Tarun Bharat

राजापूर शहराला पुन्हा पुराचा वेढा

वार्ताहर/ राजापूर

दोन दिवसांपासून कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे अर्जुना व कोदवली नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे राजपुर शहराला पुन्हा एकदा पुराचा वेढा पडला आहे.  सोमवारी दुपारी पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत आले होते. शिवाजीपथ, बंदरधक्का, वरचीपेठ रस्ता, गुजराळी रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. एकाच महिन्यात शहरात दुसऱयांदा पूर आला आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दोन आठवडय़ापूर्वी सलग दोन दिवस राजापूर शहर पुराच्या पाण्याखाली होते. त्यानंतर काही दिवसांची उसंत घेऊन पावसाने पुन्हा जोर धरला आहे. शनिवारपासून तालुक्यात सर्वत्रच पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. रविवारी रात्रीपासून अर्जुना व कोदवली नद्यांचे पाणी शहरात शिरू लागले. सोमवारी सकाळी शिवाजीपथ ते वरचीपेठ रस्ता पाण्याखाली होता. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे पुराच्या पाण्यामध्ये वाढ होत गेली, दुपारी पाणी जवाहर चौकातील ध्वजस्तंभाच्या वरपर्यंत आले होते.

 शिवजीपथ, बंदरधक्का, चिंचबांध, वरचीपेठ, गुजराळी आदी भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. वरचीपेठ रस्त्यावर पूराचे पाणी आल्याने शिळ, दोनिवडे, गोठणे दोनिवडे हा मार्ग बंद झाला आहे. शिवाय नदीकीनाऱयालतची भातशेतीही पाण्याखाली गेली आहे. कोदवली नदीचे पाणी जवाहर चौकात आल्याने जवाहर चौकात येणाऱया एसटी फेऱया डेपोतूनच सोडण्यात आल्या.

पुराच्या शक्यतेने नदीकिनाऱयालगतच्या व्यापाऱयांनी रात्रीच दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलविले. सकाळपासून वाढलेला पावसाचा जोर आणि वाढणाऱया पाण्याचा अंदाज घेऊन बाजारपेठेतील व्यापाऱयांनीही सामान सुरक्षित स्थळी हलविल्याने नुकसान झाले नाही. दरम्यान, प्रिंदावण बांदीवडे गावातून गेलेल्या सुखनदीचे पाणी प्रिंदावण, बांदीवडे, तळेखाजन आदी परिसरातील भातशेतीमध्ये शिरले आहे.

पुराचे पाणी वाढत असताना नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांच्यासह तहसीलदार प्रतिभा वराळे, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक सुभाष बाकाळकर, नगरसेवक गोविंद चव्हाण यांनी जवाहर चौक येथे पुरस्थितीची पाहणी केली.

Related Stories

जिल्हय़ातील मच्छी व्यवसाय ठप्प

tarunbharat

मालवण नगरपरिषदेसाठी अग्निशमन बंब मंजूर

Anuja Kudatarkar

ओटवणे चॅरीटेबल ग्रुप आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे आयोजन

NIKHIL_N

पत्रादेवी लाठी अखेर हटविली

NIKHIL_N

गणपतीपुळेत बुडून सांगलीतील तरूणाचा मृत्यू

Archana Banage

किराणा, भाजीपाला फक्त चार तास सुरू

NIKHIL_N