Tarun Bharat

राजू शेट्टी यांनी स्वीकारला आमदारकीचा प्रस्ताव

प्रतिनिधी / कोल्हापूर

दोन दशकांपूर्वी शरद पवार यांना अंगावर घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रूपाने राज्यात शेतकऱयांची चळवळ उभी करणाऱया माजी खासदार राजू शेट्टी यांनी अखेर मंगळवार राष्ट्रवादीकडून आलेला विधान परिषदेच्या आमदारकीचा प्रस्ताव स्वीकारला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर शेट्टी यांची महत्वपूर्ण बैठक बारामतीतील गोविंदबागेत झाली. त्यामध्ये पवार यांनी दिलेली ऑफर शेट्टी यांनी स्वीकारली. त्यामुळे राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेतील जागेवर शेट्टी यांच्या निवड निश्चित मानली जात आहे. गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना विधानपरिषदेच्या आमदारकीचा प्रस्ताव दिला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार मंत्री पाटील यांनी शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना निरोप दिला होता. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेश कार्यकारीणीच्या सदस्यांची मते आजमावून घेतल्यानंतर शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शेतकऱयांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी ताकदीचा नेता म्हणून शेट्टीच प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे त्यांनीच विधानपरिषदेवरील आमदारकी स्वीकारावी, अशी मते स्वाभिमानीच्या प्रदेश कार्यकारिणीतील सदस्यांनी व्यक्त केल्यानंतर शेट्टी यांचा मार्ग सुकर झाल्याचे सांगण्यात आले.

बारामतीत महत्वपूर्ण बैठक
ज्येष्ठ नेते शरद पवार कोकण दौऱयावर असल्याने शेट्टी यांची त्यांच्याशी होणारी बैठक लांबणीवर पडली होती. पवार कोकण दौऱयावरून परतल्यानंतर मंगळवारी शेट्टी बारामतीला रवाना झाले. बारामतीतील शरद पवार यांची गोविंदबाग प्रसिद्ध आहे. गोविंदबागेत पवार-शेट्टी यांच्यात बैठक झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, स्वाभिमानीचे स्थानिक नेते सतीश काकडे, राजेंद्र ढवाण उपस्थित होते. पवार यांनी चर्चेपूर्वी शेट्टी यांना गोविंदबाग दाखविली. त्यातील शेतीविषयक केलेले विविध प्रयोग, उपक्रम दाखविले. त्यानंतर दोघांत चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या कोटय़ातून विधानपरिषदेवर जाण्यास शेट्टी यांनी होकार दिला.
शरद पवारांनी पाळला शब्द
गतवर्षी 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत पवार यांनी शेट्टी यांना विधानपरिषदेवर ‘स्वाभिमानी’ला संधी देण्याचा शब्द दिला होता. तो पवारांनी शेट्टी यांना संधी देऊन पाळला.

शिवारातून विधिमंडळात
गेल्या दोन दशकात राजू शेट्टी यांचा प्रवास संघर्षपूर्ण राहिला आहे. शिरोळमधून जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि थेट दोनवेळा खासदार राहिलेल्या शेट्टी यांनी शिवारातून संसदेत प्रवेश केला होता. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांना हातकंणगले लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या धैर्यशिल माने यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे ते पुन्हा शिवारात आले होते. आता पवारांनी दिलेल्या पॉवरमुळे शेट्टी राज्याच्या विधिमंडळात पोहचणार आहेत.

दिग्गजांना पराभूत करणारा नेता
राजू शेट्टी यांनी शेतकऱयांच्या ताकदीवर दिग्गजांना पाणी पाजले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी सहकारातील दिग्गज माजी आमदार कै. सा. रे. पाटील यांच्यासारख्या मोठय़ा नेत्याला शिरोळ मतदार संघातून पराभूत केले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा माजी खासदार निवेदिता माने आणि त्यानंतर माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना हरविले होते. विशेष म्हणजे माने आणि आवाडे हे शरद पवारांचे निकटवर्तीय होते.

विधानपरिषदेत आता सदाभाऊ आणि राजू
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एकेकाळी मुलूख मैदान तोफ समजले जाणारे सदाभाऊ खोत यांना फडणवीस सरकारच्या काळात भाजपचे आमदार करून कृषीराज्यमंत्रीपद दिले होते. सदाभाऊंना स्वाभिमानीतून फोडण्याचे काम भाजपने केले होते. आज ठाकरे सरकारच्या काळात सदाभाऊ विधानपरिषदेत आमदार आहेत. राजू शेट्टी विधानपरिषदेवर जाणार आहेत. नजीकच्या काळात एकेकाळच्या या दोन मित्रांमध्ये सभागृहात शेतकऱयांच्या प्रश्नांवर कलगीतुरा अनुभवयास मिळणार आहे.

Related Stories

जिल्हा परिषद कर्मचाऱयांचा थंडा प्रतिसाद

Archana Banage

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर परांजपे बंधू मुंबई पोलिसांच्या ताब्यात

Tousif Mujawar

सोलापूर : खासदार ओमराजे यांचा बार्शीतील सुर्डी गाव दत्तकचा प्रस्ताव

Archana Banage

भाजपला सत्ताभ्रष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मोहन जोशी यांचा इशारा

datta jadhav

कोल्हापूर : २४ फेबुवारीला रोलबॉल जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा

Archana Banage

कल्याणकारी महामंडळ गतीमान करा

Archana Banage