Tarun Bharat

राज्यातील पहिला अद्ययावत वैद्यकीय कचरा प्रकल्प कुंडईत

कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी केली पाहणी : लवकरच होणार उद्घाटन : राज्यातील वैद्यकीय कचरा हाताळला जाणार

प्रतिनिधी / फोंडा

राज्यातील बायो मेडिकल वेस्ट म्हणजेच वैद्यकीय कचऱयाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणारा कचराप्रक्रिया प्रकल्प कुंडई औद्योगिक वसाहतीमध्ये सज्ज झाला आहे. कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी गुरुवारी दुपारी या प्रकल्पाची पाहणी केली. कचऱयावरील प्रक्रियेसंबंधी आवश्यक त्या चाचण्या घेतल्यानंतर येत्या काही दिवसांतच त्याचे उद्घाटन होईल, अशी माहिती मंत्री लोबो यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना दिली.

 बायोटेक वेस्ट सोल्युशन्स प्रा. लि. या कंपनीने पीपीपी तत्त्वावर हा अद्ययावत प्रकल्प उभारला आहे. राज्य सरकारच्या कचरा व्यवस्थापन महामंडळातर्फे कुंडई औद्योगिक वसातीमध्ये या प्रकल्पासाठी जमीन व कुंपण उपलब्ध करुन दिले आहे. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयासह, राज्यातील सर्व सरकारी इस्पितळे व खासगी इस्पितळातील कचरा या ठिकाणी हाताळला जाणार आहे. वैद्यकीय कचऱयाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावतानाच काही घटकांवर पुर्नप्रक्रियाही केली जाणार आहे.  बायोटेक कंपनी वीस वर्षे हा प्रकल्प हाताळणार असून त्यानंतर तो सरकारला सुपूर्द केला जाईल. अद्ययावत तंत्रज्ञान असलेला केवळ गोव्यातीलच नव्हे, तर भारतातील हा एक कचरा प्रकल्प असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 वैद्यकीय कचऱयाचे चार प्रकारे होणार वर्गीकरण

 याठिकाणी येणाऱया वैद्यकीय कचऱयाचे चार वेगवेगळय़ा गटात वर्गीकरण होणार आहे. शस्त्रक्रियेनंतर निकामी होणाऱया मानवी अवयवांची विल्हेवाट इन्सिनेटरच्या माध्यमातून होणार आहे. याशिवाय इस्पितळे व दवाखान्यात वापरले जाणारे प्लास्टिक व रबरी घटक, ग्लास व काचांचे घटक यावर वेगवेगळय़ा यंत्रणातून   विल्हेवाट लावली जाणार आहे. काही कचऱयावर पुर्नप्रक्रिया करण्याची सोयही या प्रकल्पामध्ये आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांवर उपचार केल्यानंतर तयार होणाऱया घातक वैद्यकीय कचऱयाची शास्त्रीय व सुरक्षीत पद्धतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे. गोव्यातील वैद्यकीय कचऱयाचे व्यवस्थापन व विल्हेवटीसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असून ज्याचा सरकारी व खासगी इस्पितळे, दवाखाने तसेच वैद्यकीय प्रयोगशाळांना लाभ होणार आहे.

  कचरा प्रकल्पामुळे कुठल्याही प्रदूषणाचा धोका नाहाr

  कोरोना काळात वैद्यकीय कचऱयाच्या विल्हेवाटीची मोठी समस्या सरकारी इस्पितळासमोर उभी होती. याच काळात केवळ अकरा महिन्यांत जलदगतीने हा  प्रकल्प उभारण्यात आल्याची माहिती मंत्री मायकल लोबो यांनी दिली. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार प्रत्येक राज्यात वैद्यकीय कचऱयाचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणारी यंत्रणा आवश्यक आहे. त्याला अनुसरुन गोव्यात एक उत्कृष्ट व अद्ययावत प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पामुळे कुठल्याच प्रकारच्या प्रदूषणाचा धोका संभवणार नाही. पर्यावरणीयदृष्टय़ा तो पूर्ण सुरक्षित आहे, असे मंत्री लोबो यांनी स्पष्ट केले. इंडियन मेडिकल असोसिएशनशी संबंधित डॉक्टरांनी केलेल्या मागणीचा विचारही केला जाणार आहे. या प्रकल्पांमध्ये कचरा पाठविणाऱया खासगी इस्पितळांच्या शुल्कामध्ये सवलत देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोध करणाऱया लोकांनी प्रकल्प प्रत्यक्ष पाहावा

 प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून प्रयोगिकतत्त्वावर कचरा विल्हेवाटीसंबंधी काही प्रात्यक्षिके पूर्ण झाल्यानंतर येत्या दहा ते बारा दिवसांत मुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रकल्पाचे उद्घाटन हाणार आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर त्याला विरोध करणाऱया लोकांना प्रत्यक्षात तो दाखविला जाईल. वैद्यकीय कचरा हाताळण्यासाठी त्याची गरज व महत्त्वही पटवून दिले जाणार आहे, असे मंत्री लोबो यांनी स्पष्ट केले.

साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पामुळे आज गोव्यातील बहुतेक भाग कचरामुक्त झाले आहेत. रस्त्याच्या बाजूला कचरा फेकण्याचे प्रकार कमी झाले आहेत. घरोघरी कचरा गोळा होऊन तो या प्रकल्पापर्यंत पोचू लागला आहे. या प्रकल्पाचे महत्त्व आज गोव्यातील जनतेला कळून चुकले आहे.

बांधकाम अवशेषांच्या विल्हेवाटीसाठी डिचोलीत प्रकल्प

 राज्यात जुनी बांधकामे पाडल्यानंतर तयार होणाऱया ढिगाऱयांची मोठी समस्या आहे. अशा बांधकाम अवशेषांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी डिचोली येथे प्रकल्पाची उभारला जाणार आहे. त्यासाठी जमीन मंजूर झाली असून प्रक्रियाही सुरु झाली आहे. जुन्या इमारती किंवा घरे पाडल्यानंतर चिऱयांपासून कौलापर्यंत सर्व प्रकारच्या बांधकाम अवशेषांचे या प्रकल्पात पुनःप्रक्रिया होणार आहे. त्यापासून पेव्हर्स, टाईल्स व इतर बांधकाम साहित्याची पुर्ननिर्मिती होईल. राज्यातील हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असून तो पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या बाजूला, शेतात किंवा नदीच्या काठावर बांधकामाचे ढिगारे दिसणार नाहीत. या डॅबरिस व्यवस्थापन प्रकल्पात उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले. यावेळी डॉ. शेखर साळकर, बायोटेक कंपनीचे संचालक मनिष ग्रेवाल व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

गोवा आरोग्य सेवेचे सशस्त्रदलाकडून अभिनंदन

Omkar B

कठोर कार्यवाहीसाठी आता मंत्र्यांवर जबाबदारी

Patil_p

आमदार मिलिंद नाईक यांच्याविरूध्दचे काँग्रेसचे षडयंत्र फसले- मुरगाव भाजपा मंडळ

Amit Kulkarni

डॉ. विशाल च्यारीचा अद्याप शोध लागेना

Patil_p

पणजीसाठी भाजपमध्ये तिरंगी धुसफूस

Amit Kulkarni

दिव्यांगासाठी जानेवारीत ‘पर्पल महोत्सव’

Amit Kulkarni