Tarun Bharat

रशियाच्या धनाढय़ाला युक्रेन युद्धाचा भुर्दंड

Advertisements

2 अब्ज रुपयांची ‘लेडी एम’ जप्त

युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचा फटका आता रशियाच्या उद्योजकांनाही बसू लागला आहे. यापूर्वीच अमेरिका आणि युरोपच्या आर्थिक निर्बंधांना तोंड देणाऱया रशियाच्या धनाढय़ांवरही कारवाईचा फास आवळला जातोय. आता इटलीने रशियातील सर्वात धनाढय़ व्यक्तीच्या विरोधात कारवाई करत त्याची 2 अब्ज रुपयांची क्रूज जप्त केली आहे.

एलेक्सी मोर्दशोव्ह असे या रशियातील सर्वात धनाढय़ व्यक्तीचे नाव आहे. युरोपीय महासंघाने युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर मोर्दशोव्हचा समावेश काळय़ा यादीत केला आहे. इटलीच्या इम्पेरिया येथून जप्त करण्यात आलेल्या जहाजाचे नाव लेडी एम आहे. ही लक्झरी क्रूज 65 मीटर (215 फूट) लांबीची आहे. लेडी एमची किंमत 27 दशलक्ष डॉलर्स (2 अब्ज रुपये) इतकी आहे. या लक्झरी क्रूजची निर्मिती 2013 साली अमेरिकेतील शिपबिल्डर कंपनी पामर जॉन्सनने केली होती.

सार्डिनिया बेटावर आलिशान महाल

रशियातील सर्वात मोठी स्टील निर्मिती कंपनी सेवरस्टलचा मालकी हक्क मोर्दशोव्ह कुटुंबाकडे आहे. फोर्ब्सनुसार निर्बंधांपूर्वी मोर्दशोव्ह यांची अनुमानित मालमत्ता 29.1 अब्ज डॉलर्सची होती. या मालमत्तेसह मोर्दशोव्ह रशियातील सर्वात धनाढय़ व्यक्ती आहेत. मोर्दशोव्ह यांचा भूमध्य समुद्राच्या सार्डिनिया बेटावर सुमारे 66 दशलक्ष युरोंचा आलिशान महाल आहे.

आणखी एकावर कारवाई

रशियातील आणखीन एक अब्जाधीश गेन्नेडी टिमचेंको यांच्यावरही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. गेन्नेडी यांचे आलिशान जहाज इटलीच्या इम्पेरियामध्ये रोखण्यात आले आहे. गेन्नेडी हे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय मानले जातात. या नौकेला जप्त करून अन्य ठिकाणी हलविले जाणार आहे. टिमचेंको यांनी कच्च्या तेलाच्या व्यापाराद्वारे स्वतःचे आर्थिक साम्राज्य उभे केले होते. रोसिया या बँकेचे ते प्रमुख समभागधारक आहेत. टिमचेंको यांच्यावर 2014 मध्ये क्रीमियावरील रशिया आक्रमणानंतर युक्रेनला अस्थिर करण्याची भूमिका बजावण्याचा आरोप आहे.

फ्रान्स अन् जर्मनीतही कारवाई

इटलीपूर्वी फ्रान्स आणि जर्मनीने देखील रशियन अब्जाधीशांच्या नौका जप्त केल्या आहेत. रशियावर युक्रेनच्या हल्ल्यानंतर युरोपीय देश त्याच्यावर दबाव निर्माण करू पाहत आहेत. या प्रयत्नांच्या अंतर्गत रशियाला आर्थिक ईजा पोहोचविली जात आहे.

Related Stories

हेलिकॉप्टरवर लटकून 25 पूल-अप

Patil_p

भारत-अमेरिका संबंध होणार अधिक दृढ

Patil_p

डॉमिनिकामध्ये मिळाला सर्वात मोठा साप

Amit Kulkarni

अबुधाबीचे क्राउन प्रिन्स युएईचे नवे राष्ट्राध्यक्ष

Patil_p

श्रीलंकेत नवा डेल्टा व्हेरीयंट आढळल्याने वाढली चिंता

Patil_p

तेलंगणात 4 दिवसांमध्ये दुसऱयांदा अतिवृष्टी

Patil_p
error: Content is protected !!