Tarun Bharat

राजीव गांधींची चूक, भाजप सतर्क

समर्थक समुदायाची नाराजी न ओढवून घेण्याचा प्रयत्न : राज्यातील राजकारणावर लिंगायत समुदायाचा मोठा प्रभाव

प्रतिनिधी /बेंगळूर

कर्नाटकातील लिंगायत समुदायाचा मोठा पाठिंबा भाजपला मिळत असतो. याचमुळे राज्यात नेतृत्वबदलाचा विचार करणाऱया भाजप नेतृत्वाने अद्याप सतर्क भूमिका बाळगली आहे. पक्ष कुठल्याही प्रकारे लिंगायत समुदायाला चुकीचा संदेश देऊ इच्छित नाही. सद्यकाळात मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा हे या समुदायाचे निर्विवादपणे राजकीय प्रतिनिधित्व करतात. पण ते 78 वर्षांचे झाल्यानेच पक्ष नव्या नेत्याकडे राज्याची धुरा देऊ पाहत आहे.

येडियुराप्पा आक्रमक हिंदुत्वाचे समर्थन करत नसल्याचे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचे म्हणणे आहे. अन्य अनेक भाजप नेत्यांच्या उलट येडियुराप्पांना अल्पसंख्याक आणि अन्य समुदायांच्या नेत्यांचे समर्थन प्राप्त आहे. राज्यातील लिंगायत समुदाय आर्थिकदृष्टय़ाही मजबूत आहे. राज्याला आतापर्यंत प्रामुख्याने लिंगायत समुदायाचाच मुख्यमंत्री लाभला आहे.

येडियुराप्पांना लिंगायत समुदायाचा पाठिंबा प्राप्त आहे. 2011 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले असता येडियुराप्पांनी भाजपशी असलेले नातेच तोडले होते. 2012 मध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष काढला होता. येडियुराप्पांनी 10 टक्के मते प्राप्त करून 2013 च्या निवडणुकीत भाजपच्या पराभवाला हातभार लावला होता. राज्यात लिंगायत समुदायाचे प्रमाण 17 ते 22 टक्क्यांदरम्यान आहे. उत्तर कर्नाटकातील 100 हून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये या समुदायाचा मोठा प्रभाव आहे. विद्यमान विधानसभेत या समुदायाचे 58 आमदार असून यातील 38 आमदार भाजपचे आहेत.

पाठबळ मिळविण्याचा प्रयत्न अयशस्वी

काँग्रेस पक्षाचे नेते आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1990 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील यांना राजीनामा द्यायला भाग पाडले होते. या घटनेनंतर लिंगायत समुदाय भाजपच्या बाजूने वळला होता. पाटील यांनी एक वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत 224 सदस्यीय विधानसभेतील 184 जागा जिंकून देत काँग्रेसला मोठा विजय मिळवून दिला होता. पण त्यांना पदावरून दूर केल्यावर काँग्रेस दोनवेळा राज्यात सत्तेवर आला आहे, पण लिंगायत समुदायाचे पाठबळ मिळविण्याचे त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.

भाजपची सावध पावले

येडियुराप्पांना हटवून भाजप तीच चूक करू इच्छित नाही. येडियुराप्पांना वयाच्या कारणावरून मुख्यमंत्रिपदावरून हटविताना पक्ष मोठी खबरदारी घेत असल्याचे मानले जात आहे. भाजपच्या नेतृत्वाने लिंगायत समुदायाशी संबंधित लक्ष्मण सवदी यांना उपमुख्यमंत्री करत याआधीच समुदायाचा पाठिंबा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप कर्नाटकात बदल इच्छिते, पण येडियुराप्पांसाठी सन्मानास्पद राजकीय क्षेत्रातील निरोप निश्चित करू इच्छिते. येडियुराप्पा यांच्या समर्थक मानल्या जाणाऱया शोभा करंदलाजे यांना केंद्रात मंत्रिपद देत याची सुरूवात करण्यात आली आहे. राज्यात 2023 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपकडे त्यांच्या तोडीचा दुसरा राज्यात तूर्तास तरी नाही.

बंगालचे राज्यपालपद?

सूत्रांनुसार येडियुराप्पांना पश्चिम बंगालमधील राज्यपालपदाचा प्रस्ताव देण्यात आला होता. प्रसंगी राजीनामा घ्या, पण पश्चिम बंगालमध्ये राज्यपालपद स्वीकारार्ह नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना येडियुराप्पांनी सांगितले असल्याचे समजते.

Related Stories

कर्नाटक किनारपट्टीला ‘तौक्ते’चा दणका

Amit Kulkarni

मायक्रो कन्टेन्मेंट झोन संख्येत वाढ

Amit Kulkarni

शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात तज्ज्ञ समिती देणार सरकारला अहवाल

Archana Banage

कर्नाटक: येडियुरप्पा सरकारवर कुमारस्वामींची टीका

Archana Banage

सरकारी कार्यालयात फोटो, व्हिडिओ काढण्यावर निर्बंध

Amit Kulkarni

बेळगाव- चिकोडी डेपोच्या बसेसना महाराष्ट्रात प्रवेश

Patil_p