Tarun Bharat

राजस्थाननंतर महाराष्ट्र?

राजस्थान सरकार गडगडले तर त्यानंतर भाजप ‘ऑपरेशन महाराष्ट्र’ सुरू करेल असे काँग्रेसमध्ये ठामपणे सांगितले जात आहे. राजस्थान सध्या जात्यात आहे, तर महाराष्ट्र सुपात आहे.

ज्या अजब पद्धतीने राजस्थानात घडामोडी घडत आहेत त्यामुळे अशोक गेहलोत सरकार अजून फार काळ टिकले तर ते जगातील नवीन आश्चर्य ठरेल. गेहलोत यांच्याकडे बहुमत नाही असे नाही. पण आपल्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याची संधीच दिली जात नाही हे मुख्यमंत्र्यांचे दुखणे आहे. राज्यपाल कलराज मिश्रा राज्य विधानसभेचे सत्रच बोलावत नसल्याने आम्हाला राष्ट्रपती रामनाथ कोविद यांना साकडे घालावे लागेल. याचबरोबर ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दारात घेऊन जाण्यासाठी दिल्लीत मोर्चा काढावा लागेल असे निर्वाणीचे बोल गेहलोत यांना बोलावे लागत आहेत याचा अर्थ प्रत्येकाने काय तो काढावा.

कर्नाटक, मध्य प्रदेशमधील काँग्रेस अथवा काँग्रेसप्रणीत सरकारे उलथवल्यावर राजस्थानमधील घटना घडत आहेत. तेथील काँग्रेस सरकारच्या मुळावर सारेच उठले आहेत अशी शंका यावी असे हे घटनाक्रम आहेत. उच्च न्यायालय सर्वोच्य न्यायालयाच्या 5-सदस्यीय खंडपीठाचा अरुणाचल प्रदेश विधानसभा अध्यक्षांच्या कृती संदर्भात 1992 साली दिलेला निकाल पाळत नाही असे विचित्र आरोप राजस्थानात होत आहेत. सगळय़ा संस्थाच खिळखिळय़ा झाल्या आहेत आणि कायद्याचे राज्य आणि घटनेनुसार चालणारे राज्य ही लोकशाहीतील संकल्पना मोडीत काढली गेली आहे आणि त्याऐवजी ‘राज्यकर्त्यांचे राज्य’ सुरू झालेले दिसत आहे. सत्ताधारी म्हणतील ती पूर्व दिशा, असा अजब न्याय बघायला मिळत आहे असे विरोधकांचे गाऱहाणे आहे. एकीकडे भाजप विरोधकांवर सरकारी तपास संस्थांचे धाडसत्र सुरू झालेले राजस्थानात दिसत आहे तर दुसरीकडे विरोधकांची टीका आम्ही फार सकारात्मक पद्धतीने घेत असतो आणि आमच्या कामात त्यानुरूप बदल घडवत असतो असे पंतप्रधान म्हणत आहेत. कोण कितपत चूक की बरोबर ते येणारा काळच दाखवेल. 

 बंडखोर सचिन पायलट यांचे भाजपबरोबरील साटेलोटे दररोज जास्त स्पष्ट दिसू लागले आहे. ‘मी काँग्रेसमध्येच आहे, भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’ असा दावे करणारे पायलट सध्या भाजपशासित हरियाणामधील एका आलिशान हॉटेलमध्ये सरकारी पाहुणचार घेत आहेत असे आरोप होत आहेत, जे फारसे चुकीचे  वाटत नाहीत.  याला कारण हे बंड केल्यापासून पायलट हे राजस्थानात फिरकले देखील नाहीत. यातून त्यांची ताकद किती आहे हे ध्यानात येते आणि दुसरीकडे त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे कळत आहे. आता न्यायालयातील सुनावणीत त्यांनी या खटल्यात केंद्रालादेखील समाविष्ट करावे असे सांगितल्याने ते कोणत्या बाजूचे आहेत ते राजकारणातील अनभिज्ञालादेखील कळलेले आहे.

 राजस्थानमध्ये पुढील घटना कशाप्रकारे घडणार त्यावर तेथील राजकारण काय वळण घेणार हे अवलंबून आहे. पायलट यांना पुढे करून तेथील प्रस्थापित नेता असलेल्या वसुंधराराजे यांना निकालात काढण्याचा डाव खेळला गेला तर मोदी-शहा यांच्यावर ही खेळी उलटू शकते. मध्य प्रदेशमध्ये सध्या कोरोनाग्रस्त झालेले मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राज्यातील वाढत्या प्रभावाने हैराण आहेत. राज्यात ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे चौहान आपला खरोखरच मामा बनवला जात आहे अशा भावनेने त्रस्त आहेत आणि अशातच राज्यातील 24 पोटनिवडणुका कधीही घोषित होऊ शकतात. शिंदे यांचा गृहप्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱया चंबळ विभागात यापैकी 16 निवडणुका आहेत. तिथे शिंदे यांचे पानिपत करण्यासाठी काँग्रेस तसेच भाजपमधील काही ज्ये÷ नेते तयारीला लागले आहेत.   

