रशिया-युक्रेन युद्धाचा आज 20वा दिवस आहे. रशिया सतत युक्रेनच्या शहरांवर बॉम्ब हल्ले करत आहेत. युद्धात रशियाची परिस्थिती खराब होताना दिसत आहे. रशियाने चीनकडे लष्करी साहित्याची मागणी केल्याचा दावा अमेरिकन माध्यमांनी केला आहे. त्यानंतर अमेरिका आणि चीन सरकारच्या प्रमुख मित्र राष्ट्रांमध्ये रोममध्ये सोमवारी बैठक झाली. अमेरिकाने चीनला युक्रेन युद्धात रशियाला मदत न करण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेने स्पष्ट म्हटले की, रशियाला लष्करी मदत केल्यानंतर चीनला यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. पण रशियाचे राष्ट्रपती कार्यालय क्रेमलिन यांनी चीनकडून कोणतीही मदत मागितली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, “आम्ही थेट, खाजगीत बीजिंगशी संवाद साधत आहोत. आम्ही त्यांना सांगितलंय की मोठ्या प्रमाणावर निर्बंध चुकवण्याच्या प्रयत्नांचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. रशियाला पाठिंबा दिल्यासही त्यांना बीजिंगला त्याची किंमत चुकवावी लागेल,” असं सुलिव्हन म्हणाले. दरम्यान, पोलंड सीमेजवळील युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण तळावर रशियाने रविवारी हल्ला केला. क्रूझ क्षेपणास्त्रांनी केलेल्या या हल्ल्यात 35 जणांचा मृत्यू झाला, तर 134 जखमी झाले. पोलंड ‘नाटो’चा सदस्य असून त्या देशाच्या सीमेलगतचा हा प्रशिक्षण तळ युक्रेनला पाश्चिमात्य मदत पुरवण्यासाठीचे प्रमुख केंद्र असल्याने रशियाने या तळावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नाटो देशांना रशिया लवकरच नाटो देशांवर हल्ले करेल असा इशारा दिलाय.
तसेच युरोपातील सहकारी देशांसोबत आम्ही ठामपणे उभे राहू. नाटो देशाच्या एक एक इंच जमिनीच्या रक्षणासाठी आम्ही पुढाकार घेऊ. तसेच अन्य देशांना त्यासाठी प्रेरित करू. नाटो देशांची रशियाशी लढाई झाल्यास तिसरे महायुद्ध अटळ होईल. मात्र, तिसरे महायुद्ध होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे बायडन यांनी स्पष्ट केले. उत्तर अटलांटिक संधी संघटन म्हणजेच नाटो हा ३० उत्तर अमेरिका आणि युरोपीय देशांचा एक समूह आहे. याचा उद्देश राजकीय आणि सैन्य साधनांच्या माध्यमातून आपल्या सदस्य देशांचे स्वातंत्र्य आणि संरक्षणाची हमी देणे असा असल्याचे सांगितले जात आहे.

