Tarun Bharat

राजस्थानचा ‘वनवास’ संपुष्टात येणार का?

2008 मधील पहिल्यावहिल्या जेतेपदानंतर तब्बल 12 वर्षे राजस्थानची पाटी कोरीच

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

2008 मध्ये पहिल्यावहिल्या आयपीएल स्पर्धेत शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने जेतेपद संपादन केले. पण, आश्चर्य म्हणजे त्यांच्यासाठी हे या स्पर्धेतील आजवरचे एकमेव जेतेपद ठरत आले आहे. त्यानंतर 12 वर्षांचा कालावधी त्यांच्यासाठी जेतेपदाचा दुष्काळ घडवणारा ठरला. हा ‘वनवास’ यंदा तरी संपुष्टात येणार का, हे या हंगामात स्पष्ट होईल.

नव्याने जडणघडण केल्या गेलेल्या या संघाला यंदा यशश्री खेचून आणण्याची अपेक्षा असेल. मात्र, कमी ताकदीचे भारतीय खेळाडू आणि विदेशी खेळाडूंवर अधिक भिस्त या त्यांच्या कमकुवत बाजू असणार आहेत.

मागील हंगामातील वूडन स्पूनर्स ठरलेल्या या संघाच्या व्यवस्थापनात फेरफार झाले आहेत. शिवाय, संघातही बदल झाले आहेत. संजू सॅमसनने ऑस्ट्रेलियन स्टीव्ह स्मिथची जागा घेतली आहे तर प्रशिक्षक ऍन्डय़्रू मॅकडोनाल्डना मुक्त केले गेले असून लंकन महान खेळाडू कुमार संगकारा यंदा डायरेक्टर ऑफ क्रिकेटच्या भूमिकेत असणार आहे.

यापूर्वी हा संघ जोफ्रा आर्चरवरच सर्वस्वी अवलंबून होता. यंदा त्यांनी दक्षिण आफ्रिकन अष्टपैलू ख्रिस मॉरिसलाही करारबद्ध केले. अर्थात, यासाठी त्यांनी मोजलेली 16.25 कोटी रुपयांची रक्कम मात्र आश्चर्यकारक ठरली आहे. आयपीएल लिलाव इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडूही ठरला आहे. मागील हंगामात सर्वात मौल्यवान खेळाडू ठरलेल्या जोफ्रा आर्चरचे पहिल्या काही सामन्यात न खेळणे मात्र या संघासाठी धक्का देणारे ठरु शकते. राजस्थान रॉयल्सची या मोसमातील पहिली लढत दि. 12 एप्रिल रोजी पंजाब किंग्सविरुद्ध मुंबई येथे खेळवली जाणार आहे.

या संघातील भारतीय खेळाडूंमध्ये सातत्य नाही, ही या संघाची मुख्य चिंता आहे. संजू सॅमसनने मागील कित्येक हंगामात क्वचितच सलग 5 वेळा दमदार खेळी साकारली असेल. 2018 मध्ये 11.5 कोटी रुपयांना करारबद्ध केल्या गेलेल्या जयदेव उनादकटने निराशाच केली असून मनन वोहरा काही मोजक्या वेळी अपेक्षापूर्ती करु शकला आहे.

साहजिकच, रियान पराग, यशस्वी जैस्वाल, जलद गोलंदाज कार्तिक त्यागी या युवा खेळाडूंकडून संघाला अधिक अपेक्षा असणार आहेत. राजस्थान रॉयल्सने खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी वेळोवेळी बराच निधी खर्ची घातला आहे. मात्र, स्टोक्सचा अपवाद वगळता अन्य एकही खेळाडू त्यांच्या अपेक्षांना खरा उतरु शकलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

संजू सॅमसनला संधी

संजू सॅमसनचा फॉर्म व सातत्य या दोन्हींबाबत नेहमी प्रश्नचिन्ह असते. टी-20 मध्ये संधी मिळूनही याचा त्याला कित्येकदा लाभ घेता आलेला नाही. जे सूर्यकुमार यादव, इशान किशन यांनी करुन दाखवले, त्यापासून हा खेळाडू कित्येक कोस दूर राहिला. मात्र, या स्पर्धेच्या निमित्ताने संजू सॅमसनला आणखी एक संधी मिळाली असून याचे सोने केल्यास त्याचा आगामी दोन विश्वचषक स्पर्धांसाठी विचार होऊ शकतो.

राजस्थान रॉयल्स संघ ः संजू सॅमसन (कर्णधार व यष्टीरक्षक), जोस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, यशस्वी जैस्वाल, मनन वोहरा, अनूज रावत, रियान पराग, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, मयांक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, ऍन्डय़्रू टाय, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रहमान, चेतन सुकारिया, केसी करिअप्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंग.

अनेक विस्फोटक फलंदाज ही मजबूत बाजू

राजस्थान रॉयल्स संघात जागतिक स्तरावरील दिग्गज असे अनेक विस्फोटक फलंदाज समाविष्ट आहेत आणि हीच त्यांची जमेची बाजू आहे. या विस्फोटक फलंदाजांमध्ये प्रामुख्याने जोस बटलर व बेन स्टोक्स या मॅचविनर्सचा समावेश होतो. दक्षिण आफ्रिकन डेव्हिड मिलर व ख्रिस मॉरिस हे देखील विस्फोटक फलंदाजी करु शकतात. शिवाय, इंग्लंडचा टी-20 स्पेशालिस्ट लियाम लिव्हिंगस्टोन देखील दिमतीला आहेच. मागील हंगामातील फाईंड ठरलेला अष्टपैलू राहुल तेवातिया जागतिक स्तरावरील अव्वल गोलंदाजीची चिरफाड करु शकतो आणि हे त्याने यापूर्वी अनेकदा सिद्ध करुन दाखवले आहे. संगकारासारखा कुशल प्रशिक्षक लाभलेला आहे, ही देखील राजस्थानची जमेची बाजू आहे.

प्ले-ऑफपर्यंतचा रस्ताही बिकट?

संगकारासारखा प्रशिक्षक व स्टोक्स, बटलरसारखे अव्वल खेळाडू या संघात असले तरी अन्य खेळाडू त्या तोलामोलाचे नाहीत, ही राजस्थान रॉयल्सची मुख्य अडचण आहे. विदेशी खेळाडूंवरच अधिक अवलंबून असणारा हा संघ यंदा नव्या खेळाडूंकडून भरीव योगदानाच्या अपेक्षेत आहे. पण, अपेक्षित मिलाफ साधला गेला नाही तर या संघासाठी प्ले-ऑफपर्यंतचा रस्ता देखील बिकट ठरु शकतो. अशा वेळी चमत्कार घडण्याचीच त्यांना अपेक्षा करावी लागेल.

Related Stories

इंग्लंड संघाची विजयाकडे वाटचाल

Patil_p

अर्जेंटिनाचा उरूग्वेवर निसटता विजय

Patil_p

उबेर चषक – कोरियाकडून भारताचा एकतर्फी धुव्वा

Patil_p

रवि दहियाच्या ऑलिम्पिक पदकाची ‘नहरी’ला प्रतीक्षा!

Patil_p

वैयक्तिक पुरस्कारात हर्षल पटेलची बाजी

Patil_p

तर लाळेचा वापर करण्यास हरकत नसावी

Patil_p