मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० मे रोजी जनतेशी संवाद साधताना आपलं गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. यावेळी त्यांनी माझं गाव कोरोनामुक्त मोहिमेची सुरुवात करणार असल्याचेही सांगितले होते. आता ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. गावातील नागरिकांना प्रेरणा मिळावी यासाठी राज्य सरकारने कोरोनामुक्त गाव स्पर्धेतची घोषणा केली आहे. यामध्ये पहिला क्रमांक पटकावणाऱ्या गावाला ५० लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचा अधिक फैलाव झाला. त्यामुळे ग्रामीण भागात लोकांमध्ये जनजागृती करण्यसाठी राज्य सरकार प्राधान्याने विचार करत आहे. त्यासाठीच कोरोनामुक्त गाव स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सहा महसूल विभागांमध्ये प्रत्येकी तीन अशी एकूण १८ पारितोषिके दिली जाणार आहेत. त्यात पहिल्या क्रमांकासाठी ५० लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी २५ लाख आणि तिसऱ्या क्रमांकासाठी १५ लाख रुपयांचं पारितोषिक दिले जाणार आहे. पारितोषिक जिंकणाऱ्या गावांना पारितोषिकाची रक्कम गावातील विकास कामांसाठी वापरता येणार आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.
राज्यात राबवण्यात येणाऱ्या कोरोनामुक्त गाव स्पर्धेसाठी एकूण २२ निकष असणार आहेत. यात एकूण ५० गुणांची रचना केली जाईल. सर्वाधिक गुण पटकावणारे गाव विजयी घोषित करण्यात येणार आहे. यात गावात कोरोना संबंधीच्या नियमांचे पालन, कोरोनाला हद्दपार करणे आणि इतर निकषांचा समावेश असणार आहे.

