Tarun Bharat

राज्यात प्राप्तिकरचे 30 ठिकाणी छापे

करचुकवेगिरी, खोटी माहिती प्रकरणी वैद्यकीय शिक्षण संस्था, इस्पितळांवर धाडी

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यातील प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालये, इस्पितळे तसेच नर्सिंग कॉलेज आणि त्यांच्या मालकांची निवासस्थाने व कार्यालयांवर बुधवारी पहाटे प्राप्तिकर अधिकाऱयांनी धाडी टाकल्या. बेंगळूर, मंगळूर, तुमकूर, दावणगेरे, देवनहळ्ळीसह राज्यभरात एकूण 30 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईमुळे वैद्यकीय शिक्षण संस्था मालकांचे धाबे दणाणले आहेत.

करचुकवेगिरी, चुकीची माहिती सादर करणे, बेहिशेबी मालमत्ता संपादन, काळा पैसा, वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी लाखो रुपयांची वसुली, इस्पितळांमध्ये रुग्णांवरील उपचारासाठी मनमानी बिले, प्राप्तिकरासंबंधीचा तपशिल सादर न करणे या आरोपांमुळे प्राप्तिकर विभागाच्या विविध पथकांनी राज्यभरात छापे टाकले आहेत. यावेळी अनेक वैद्यकीय शिक्षण संस्था, इस्पितळ मालकांनी मोठय़ा प्रमाणात माया जमविल्याचे आढळून आले आहे. कारवाईसाठी विविध कारणे सांगून 150 हून अधिक कार बुक करण्यात आल्या होत्या. 250 हून अधिक प्राप्तिकर अधिकारी कारवाईत सहभागी झाल्याचे समजते.

बेंगळूरमध्ये केंगेरी येथील बीजीएस शिक्षण संस्था, देवनहळ्ळी येथील आकाश मेडिकल कॉलेज आणि इस्पितळ, सप्तगिरी वैद्यकीय महाविद्यालय, तुमकूरमधील श्रीदेवी नर्सिंग कॉलेज, मंगळूरमधील ए. जे. शेट्टी, येनपोय इस्पितळ, शिक्षण संस्था यासह विविध ठिकाणी एकाचवेळी प्राप्तिकर अधिकाऱयांनी धाडी टाकल्या. दावणगेरे येथे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री शामनूर शिवशंकरप्पा यांच्या मालकीच्या जे. जे. एम. वैद्यकीय महाविद्यालय, एस. एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि बापूजी दंतवैद्यकीय महाविद्यालयांवरही छापे टाकून तपासणी करण्यात आली. गोवा आणि बेळगाव येथील अधिकाऱयांनी दावणगेरे येथे कारवाई केली.

विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि महाविद्यालय प्रशासनांनी जमा केलेले शुल्क तसेच सरकारने निश्चित केलेले शुल्क यासंबंधीचे तपशिल यावेळी पडताळण्यात आले. काही विद्यार्थ्यांची अनपेक्षितपणे भेट घेऊन त्यांनी महाविद्यालयात जमा केलेल्या शुल्काविषयी माहिती प्राप्तिकर अधिकाऱयांनी जमा केली.

अधिकाऱयांनी बोलावले ‘की-मेकर’ला

बेंगळूरमध्ये देवनहळ्ळी येथे आकाश इस्पितळ आणि वैद्यकीय महाविद्यालयावर छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. या संस्थेचे मालक मुनिराजू यांच्या सहकारनगरमधील निवासस्थानावरही धाड टाकण्यात आली. कोरोना काळातही त्यांच्या शिक्षण संस्थेने सरकारी कोटय़ातील वैद्यकीय जागांची विक्री केल्याचा आरोप आहे. बाणवार येथील सप्तगिरी वैद्यकीय महाविद्यालयावर छापा टाकून तीन वर्षातील प्रवेश प्रक्रिया आणि शुल्कासंबंधीची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर या संस्थेचे मालक दयानंद यांच्या मल्लेश्वरम येथील मार्गोसा रोडवरील बंगल्यावरही धाड टाकण्यात आली. यावेळी प्राप्तिकर अधिकाऱयांनी ‘की-मेकर’ला बोलावून घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, धाडीवेळी किती घबाड हाती लागले याविषयी अधिकाऱयांनी माहिती दिली नाही. केंगेरी येथे प्रतिष्ठित बीजीएस ग्लोबल इस्पितळ व वैद्यकीय महाविद्यालयावर धाडी टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली.

भरमसाठ डोनेशन वसुलीचा आरोप

तुमकूरमध्ये भाजप नेते आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य डॉ. एम. आर. हुलिनायकर यांच्या मालकीच्या श्रीदेवी वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळ, डिप्लोमा कॉलेजवर प्राप्तिकर अधिकाऱयांच्या पथकाने एकाचवेळी धाडी टाकल्या. त्यांच्या सोमेश्वर येथील निवासस्थानावरही 8 ते 10 कारमधून आलेल्या अधिकाऱयांनी धाड टाकली. होसकोटे येथील एम. व्ही. जे. महाविद्यालय आणि इस्पितळलाही लक्ष्य बनविण्यात आले. भरमसाठ डोनेशन वसुली आणि अवैधपणे वैद्यकीय जागांचे वाटप केल्याचा आरोप या शिक्षण संस्थेवर आहे.  

मंगळूरमध्ये चार वैद्यकीय संस्था लक्ष्य

मंगळूर जिल्हय़ात चार वैद्यकीय महाविद्यालये आणि इस्पितळांना दणका देण्यात आला आहे. मंगळूर शहरातील प्रतिष्ठित ए. जे. शेट्टी यांच्या निवासस्थानासह त्यांच्या मालकीचे ए. जे. वैद्यकीय महाविद्यालय, येनपोय इस्पितळ आणि त्याचे मालक अब्दुल कुंची, कणचुरु इस्पितळ तसेच या संस्थेचे मालक कनचुरु मोनू आणि श्रीनिवास शिशू उपचार केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय व मालक श्रीनिवास राव यांच्या बंगल्यावर पहाटे 5.30 वाजता धाडी टाकण्यात आल्या. धाडीविषयी कोणालाही शंका येऊ नये यासाठी प्राप्तिकर आधिकाऱयांनी केरळमध्ये आंतरराज्य फुटबॉल सामने सुरू असून खेळाडूंसाठी कारची आवश्यकता आहे, असे सांगून मंगळूरमधील अनेक कंपन्यांच्या कार भाडोत्री घेतल्या होत्या.

Related Stories

7.4 टक्के राहणार विकासदर

Patil_p

आणखी 47 चिनी ऍप्सवर बंदी

Patil_p

देशव्यापी एनआरसीचा निर्णय नाही

Amit Kulkarni

बहरेनहून कर्नाटकासाठी आले ऑक्सिजनचे कंटेनर्स

Amit Kulkarni

स्वदेशी ‘कोवॅक्सिन’ कोरोनाच्या 617 प्रजातींवर भारी

datta jadhav

भीमा कोरेगाव प्रकरण : आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर

Abhijeet Khandekar