Tarun Bharat

राज्यांना दक्षतेचे आवाहन

कोरोना नियमांचे पालन आवश्यक, पंतप्रधान मोदींकडून कोरोना स्थितीचा आढावा,  स्वदेशी नस्य लसीला अनुमती 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. चीन, अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही आढावा बैठक आयोजित केली होती. बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, नीती आयोगाचे प्रमुख परमेश्वरन अय्यर आदी महत्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या.

कोरोनाच्या ज्या रुपाने आज चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे, त्या बीएफ 7 चे भारतात 4 रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या सध्या कमी दिसत असली तरी ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि सर्वसामान्य नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. मास्कचा उपयोग सातत्याने करावा आणि गर्दीची स्थाने टाळावीत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. प्रारंभापासून दक्षता बाळगल्यास कोरोनाची स्थिती नियंत्रणात राहील, अशा अनेक सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्या आहेत.

चाचण्या करण्यास प्रारंभ

अन्य देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली असल्याने भारतात आतापासूनच मोठय़ा प्रमाणात तयारीला प्रारंभ करण्यात आला आहे. राज्यांनी जीनोम सिक्वेन्सिंग करण्यास प्रारंभ करावा आणि साधनसामग्रीची तयारी करुन ठेवावी अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी बुधवारीच दिलेल्या आहेत. आता केंद्र सरकारने आरटीपीसीआर चाचण्या अनियमित (रँडम) पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी पत्रकारांसमोर बोलताना दिली.

विमान प्रवाशांची तपासणी

विदेशातून येणाऱया प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारपासूनच या निर्णयाचे क्रियान्वयन करण्यास प्रारंभ करण्यात आला. सर्वच देशांमधून विमानाने भारतात येणाऱया प्रवाशांची चाचणी करण्यात येणार असून कोरोनाची लक्षणे कोणामध्ये दिसून आल्यास त्याला त्वरित वेगळे काढले जाणार आहे. यामुळे या सांसर्गिक आजाराचा प्रसार होणार नाही.

जनतेचे प्रबोधन करा

भारताचे सध्या जागतिक परिस्थितीवर बारकाईने लक्ष्य आहे. विशेषतः चीनमध्ये कोरोना स्थिती कशी आहे, याची माहिती भारत सातत्याने घेत आहे. चीनमधील विषाणूच भारतातही आढळल्याने अधिक दक्षता बाळगण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रसाराला आक्रमक धोरण आखून प्रतिबंध केला जाणार आहे. सरकारचे धोरण यशस्वी होण्यासाठी जनतेच्या सहकार्याची आवश्यकता असून यासाठी राज्य सरकारांनी जनतेचे प्रबोधन करावे. कोरोना नियंत्रणात असला तरी तो संपलेला नाही याची जाण ठेवून प्रयत्न केल्यास तो आटोक्यात राहू शकतो. लोकांनी दुर्लक्ष न करता मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग यांचा उपयोग करावा. तसेच हातांची स्वच्छता राखावी असे आवाहनही अनेक आरोग्य तज्ञांनी केले आहे.

बूस्टर डोस आवश्यक

सध्या भारताजवळ कोरोना विरोधी लस मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असून आवश्यकता भासल्यास आणखी उत्पादन वाढविण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत, त्यांनी त्वरित दक्षतेचा उपाय म्हणून लसीचा पूरक (बूस्टर) डोसही घ्यावा, असे आवाहन सरकारने केले आहे.

चिंता नको, दक्षता घ्या

  • पंतप्रधान मोदींच्या बैठकीत देशभरातील स्थितीसंबंधी झाली सविस्तय चर्चा
  • केंद्रीय मंत्र्यांसह अनेक आरोग्यविषयक विभागाचे अधिकारी उपस्थित
  • साधनसामग्रीची जुळवाजुळव, जिनोम सिक्वेन्सिंग सुरु करा : आवाहन

Related Stories

कोइम्बतूर स्फोटामागे दहशतवादी कनेक्शन

Patil_p

उत्तराखंडात 424 नवे कोरोना रुग्ण; 4 मृत्यू

Tousif Mujawar

दिल्लीत पिण्याचे पाणी, शौचालयाअभावी शेतकऱ्यांचे हाल

datta jadhav

बीसीसीआयच्या निवड समितीच्या सल्लागार समितीवर तीन सदस्यांची नियुक्ती

Abhijeet Khandekar

भारतात 89,706 नवे कोरोना रुग्ण; एकूण रूग्णसंख्या 43.70 लाखांवर

datta jadhav

शेतकऱ्यांच्या हितासाठी इथेनॉलला प्राथमिकता

Patil_p