Tarun Bharat

राजापूर पंचायत समिती सभापती लाड यांचा राजीनामा

वार्ताहर / राजापूर

गेले काही दिवस सुरू असलेल्या राजापूर पंचायत समितीच्या सभापती बदलाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राजापूर पंचायत समितीच्या विद्यमान सभापती विशाखा लाड यांनी राजीनामा दिला असून नव्या सभापती निवडीपर्यंत सभापती पदाचा पदभार उपसभापती प्रकाश गुरव यांच्याकडे असणार आहे.

राजापूर पंचायत समितीमध्ये बहुमतात असलेल्या शिवसेनेमध्ये मागील काही दिवस सभापती बदलाच्या हालचाली सुरू होत्या. पंचवार्षिक निवडणुकीनंतर सभापती व उपसभापती पदी सव्वा-सव्वा वर्षे संधी देण्याचे धोरण सेनेने ठरविले होते. मात्र आता शिवसेनेतील इच्छूकांची संख्या लक्षात घेता हा कार्यकाल नऊ महिन्यांचा करून उर्वरीत सदस्यांना संधी देण्याचे धोरण शिवसेनेकडून ठरविण्यात आले आहे. त्यानुसार आधी ठरलेला कार्यकाल पूर्ण होण्याआधीच सभापती व उपसभापती बदलण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आला. सभापती बदलावरून सेनेत अंतर्गत संघर्षाचीही चर्चा होती. त्यामुळे सभापती बदल होणार कि नाही याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.
या पार्श्वभूमीवर विद्यमान सभापती विशाखा लाड यांनी सोमवारी राजीनामा दिला असून जिल्हा परिषद अध्यक्षांनी तो मंजूर केला आहे. त्यामुळे सभापती बदलाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पुढील सभापतीची निवड होईपर्यंत सभापती पदाचा प्रभारी कार्यभार उपसभापती प्रकाश गुरव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून मंगळवारी ते पदग्रहण करणार आहेत.

राजापूरचे सभापतीपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्याने पुढील नऊ महिन्यासाठी केळवली पंचायत समिती गणाच्या सदस्या प्रमिला कानडे यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Related Stories

रिफायनरीचे समर्थन केले म्हणून जमातीतून बहिष्कृत करण्याची धमकी

Patil_p

खंडित वीज पुरवठय़ाबाबत अधिकाऱयांना जाब

NIKHIL_N

मिलाग्रीसच्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

NIKHIL_N

आयुर्वेद रुग्णालयात अतिदक्षता विभाग

tarunbharat

जुन्या शासकीय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट

NIKHIL_N

जिह्यात एसटीच्या 43 कर्मचाऱयांच्या बदल्या

Patil_p