Tarun Bharat

रशियाकडून आणखी एक लस लवकरच

Advertisements

सप्टेंबरमध्ये चाचणी : ऑक्टोबरपासून उत्पादन

रशिया लवकरच स्वतःची आणखीन एक लस सादर करणार आहे. पहिली लस दिल्यावर लोकांमध्ये दिसून आलेले दुष्परिणाम दुसऱया लसीच्या डोसनंतर आढळून येणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. लसीमध्ये वापरण्यात आलेली सामग्री रशियाच्या गुप्त प्रकल्पामधून मागविण्यात आली आहे. लसीला इपिवॅककोरोना नाव देण्यात आले असून याची चाचणी सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. रशियाने अलिकडेच जगातील पहिली कोरोनाविरोधी लस ‘स्पुतनिक-5’ सादर केली होती. रशियाचे संरक्षण मंत्रालय आणि गामलेया रिसर्च सेंटरने ही लस तयार केली आहे.

दुष्परिणाम नसल्याचा दावा

इपिवॅककोरोना लसीची पहिली चाचणी 57 स्वयंसेवकांवर करण्यात आली आहे. स्वयंसेवकांना 23 दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चाचणीदरम्यान त्यांची तपासणी केली आहे. आतापर्यंत झालेल्या चाचणीत कुठलेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत, असा दावा वैज्ञानिकांना केला आहे.

ऑक्टोबरमध्ये नोंदणी

लसीच्या चाचणीत रोगप्रतिकारशक्तीचा प्रतिसाद पडताळून पाहण्यात आला आहे. याकरता 14 ते 21 दिवसांमध्ये स्वयंसेवकांना लसीचे दोन डोस देण्यात आले. लस ऑक्टोबरपर्यंत नोंदणीकृत होईल आणि नोव्हेंबरमध्ये याचे उत्पादन सुरू होईल अशी अपेक्षा रशियाला आहे. वॅक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ वायरोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी सोबत मिळून कोरोनावरील ही लस तयार करण्यात आली आहे. चिकनपॉक्सच्या लसीचा सर्वात मोठा साठा असलेल्या दोन प्रमुख संस्थांमध्ये या केंद्राची गणना होते.

कोरानाच्या पुनर्संसर्गाचे प्रकरण हाँगकाँगमध्ये

हाँगकाँगच्या एका व्यक्तीला कोरोनाचा पुन्हा संसर्ग झाला आहे. 33 वर्षीय आयटी तंत्रज्ञाला साडेचार महिन्यांमध्ये पुन्हा लागण झाल्याचे दिसून आले असून तो स्पेनमधून परतला होता. कोरोना संसर्गातून बरे होऊनही नव्याने लागण झाल्याने रोगप्रतिकारकशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नव्याने संक्रमण

कोविड-19 चे संक्रमण झाल्यानंतर निर्माण होणारी इम्युनिटी हयातभर राहत नसल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. संसर्गाची लक्षणे दिसून आल्यास चाचणी करून घ्यावी, अशी सूचना हाँगकाँग विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजिस्ट केल्विन काय-वेंग यांनी केली आहे.

स्क्रीनिंगमुळे प्रकार उघडकीस

33 वर्षीय व्यक्तीत पुन्हा संसर्गाचे प्रकरण स्क्रीनिंगनंतर समोर आले आहे. संबंधित व्यक्ती चालू महिन्यात युरोपमधून परतला होता आणि हाँगकाँग विमानतळावर स्क्रीनिंगदरम्यान पीसीआर चाचणी झाली. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आश्चर्याचा धक्का बसला. तो साडेचार महिन्यांपूर्वीच कोरोनातून बरा झाला होता. त्याच्यात इम्युनिटी विकसित झाल्याचे मानले जात होते.

बरे झाल्यावरही खबरदारी

संसर्गमुक्त झाल्यावर रुग्णांनी पुन्हा संक्रमण होऊ शकत नसल्याचे मानू नये. उपचारानंतरही मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग आणि हात धुणे चालू ठेवावे असे वेंग यांनी म्हटले आहे.

जिनोम कोडिंग

पुन्हा संसर्ग कसा झाला याचा शोध घेण्याचा प्रयत्न हाँगकाँग विद्यापीठाचे संशोधक करत आहेत. याकरता विषाणूच्या दोन स्ट्रेनच्या जेनेटिक कोडिंगचे विश्लेषण केले जातेय. पहिल्या विषाणूचा नमुना मार्च आणि एप्रिलमध्ये घेण्यात आला होता. दुसरा युरोपमध्ये आढळून आलेल्या विषाणूचा आहे. दोन्ही स्ट्रेन अत्यंत वेगळे असून विषाणू प्रत्येकवेळी स्वतःला बदलत राहतो असे संशोधकांनी सांगितले आहे.