पायलट अतिमहत्त्वाकांक्षी आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्रीपद म्हणजे त्यांच्याकरता एक स्टोपगॅप योजना होती. कारण त्यांचा डोळा हा पंतप्रधान पदावर आहे आणि त्याकरता त्यांना काँग्रेस अध्यक्ष व्हायचे होते याची खात्री आता पक्षातील नि÷ावंतांना होऊ लागली आहे. सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी आता पूर्णपणे गेहलोत यांच्या मागे उभे आहेत. हे भयानक कारस्थान आपल्याला कळले कसे नाही याचे राहुल यांना वैषम्य वाटत आहे. पण याचबरोबर काँग्रेस सरकारांवर येन केन प्रकारेण वरवंटा फिरवण्याचे काम भाजप चालू ठेवेल असा त्यांचा होरा आहे. राजकारणाचा रंगच न्यारा असतो. आपला विरोधक आपले कांडात काढणार आहे याची जाणीव असूनही एकमेकांना राजकीय चिमटे काढले जातात. नागपंचमीच्या दिवशी काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी राजकारणातील सर्व नागसापांना सदिच्छा दिल्या होत्या. तुमचे राजनीतिक दंश पचवण्याची शक्ती देशाच्या मजबूत लोकशाहीत आहे असा विश्वास व्यक्त केला होता. पण तो फक्त तोंडदेखला होता असे समजायला हरकत नाही. कारण त्याच दिवशी पक्षाचे दुसरे प्रवक्ते कपिल सिब्बल यांनी राजस्थानच्या घटनाक्रमावर चिंता व्यक्त करून ‘सारेच दीप कसे मंदावले आता, ज्योती विझू, विझू लागल्या’ असा कवी अनिल यांच्याप्रमाणे सूर लावला. ‘आम्ही वकील मंडळी झगे घालून न्यायालयात कशाकरता बरे जातो? आता हा झगाच फेकून द्यावा असे वाटत आहे’, असे एक प्रकारचे स्वगतच त्यांनी म्हणून बऱयाच वकील मंडळींमध्ये असलेल्या वाढत्या अस्वस्थतेला तोंड फोडले आहे. ज्ये÷ वकील प्रशांत भूषण यांच्याविरुद्व न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला सर्वोच्च न्यायालयाने लावला आहे त्यानेदेखील वाद वाढला आहे.  

 या आठवडय़ाची सुरुवातच ‘लोकशाहीसाठी आवाज उठवा’ या काँग्रेसच्या मोहिमेने झालेली आहे. येन केन प्रकारेण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह  हे काँग्रेसची एकानंतर एक सरकारे साम-दाम-दंड-भेद करून पाडतील अशी भीती त्या पक्षात वर्तवली जात आहे. त्यात कितपत तथ्य आहे ते येता काळ दाखवेल, पण काँग्रेसमध्ये मात्र राजस्थान सरकार सरतेशेवटी गडगडले तर त्यानंतर भाजप ‘ऑपरेशन महाराष्ट्र’ सुरू करेल असे ठामपणे सांगितले जात आहे. राजस्थान सध्या जात्यात आहे, तर महाराष्ट्र सुपात आहे. ‘सरकार तीन चाकी पण स्टीयरिंग माझ्या हातात’ असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. ‘ऑपेरेशन लोटस’ ला महाराष्ट्रात थारा नाही असे सांगत ‘आपले सरकार पाडाच’ असे आव्हान देत आहेत. तात्पर्य काय तर भावी काळ हा फार उलथापालथीचा असू शकतो. छत्तीसगड आणि पंजाब या दोन राज्यात काँग्रेस सरकार पडण्याची सध्या तरी भीती नाही कारण तिथे सत्ताधारी पक्ष मजबूत आहे. 

Related Stories

रेती व्यवसायातील बजबजपुरी

Amit Kulkarni

शिवसेनेची कोकणातील स्थिती काय सांगते?

Patil_p

कोव्हिड काळातील कृषी अर्थव्यवहार

Amit Kulkarni

मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई ः उशिरा सूचलेले शहाणपण…

Patil_p

करू भक्तीभावाची आरती, नको कोरोनाची भरती!

Patil_p

ढग विरतील, प्रकाश पसरेल !

Patil_p