Tarun Bharat

राज्यात कोरोनाचा नववा बळी

प्रतिनिधी /पणजी :

दरदिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून गुरुवारी नवीन 112 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह सक्रीय रुग्णांची संख्या 869 एवढी झाली आहे. रासई लोलटी येथे गुरुवारी एकाच दिवशी 26 नवीन रुग्ण सापडले, तर वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील तीन युनिटमध्ये सुमारे 40 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांनी हे युनिट 14 दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी महम्मद हनिफ शाह (50 वर्षे) हा कोरोनाचा वास्कोतील चौथा तर राज्यातील नववा बळी ठरला आहे.

मांगोरहिलशी संबंधित रुग्णांचा आकडा प्रचंड गतीने वाढत आहे. हा आकडा 305 वर पोहोचला आहे. तर मांगोरहिलची सक्रीय रुग्णसंख्या आता 64 वर पोहोचली आहे, सडा वास्को येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 84 झाला आहे, तर बायणा 87, न्युवाडे 73, खारीवाडा 43 झाला आहे.

झुवारीनगरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 111 वर पोहोचला आहे. कुडतरीची रुग्णसंख्या 32 झाली आहे, तर चिंबलची रुग्णसंख्या 60 वर पोहोचली आहे. मोर्ले 22 व बाळ्ळीतील रुग्णांची संख्या 27 झाली आहे. मडगावची रुग्णसंख्या 7, केपे 16, लोटली 30, म्हापसा 7, सांखळी 34, कामराभाट 7, काणकोण 8, मोती डोंगर 13, फोंडा 32, वाळपई 12, माशेल 5, उसगाव 8, डिचोली 10, शिरोडा 13, पेडणे 9, पिलार 4, गोवा वेल्हा 9, बेतकी 10, सांगे 4, मंडूर 16, धारबांदोडा 16, पुंकळी 18 व अन्य अनेक भागांमध्ये एक ते तीन पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे.

चाचणी केलेल्यांपैकी 1580 जणांचे अहवाल अजून याचयचे आहेत. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी एकूण 66 रुग्ण कोरोनामुक्त झाले. गुरुवारी 3831 जणांची चाचणी झाली. त्यापैकी 2139 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहे.

पणजी जिल्हा न्यायालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह

पणजीतील जिल्हा सत्र न्यायालयातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे न्यायालय बंद करण्यात आले आहे. सोमवारी न्यायालयाचे कामकाज सुरू होणार आहे. ही इमारत सॅनिटाईझ करण्यात आली आहे. अत्यंत महत्वाच्या विषयांवर स्पेसीस इमारतीत न्यायाधीश सुनावणी घेणार आहेत.

कोरोनाचा वास्कोत चौथा बळी

प्रतिनिधी /वास्को :

वास्कोत आणखी एका कोरोनाबाधित व्यक्तीचे गुरूवारी पहाटे निधन झाले. मयत व्यक्तीचे नाव महम्मद हनिफ शाह (50 वर्षे) असे असून तो आपल्या कुटुंबासह वास्को शहरात फ्लॅटमध्ये राहत होता. या मयताने बरेच दिवस ताप येत असतानाही कोविड चाचणी करून घेतली नव्हती, असे उघडकीस आले आहे. कोरोनाचा हा वास्कातील चौथा तर राज्यातील नववा बळी ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मयत महम्मद याला ताप येत असल्याने त्याने कुठ्ठाळी आणि बायणा या भागातील डॉक्टरांची भेट घेतली होती. मात्र, तरीही त्याला बरे वाटले नव्हते. बुधवारी रात्री श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने त्याला चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. चिखलीत त्याची कोविड चाचणीही करण्यात आली. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याचे आढळून आल्याने त्याला  गोमेकॉमध्ये हलवण्यात आले. गोमेकॉमध्ये मध्यरात्रीनंतर तीनच्या सुमारास त्याचे निधन झाले. मयत व्यक्ती दाबोळी विमानतळावर टॅक्सी व्यवसाय करीत असे. टॅक्सी युनियनचा कार्यशील सदस्य तसेच नवेवाडे व वेर्णातील मशिदीच्या कार्यातही त्याचा सहभाग असायचा. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.

