Tarun Bharat

रसिकरंजनतर्फे आज ‘ओ दूर के मुसाफीर’ कार्यक्रम

प्रतिनिधी/ बेळगाव

रसिकरंजन संस्थेतर्फे दि. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे अभिनेता दिलीपकुमार यांच्यावर आधारीत ‘ओ दूर के मुसाफीर’ हा कार्यक्रम होणार आहे. संस्थेचे सचिव असलेले कै. एस. पी. उपाध्ये यांनी त्यांच्या निधनापूर्वी हा कार्यक्रम संकलीत केला होता.

दिलीपकुमार मुळचा पेशावर येथे जन्मलेला युसूफ सखरखान. हा जातीने पठाण. चौदा भावंडातला पाचवा. सिने क्षेत्रात तो अपघाताने आला आणि परिस्थितीने स्थिरावला. कष्ट करण्याची दुर्दम्य शक्ती, आत्मचिंतन आणि अभ्यास करण्याची प्रचंड जिद्द त्याचप्रमाणे झोकून देण्याची वृत्ती. यामुळे त्याने आपले व्यक्तीमत्व चित्रपट सृष्टीत कायमचे ठसविले.

पाकिस्तानातील अस्थिर परिस्थिती जाणून अनेक मुस्लिम परिवारांनी चाळीसाव्या दशकाच्या प्रारंभीच भारतात आश्रय घेतला होता. त्यामध्ये युसूफचा परिवार देखील होता. बॉम्बे टॉकीजच्या देविकाराणींनी सिमला येथे प्रथम युसूफला पाहिले. त्यांच्या नजरेने या तरुणातील सुप्त कलाकार हेरला. त्याला आपल्या मुंबईतील ऑफिसमध्ये बोलावून घेतले आणि ज्वारभाटा या आपल्या चित्रपटात नायकाची भूमिका दिली. त्याच्या युसूफ या नावात बदल घडवून त्याचे रुपांतर दिलीपकुमार असे केले. 1944 ते 1998 दरम्यान चौपन्न वर्षात छप्पन चित्रपटात काम केले. त्यापैकी पंधरा चित्रपटांनी सुवर्ण महोत्सव साजरा केला. तर अठरा चित्रपटांनी रौप्य महोत्सवी यश प्राप्त केले. आठ वेळा फिल्म फेअरचे उत्कृष्ट अभिनेत्यांचे पारितोषिक त्याला दिले गेले. हा हिंदी चित्रसृष्टीत एक विक्रम आहे.

ज्वारभाटाबाबत समिक्षा करताना फिल्म इंडियाचे संपादक बाबुराव पटेल यांनी नवख्या दिलीपवर खरमरीत टीका करत हा टीबी पेशंट कधीच नट बनू शकणार नाही! असे भाकीत वर्तविले होते. ते पुढे दिलीपकुमारने आपल्या कर्तृत्वाने खोटे ठरविले.

दिलीपकुमार महाराष्ट्रात राहिल्याने त्याला मराठी उत्तम प्रकारे समजत असे. मराठी रंगभूमिचा तो चाहता होता. आचार्य अत्रेंच्या, ‘तो मी नव्हेच’ या नाटकाने तो भारावून गेला होता. घाशीराम कोतवाल व सखाराम बाईंडर या विजय तेंडूलकरांच्या दोन नाटकांनी तो प्रभावित झाला होता. ‘आश्रुंची झाली फुले’ हे ही नाटक त्याला फार आवडले होते. विशेषतः त्यातील डॉ. काशिनाथ घाणेकरांच्या ‘लाल्या’ ने त्यांना भारावून सोडले होते. त्याच्यावरील हा कार्यक्रम विशेष असाच आहे. रसिकरंजनच्या सर्व सभासदांनी ओळखपत्रासह या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच अतिथी देणगी प्रवेशिका रंगमंदिरवर उपलब्ध असतील, असे कळविण्यात आले आहे.

Related Stories

सार्वजनिक वाचनालयातर्फे दिवाळी अंक प्रकाशित

Patil_p

सेंट पॉल्सचा पराभव करून कनक मेमोरियलची अंतिम फेरीत धडक

Amit Kulkarni

तालुक्यात म.ए.समितीच्या धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

जितो लेडीज विंगतर्फे पाककृती स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni

खानापूर शहर परिसरात तुळशी विवाह मंगलमय वातावरणात

Patil_p

काही भागातील बससेवा अद्यापही ठप्पच

Amit Kulkarni