगार वर्गाला  रविवारी सुटी असल्याने बाजारपेठेत जाऊन आवश्यक वस्तूंची खरेदी करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे या रविवारी म्हणजेच 31 मे रोजी इतर दिवसांप्रमाणेच सर्व व्यवहार सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

आठवडय़ातून एक दिवस संपूर्ण लॉकडाऊन करणे अयोग्य असल्याची टीका अनेक राजकीय नेत्यांसह नागरिकांनी केली होती. तरी सुद्धा 24 मे रोजी सरकारने लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी केली होती. परिणामी रस्त्यांवर फिरणेही शक्य झाले नव्हते. त्यामुळे नागरिकांना घरीच बसून रहावे लागले होते. आता मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी कठोर भूमिकेतून माघार घेतली आहे.

Related Stories

विदेशातील नोकरी सोडून थाटला मत्स्यपालन व्यवसाय

Patil_p

राजस्थान काँगेसमध्ये गटबाजी सुरूच

Patil_p

पंजाब, गुजरातचे लोक सर्वात आनंदी

Patil_p

पुरुषात दिल्ली, ओरिसा, गुजरातचे वर्चस्व राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा

Abhijeet Khandekar

अखिलेश यादव यांनी घेतला ‘अन्न संकल्प’

Patil_p

जुळय़ा अँडीबॉडीचा शोध

Patil_p