Tarun Bharat

राज्यस्तरीय विजेत्या मल्लांसाठी वर्षभर सराव शिबीर

फिरोज मुलाणी / सातारा

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या मल्लांची निवड करून कात्रज येथील स्व मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रावर सराव कँम्प आयोजित करून त्यांना वर्षभर मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांच्या खर्चाचा भार परिषद उचलणार आहे. यासाठी एक विदेशी प्रशिक्षकासह पाच प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल.

२०२४ च्या ऑलम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचा मल्ल गेला पाहिजे हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ध्येय आहे. कुस्तीगीर परिषदेने याकरिता खास आराखडा तयार करण्यात आला आहे. परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याशी चर्चा करून या आराखडयाला मुर्त स्वरूप देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत लांडगे यांनी दै तरुण भारतला दिलेल्या खास मुलाखतीत दिलखुलास बातचीत करून पुढील चार वर्षाची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची दिशा स्पष्ट केली. ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नंतर महाराष्ट्रात त्यांचा वारसदार निर्माण झाला नाही हे दुर्दैव आहे. मात्र यासाठी शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेने ठोस पावले उचलली आहेत. त्याचे परिणाम लवकरच दिसतील. याशिवाय सराव शिबिरात विशेष गुणवत्ता सिध्द करणाऱ्या मल्लाला विदेशात देखील प्रशिक्षण देण्याचे परिषदेच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात पंचाचा अद्ययावत संच निर्माण व्हावा यासाठी नवीन मल्लांना पतियाळा येथे तंत्रशुध्द प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदललेल्या कुस्ती नियमांची पंच आणि प्रशिक्षक यांना माहिती व्हावी याकरिता विभागनिहाय शिबीराचे आयोजित करून जाग्रुती करण्याचे काम सुरू आहे. सरकार महाराष्ट्रातील कुस्ती जपण्यासाठी सकारात्मक आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी यांनी देखील कुस्तीला प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या सहकार्यातून प्रत्येक जिल्ह्यात कुस्ती संकूल उभे करण्याचा परिषदेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षी पवार साहेबांच्या मार्गदर्शनातून सिटी कार्पोरेशन सारखे अतिशय चांगले प्रायोजक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला मिळालेले आहेत. महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे ललित लांडगे, चंद्रशेखर शिंदे यांनी देखील विशेष मेहनत घेतल्याचे त्यांनी सांगितले. प्रायोजक यांनी परिषदेला दिलेल्या रॉयल्टीतून वर्षभर राबविण्यात येणाऱ्या सराव शिबीरातील मल्लावर खर्च करण्यात येईल.

आता जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेकरिता प्रायोजक मिळवून देण्यासाठी परिषद पुढाकार घेईल. कुस्तीच्या विकासासाठी अनेक प्रायोजक पुढे येत आहेत ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. मल्लांनी मेहनत करून पुढे वाटचाल करावी डोपिंगसारख्या आमीशाला बळी पडू नये त्यामुळे आयुष्य उध्वस्त होत असल्याची उदाहरणे आहेत. परिषदेने देखील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील मल्लांची डोपिंग चाचणी करावी अशी मागणी आपण नाडाकडे केल्याचे त्यांनी सांगितले

…तोपर्यंत फेटा बांधणार नाही.

महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय स्तरावर आँलम्पिक स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारा मल्ल घडला पाहिजे. खाशाबानंतर शक्य झालेले नाही. नरसिंगचे प्रयत्न अपयशी ठरले याची मनाला मोठी खंत आहे. मात्र जोपर्यंत महाराष्ट्राचा मल्ल आँलम्पिकला जात नाही तोपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही अशी खूणगाठ लांडगे यांनी मनाशी बांधली आहे.

Related Stories

पालिकेच्या सभांनाच नगरसेवकांचीच गैरहजेरी

Patil_p

संशयित प्रियकरास पोलीस कोठडी

Patil_p

सातारा : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात तृतीयपंथींचा गोंधळ

datta jadhav

सातारा-पुणे नॉनस्टॉपसाठी नवीन पंधरा बसेस : शेखर चन्ने

datta jadhav

पालिकेची चोवीस तास चालणारी हेल्पलाईन सुरु

Patil_p

कर्तृत्ववान कल्पना मोरे

datta jadhav