Tarun Bharat

रस्त्यावरच्या लढाईतील हिरो…

पोलीस कॉन्स्टेबल ते शेतकरी नेता

दिल्लीच्या सिंघु बॉर्डर, गाझियाबादचे नाव गेले काही दिवस कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आहे. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने शेतकरी धरणे आंदोलनावर आहेत. यात पंजाब, हरियाणातील शेतकऱयांचा सहभाग लक्षणीय आहे. हजारो स्वयंसेवक, अनेक सेवाभावी संस्था आंदोलकांच्या दिमतीला आहेत. लंगरमध्ये पंजाबी पदार्थांची रेलचेल सुरू आहे. बोले सो निहाल… हर मैदान फतेह… असा सूर आसमंतात घुमतो आहे. लोकगीतांतून आंदोलकांना बळ दिले जात आहे. पोलिसांकडून होणारा पाण्याचा मारा, लाठय़ा, अश्रूधूर सहन करत आंदोलकांचे मनोबल टिकून आहे. या आंदोलनाचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, ते शेतकरी नेते राकेश टिकैत गेले काही दिवस चर्चेत आहेत.

 राकेश टिकैत गेले दोन महिने दिल्लीच्या गाझिपूर सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. एकेकाळी टिकैत हे दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल होते. 51 वर्षीय टिकैत यांचा विवाह 1985 मध्ये सुनिता देवी यांच्याशी झाला. त्यांना तीन मुले आहेत. मुलगा चरण सिंह आणि मुली सीमा आणि ज्योती असा हा परिवार आहे. छोटी मुलगी ज्योती ऑस्ट्रेलियात राहते. भारतात कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱया शेतकऱयांना समर्थन देण्यासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात आठ फेब्रुवारीला रॅलीचे आयोजन केले होते. त्या रॅलीत ज्योती यांचा सहभाग होता. त्यांनी ऑस्टेलियातील लोकांना शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते.

 राकेश टिकैत हे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील सिसौली गावचे आहेत. मेरठ विश्वविद्यालयातून त्यांनी मास्टर ऑफ आर्टची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी कायद्याची पदवीही घेतली. 1992 मध्ये ज्यावेळी टिकैत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल होते, त्यावेळी त्यांची वडील महेंद्र सिंह टिकैत यांच्या नेतृत्वाखाली डंकल प्रस्तावासाठी शेतकरी आंदोलन सुरू होते. आंदोलन मागे घेण्यासाठी राकेश यांनी मध्यस्थी करावी, यासाठी सरकारकडून दबाव येत होता. मात्र, राकेश यांनी तसे करण्याऐवजी नोकरीचाच राजीनामा दिला आणि शेतकरी आंदोलनात उतरले.

राजकीय एन्ट्री…

 2007 मध्ये मुखफ्फरनगरातील खतौली विधानसभा मतदारसंघातून प्रथम त्यांनी अपक्ष म्हणून काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविली. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर 2014 मध्ये त्यांनी अमरोहा मतदारसंघातून राष्ट्रीय लोकदलाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूकही लढविली. त्यावेळी त्यांना केवळ 9 हजार 539 मते मिळाली आणि अनामतही जप्त झाली. त्यावेळी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांची संपत्ती 4 कोटी 25 लाख 18 हजार 38 एवढी होती.

कोटय़वधींची संपत्ती…

राकेश टिकैत यांची चार राज्यात संपत्ती आहे. जमीन, पेट्रोल पंप, शोरुम, वीट भट्टी यांसह अन्य स्वरुपात ही संपत्ती आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि महाराष्ट्रात त्यांच्या उद्योगाचे साम्राज्य आहे. जवळपास हा आकडा 80 कोटीच्या घरात असल्याचा अंदाज आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी

 टिकैत यांच्या परिवारात चार भाऊ आहेत. राकेश यांचे ज्येष्ठ बंधू नरेश भरतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर स्वतः राकेश टिकैत भरतीय किसान युनियनचे प्रवक्ते आहेत. त्यांचे लहान भाऊ सुरेंद्र साखर कारखान्याचे मॅनेजर आहेत. तर सर्वात लहान भाऊ शेती सांभाळतात. वडिलांच्या निधनानंतर राकेश यांनी किसान युनियनचे नेतृत्व सांभाळले.

