आमदार प्रकाश आवाडे-नगराध्यक्षा अलका स्वामी आमने-सामने
प्रतिनिधी / कोल्हापूर
इचलकरंजी शहरातील गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खुदाईवरुन पालिकेतील सत्ताधारी गटातच शनिवारी ठिणगी पडली आहे. या प्रश्नावरुन आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना खडे बोल सुनावल्यानंतर नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी मुख्याधिकार्यांचीच पाठराखण केल्याने आमदार आवाडे चांगलेच संतापले. सत्ताधारी गटातीलच हा प्रकार पाहून ताराराणी सभागृह आवाक झाले.
पालिकेत हाळवणकर, आवाडे, मदन कारंडे गट एकत्र येत महिन्याभरापूर्वीच संयुक्त सत्ता स्थापन केली. सध्या शहरात गॅस पाईपालाईन टाकण्याचे काम गतीने सुरु आहे. काही दिवसांपूर्वी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या उपस्थितीत गॅस पाईपलाईन कामाचा शुभारंभ झाला होता. मात्र या कामावरुनच अल्पावधितच आघाडीत धुसफूस असल्याचे शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समोर आले. पाईपलाईन खोदाईच्या कामावरुन आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना चांगलेच धारेवर धरले. काल केलेले नविन रस्ते का उकरताय ? असा सवाल करीत मुख्याधिकार्यांवर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. आवाडे यांची भूमिका योग्य असल्याचे समजून काही सदस्यांनीही त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. मात्र काही समजण्यापूर्वीच नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी जागेवर उभे रहात आवाडे यांचा आरोप खोडून काढला. पालिकेने आजपर्यंत पाईपलाईनच्या कामामध्ये कोणताही नविन केलेला रस्ता खोदला नाही. जुन्या रस्त्यावरच पाईपलाईन टाकली जात आहे. खोदकाम झालेला रस्ता पाईपलाईन बुजवल्यानंतर तातडीने दुरुस्त केला जातो. असे स्पष्ट केल्याने पुढील वादावर पडदा पडला. मात्र सत्ताधारी गटातच वाद सुरु झाल्याने या सत्तेचे पुढे काय होणार ? अशी चर्चा बैठकीनंतर होती.