प्रतिनिधी / वाकरे
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन व्होकेशनल योजनेचे रूपांतरण करण्याऐवजी सक्षमीकरण करावे या मागणीसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली मुबंई येथे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. राज्यात तीन दशके यशस्वी सुरू असलेल्या योजनेचे रूपांतर ऐवजी सक्षमीकरण करावे याकडे लक्ष वेधत अन्याय दूर करावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिक्षण संस्था चालकांनी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, खा. संजय मंडलिक, आमदार रोहित पवार, आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत गडहिंग्लज नगराध्यक्ष प्रा.स्वाती शिंदे-कोरी, जिल्हा बँक संचालक प्रताप उर्फ भैया माने, जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाचे प्रा.जयंत आसगावकर, प्रा.डॉ. सुनील देसाई, डॉ. यशवंत चव्हाण, उदय पाटील, विनोद उत्तेकर, सुधाकर कोरवी, डॉ.हेबाळकर यांच्या शिष्टमंडळाने मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. राज्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षण संस्था चालक यांच्या हिताच्या दृष्टीने अंतिम निर्णय घेताना कोणत्याही घटकांवर अन्याय होऊ नये असे आवाहन ना.मुश्रीफ यांनी केले.
ना.मलिक यांनी केंद्र शासनाच्या धोरणानुसार या योजनेचे रूपांतर करण्यात येणार आहे, त्यासाठी आमदार विक्रम काळे समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. योजनेतील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. समितीचा अहवाल पुढील आठवड्यात प्राप्त झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कौशल्य शिक्षण विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, संचालक दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते. राज्यातील शिक्षण संस्थामध्ये अत्यंत प्रभावीपणे व्यवसाय शिक्षण दिले जात असताना काही अधिकारी शासनाची दिशाभूल करीत असल्याबद्दल बैठकीत रोखठोक भूमिका मांडली.
रूपांतरणवर ठाम – ना मलिक
ना. मलिक यांनी मात्र कौशल्यावर आधारित फाईव्ह स्टार आय.टी.आय योजनाच प्रभावी होऊ शकते असे सांगत शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल. कोणावरही अन्याय होणार नाही. आय. टी. आय, व्ही टी पी योजनेचे समर्थन केले.
शिक्षक – विद्यार्थी यांच्या पाठीशी ठाम – ना. मुश्रीफ
राज्यातील शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही .चांगल्या योजनेचे सक्षमीकरण करण्यासाठी आपण शिक्षण संस्था चालक आणि शिक्षक, विद्यार्थी यांच्या पाठीशी ठाम असल्याचे ना.मुश्रीफ यांनी या बैठकीतच स्पष्ट केले.


previous post