44 वेळा तुरुंगवारी…

 शेतकऱयांच्या प्रश्नावर आंदोलन करतांना आजवर त्यांना 44 वेळा जेलमध्ये जावे लागले. मध्यप्रदेशातील भूमी अधिग्रहण कायद्याविरोधतील आंदोलनात ते तब्बल 39 दिवस कारागृहामध्ये होते. त्यानंतर दिल्लीत लोकसभेबाहेर ऊसाला वाढीव भाव मिळण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात ऊस पेटवून दिल्यामुळे त्यांना तिहार जेलमध्ये पाठविण्यात आले होते. राजस्थानमध्येही बाजरीला वाढीव दर मिळावा, यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना जयपूर कारागृहामध्ये जावे लागले होते. राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंह यांनी त्यांना 2014 मध्ये लोकसभचे तिकीट दिले होते.

अश्रू बनले ज्वाला

 26 जानेवारीला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आंदोलकांनी आपला ध्वज फडकविला. आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. त्याचा परिणाम म्हणून आंदोलन बॅकफूटवर जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, राकेश टिकैत यांच्या 28 जानेवारीच्य एका भाषणाने पुन्हा आंदोलकांना बळ मिळाले. या भाषणात दिल्लीतील हिंसाचाराने शेतकरी आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याचे सांगताना त्यांना रडू कोसळले. त्यांचे हे अश्रू या आंदोलनासाठी जणू ज्वालाच बनल्या. त्यामुळे आंदोलन पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले.

                         सोशल मीडियाचा प्रभावी वापर

 भारतीय किसान युनियनचे आंदोलन एकाचवेळी अनेक पातळय़ांवर लढले जात आहे. यात सोशल मीडियाचाही रोल मोठा आहे. टिकैत यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आंदोलनाचा प्रत्येक टप्पा जाहीर केला जातो. कोणत्या भागात आंदोलन होणार, त्यात कोण सहभागी होणार याची इत्यंभूत महिती त्यांच्या तसेच किसान युनियनच्या हँडलवर दिली जाते. तसेच सरकारच्या तसेच आंदोलन विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिले जाते. यावेळी अनेक चॅनेल्सवरून त्यांच्या मुलाखतीही सुरू असतात. त्यामुळे आंदोलनाला दिशा मिळत आहे.

           ट्विटरयुद्ध रंगले

 ख्यातनाम बार्बेडियन सिंगर आणि अभिनेत्री रिहाना हिने दिल्लीनजीक सीमेवर शेतकऱयांना अडविण्यासाठी टाकण्यात आलेले अडथळे आणि इंटरनेट सुविधा तोडल्याच्या मुद्यावर ‘आपण कुणी यावर बोलणार आहोत का?’, असे ट्विट केले. तिच्या या ट्विटचे जगभर पडसाद उमटले. फार्मर्स प्रोटेस्ट हा हॅशटॅग वापरत केलेल्या या ट्विटपाठोपाठ पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या भाची मीना हॅरिस यांनीही शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केले. त्यानंतर भारतीय सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेते अक्षयकुमार, कंगना राणावत यांनीही प्रत्युत्तरादखल ट्विट केले. तसेच केंद्र सरकारलाही आपली प्रतिक्रिया द्यावी लागली.

        आंदोलन देशभर नेणार

 राकेश टिकैत किमान हमीभावाच्या (मिनिमन सपोर्ट प्राईस) मुद्यावर ठाम आहेत. आगामी काळात हे आंदोलन राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल या राज्यात विस्तारण्याचा त्यांचा मनोदय आहे. केवळ किमान हमीभावच नव्हे, तर शेतकऱयांच्या अन्य मुद्यावरही हे आंदोलन चालविले जाणार आहे. मच्छीमारांच्या प्रश्नावर, विशेषतः छोटय़ा मच्छीमारांना पर्ससीन बोटींमुळे उद्भवणाऱया समस्येवर काम करण्याचा टिकैत यांचा मनोदय आहे. आगामी काळात तामिळनाडू, प. बंगालच्या निवडणुका आहेत. त्यामुळे किसान आंदोलन या निवडणुकांवर प्रभाव टाकू शकते, अशी सद्यस्थिती आहे.

Related Stories

ममतांची मुंबई भेट

Patil_p

राष्ट्रभक्त अहिल्यादेवी होळकर

Patil_p

मनाला ताब्यात कसे ठेवावे

Patil_p

खासगी विना अनुदानित शाळा संस्था संकटात

Patil_p

मनही आजारी पडते हे लक्षात घ्यायला हवे…

Patil_p

कोरोना महामारी थोपविणे सामान्यांच्याच हाती

Patil_p