Tarun Bharat

राजस्थान रॉयल्स-सीएसके लढत आज

Advertisements

आयपीएल : दोन्ही संघांना विजयाची नितांत गरज

वृत्तसंस्था / अबु धाबी

यावर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांची स्थिती एकसारखीच झाली असून एका संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्याच्या आशेला धक्का बसण्याची शक्यता आहे. याच दोन संघांत सोमवारी येथे लढत होत असून सायंकाळी 7.30 पासून या सामन्याला सुरुवात होईल.

दोन्ही संघांना आतापर्यंतच्या सामन्यांत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गुणतक्त्यात चेन्नई व राजस्थान अनुक्रमे सहाव्या व सातव्या स्थानावर असून नऊ सामन्यांत दोघांनी प्रत्येकी 6 गुण मिळविले आहेत. पण सरस धावगतीमुळे चेन्नई संघाला वरचे स्थान मिळाले आहे. दोन्ही संघांचे अद्याप पाच सामने बाकी राहिले असून पुढील फेरी गाठण्याचे त्यांचे मार्ग कठीण होऊन बसले आहेत. यापुढे कोणतीही चूक महाग पडू शकते, याची दोन्ही संघांना पूर्ण जाणीव आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात दोन्ही संघांना प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नईला दिल्ली कॅपिटल्सने पाच गडय़ांनी हरविले तर राजस्थानला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने 7 गडय़ांनी पराभूत केले होते.

अष्टपैलू ब्रॅव्हो जखमी झाल्याने चेन्नईसाठी हा मोठा धक्का आहे. धोंडशिरेच्या दुखापतीमुळे तो काही दिवस खेळू शकणार नसल्याचे सांगण्यात आले. धोनीच्या चतुर नेतृत्वामुळे हैदराबादवर विजय मिळविल्यानंतर चेन्नईच्या मोहिमेत थोडी जान आली होती. पण खराब क्षेत्ररक्षण आणि शिखर धवनचे शानदार नाबाद शतक यामुळे चेन्नईला कॅपिटल्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. 25 व 79 धावांवर असताना जीवदाने मिळालेल्या धवनचे हे आयपीएलमधील पहिले शतक होते. फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने जडेजाने टाकलेल्या शेवटच्या षटकात तीन षटकार ठोकत दिल्लीला विजय मिळवून दिला. चेन्नईचा हा सहावा पराभव होता. धवनला धावचीत करण्याची संधीही त्यांनी गमविली होती. त्यामुळे या विभागात सुधारणा करण्याची आशा कर्णधार धोनी करीत आहे.

राजस्थानची स्थितीही अवघड असून विजय मिळविण्यासाठी त्यांना मार्ग शोधावे लागणार आहेत. कर्णधार स्टीव्ह स्मिथला पुन्हा गवसलेला सूर ही त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. त्याने शनिवारी 57 धावांची खेळी केली. मात्र स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सला संघात दाखल झाल्यापासून अजून अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही तर बटलरच्या फलंदाजीत सातत्य नाही. संजू सॅमसन पहिल्या दोन सामन्यात धडाडल्यानंतर आता तो शांत झाला आहे तर उथप्पाला आघाडीवर अजून पुरेसा फॉर्म सापडलेला नाही. आरसीबीविरुद्ध सलामीस येत त्याने 22 चेंडूत 41 धावा फटकावल्या होत्या. आता त्याला मोठय़ा खेळीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आरसीबीच्या बलाढय़ फलंदाजीपुढे जोफ्रा आर्चरच्या नेतृत्वाखालील त्यांची गोलंदाजीही सामान्य वाटली होती. राजस्थानला या विभागातही सुधारणा करावी लागणार आहे.

संघ : राजस्थान रॉयल्स : स्मिथ (कर्णधार), बटलर, स्टोक्स, सॅमसन, टाय, राजपूत, एस.गोपाल, तेवातिया, उनादकट, मयांक मार्कंडे, लोमरोर, ओशेन थॉमस, रियान पराग, जैस्वाल, अनुज रावत, आकाश सिंग, मिलर, व्होरा, शशांक सिंग, वरुण ऍरोन, टॉम करण, उथप्पा, अनिरुद्ध जोशी, आर्चर.

सीएसके : धोनी (कर्णधार), विजय, रायुडू, डय़ु प्लेसिस, वॅटसन, जाधव, ब्रॅव्हो, जडेजा, एन्गिडी, दीपक चहर, चावला, ताहिर, सँटनर, हॅझलवुड, ठाकुर, सॅम करण, जगदीशन, केएम असिफ, मोनू कुमार, साई किशोर, रुतुराज गायकवाड, कर्ण शर्मा.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.

Related Stories

भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

Patil_p

रशियाचा मेदव्हेदेव विजेता

Patil_p

भारत-श्रीलंका महिला संघात आज दुसरी टी-20

Patil_p

आत्मघातकी फलंदाजीचा भारताला फटका

Patil_p

लालचंद राजपूतला कोरोनाची बाधा

Patil_p

उमेश यादव इंग्लिश कौंटी स्पर्धेतून बाहेर

Patil_p
error: Content is protected !!