कोरोनाचे तुकडे शरीरात

कोरोना संसर्गातून बरे झाल्यावर रुग्णात त्याचे तुकडे अनेक आठवडय़ांपर्यंत राहतात, या कारणामुळे देखील संबंधित व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह येऊ शकतो.  यापूर्वीही कोरोनाच्या पुन्हा संक्रमणाची प्रकरणे आढळून आली असली तरीही कुणाचाही कोविड-19 अहवाल पॉझिटिव्ह आला नव्हता.

‘एस्ट्राजेनेका’कडून अँटीबॉडी ट्रीटमेंट सुरू

जगभरात कोरोना विषाणूची बाधा 2,38,36,859 जणांना झाली आहे. यातील 1 कोटी 63 लाख 79 हजार 760 बाधित बरे झाले आहेत. तर 8,17,606 रुग्ण दगावले आहेत. ब्रिटनच्या एस्ट्राजेनेका कंपनीने  अँटीबॉडी उपचारपद्धतीची चाचणी सुरू केली आहे. या अंतर्गत रुग्णांना दोन अँटीबॉडी केमिकलने तयार औषधे दिली जाणार आहेत. याला एजेडी7442 नाव देण्यात आले आहे. 48 लोकांवर याची चाचणी करण्यात येणार आहे. 18 ते 55 वर्षांदरम्यानच्या लोकांसाठी ही उपचारपद्धत सुरक्षित आहे की नाही हे पाहिले जाणार आहे.

लसीबाबत घाई नको

कोरोनावरील लसीला घाईगडबडीत मंजुरी दिली जाऊ नये. योग्य चाचण्यांशिवाय कुठल्याही लसीला मंजुरी दिल्याने अन्य लसींच्या अडचणी वाढणार आहेत. अशा लसींच्या मानवी चाचण्यांसाठी स्वयंसेवक जमविणे अवघड ठरणार असल्याचे विधान अमेरिकेचे वैज्ञानिक डॉ. अँथनी फॉसी यांनी केले आहे.

कोलंबियात होणार चाचणी

अमेरिका आणि बेल्जियमच्या लसीच्या चाचणीत कोलंबिया सामील होणार आहे. कोलंबियाचे आरोग्यमंत्री फर्नांडो रुइज यांनी याची माहिती दिली आहे. या चाचणीत तिन्ही देशांचे 18 ते 60 वयोगटातील 60 हजार स्वयंसेवक सामील होतील. प्रत्येक स्वयंसेवकाला लसीचा एक डोस दिला जाणार आहे.

ब्राझील : 1.15 लाख बळी

ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयानुसार दिवसभरात 17 हजार 78 नवे रुग्ण सापडले असून 565 जणांचा मृत्यू ओढवला आहे. देशातील बाधितांचा आकडा आता 36 लाख 27 हजार 217 झाला आहे. देशात आतापर्यंत 1,15,451 जणांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनी देशातील डॉक्टरांसोबत बैठक घेतली आहे. त्यांनी बाधितांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

मेक्सिको : 3 हजार रुग्ण

मेक्सिकोत 24 तासांमध्ये 3,541 नवे रुग्ण सापडले असून 320 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या आता 5 लाख 63 हजार 705 झाली आहे. देशात 60 हजार 800 जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेचे राजदूत किस्ट्रोफर लँड यांनी लोकांना अनावश्यक कारणासाठी दोन्ही देशांमधील सीमा न ओलांडण्याचे आवाहन केले आहे.

पाकिस्तान : कमी रुग्ण

पाकिस्तानात मागील 24 तासांमध्ये 346 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एप्रिलनंतर प्रतिदिन आढळून येणाऱया रुग्णांचे हे सर्वात कमी प्रमाण आहे. जूनपर्यंत देशात प्रतिदिन सुमारे 6 हजार रुग्ण सापडत होते. सरकारने दोन आठवडय़ांपूर्वी चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पर्यटनस्थळे खुली करण्याची घोषणा केली होती.

प्लाज्मा थेरपीबद्दल साशंकता व्यक्त

ब्लड प्लाज्माने बाधितांवर सुरक्षित आणि प्रभावी उपचार होण्याचे खूपच कमी पुरावे आहेत, असे जागतिक आरोग संघटनेने म्हटले आहे. जगभरात प्लाज्मा थेरपीद्वारे उपचारासंबंधी व्यापक संशोधन होत आहे. परंतु यातील काहींमध्ये ही पद्धत प्रभावी ठरल्याची बाब समोर आल्याची माहिती डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात ब्लडप्लाज्माने उपचार करण्यास मंजुरी दिली आहे.

Related Stories

येथे सीटबेल्ट लावण्यास सक्त मनाई

Patil_p

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज

prashant_c

768 अब्ज डॉलर्सच्या संरक्षण बजेटला बायडेन यांची मंजुरी

Patil_p

थडग्यांना भेट देण्याचा छंद

Patil_p

कोटय़वधी वर्षे जुन्या उल्केत पाण्याचा अंश

Patil_p

डब्ल्यूएचओच्या पथकाला प्रवेश देण्यास चीनचा नकार

Omkar B
error: Content is protected !!