महम्मद याचा कोविड तपासणी अहवाल गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास उपलब्ध झाला, तेव्हा त्याला कोरोना झाला होता हे उघडकीस आले. तोपर्यंत त्याने जीव गमावला होता. गुरूवारी संध्याकाळी मयत व्यक्तीवर वास्को मायमोळेतील येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तो राहात असलेल्या वास्कोतील इमारतीत निर्जंतुकीकरण करण्यात आलेले असून कुटुंबातील तिघाही सदस्यांची कोविड चाचणी करण्यात येणार आहे.

नगरसेवक पास्कॉल डिसोजा यांच्यासह खारवीवाडा भागातील तिघांचा बळी कोरोनाने घेतला आहे.  गुरूवारी पहाटे नवेवाडेतील महम्मद याला जीव गमवावा लागला. वास्कोत आतापर्यंत कोरोनामुळे हे चौघांचे बळी गेले आहेत.

वेर्णा टय़ूलिप डायग्नॉस्टिक्सच्या 40 कामगारांना कोरोनाकंपनी 14 दिवस बंद ठेवण्याचा आदेश

प्रतिनिधी /मडगाव :

वेर्णातील टय़ूलिप डायग्नॉस्टिक कंपनीतील जवळपास 40 कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ही कंपनी पुढील 14 दिवस बंद ठेवण्याचा आदेश दक्षिण गोव्याचे ज्ल्हाधिकारी अजित रॉय यांनी दिला आहे. वेर्णा औद्योगिक वसाहतीतील अन्य एका फार्मास्युटिकल कंपनीत आतापर्यंत सात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी आढळून आले आहेत. पण, या कंपनीचे काम जोमाने सुरू आहे.

टय़ूलिप डायग्नॉस्टिक कंपनीत काम करणाऱया कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने तो गोव्यातील विविध भागात पोचला आहे. या संदर्भात प्रा. रामराव वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठवून परिस्थिची कल्पना दिली होती. आतापर्यंत 40 कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने कंपनी पुढील 14 दिवसासाठी बंद करण्याचा आदेश अखेर जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.

वेर्णातील अनेक कंपन्यांमध्ये वास्कोचे कामगार

वेर्णातील अनेक फार्मास्युटिकल तसेच इतर कंपन्यांमध्ये झुवारीनगर, मांगोरहिल तसेच वास्कोच्या इतर भागातील लोक कामासाठी येतात. सद्या हे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून बघितले जातात. त्यामुळे वेर्णा औद्योगिक वसाहतीत कोरोनाचा फैलाव जोमाने होऊ लागला आहे. काही कामगार हे शेजारील राज्यातून आलेले आहेत. सद्या वेर्णा औद्योगिक वसाहतीत भीतीचे वातावरण असून कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी धोका पत्करून नोकरी करीत आहेत.

अजूनही खबरदारीची उपाययोजना नाही

याच औद्योगिक वसाहतीतील अन्य एका बढय़ा फार्मास्युटिकल कंपनीत आत्ता पर्यंत सात जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून या कामगारांना प्रकृती ठिक होई पर्यंत कामावर रूजू न होण्याचा आदेश देण्यात आला आहे. या कंपनीत सात कोरोना पॉझिटिव्ह कामगार सापडले तरी अद्याप खबरदारीची उपाययोजना हाती घेतली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या सात कामगारांच्या संपर्कात आलेल्या इतर कामगारांची यादी तयार करून कंपनीच्या वरिष्ठांकडे पाठविण्यात आली आहे. ज्या विभागात हे कर्मचारी काम करीत होते, त्या विभागाचे निर्जुंतीकरण करण्यात आलेले नाही.

Related Stories

कंत्राटी 1185 कामगारांचा लेबर सोसायटीत समावेश

Omkar B

मानवाधिकार आयोगाची मडगाव पालिकेला नोटीस

Patil_p

चतुर्थीच्या माटोळी बाजाराला गावठी चिबुड, दोडकी यंदा कमीच

Amit Kulkarni

कृषी विधेक ठरणार शेतकऱयांना वरदान

Patil_p

नवचर्चित अभिनेत्री तुनिशा शर्माची आत्महत्या, नायगाव स्टुडियोत घेतला गळफास

Rahul Gadkar

बाणावलीत 9 लाख रूपये किंमतीची दारू जप्त

Amit Kulkarni