Tarun Bharat

राज्यात फायर ऑडीटसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही – यड्रावकर

Advertisements

जयसिंगपूर / प्रतिनिधी

भंडारा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा रुग्णालयास भेट दिल्यानंतर आज राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गडचिरोली जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी  राज्यातील शासकीय रुग्णालयांच्या फायर ऑडीटसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन केले. 

राज्यातील सर्वच रुग्णालयांचा आढावा घेऊन आवश्यक ते बदल करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेतली जात आहे, असे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्पष्ट केले. तसेच गडचिरोली येथे आरोग्य विषयक सुविधांचा आढावा घेताना त्यांनी अतिदक्षता विभागातील अनेक सोयीसुविधा आणि एकंदर परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करून संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत काही महत्वपूर्ण सूचना केल्या. ते म्हणाले भंडारा जिल्ह्यातील दु:खद घटनेमुळे शासनाने राज्यातील शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडीट करण्याचे निर्देश दिले.

सदर काम तातडीने पुर्ण होण्यासाठी निधीची कमतरता राहणार नाही. राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवादही साधला. ज्या शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडीट झाले नाही त्यांची तपासणी करण्याबाबत कालच राज्याचे मा. मुख्यमंत्री यांनी निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी फायर ऑडीट होणे बाकी आहे अशा ठिकाणी ऑडीट प्रक्रिया तातडीने राबविण्याचे आदेश दिले जात आहेत. त्यासाठी आवश्यक निधी देणेबरोबरच पून्हा अशा दुर्देवी घटना घडू नयेत म्हणून त्यावर उपाययोजनाही राबविल्या जाव्यात असे आदेशही देण्यात येत आहेत असे ते पुढे म्हणाले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक अनिल रुडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीश सोलंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल मडावी, डॉ. विनोद म्हशाखेत्री तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

गडचिरोलीमधील आरोग्य सुविधा उत्तम दर्जाच्या आहेत

राज्यातील नामवंत रुग्णालयाप्रमाणेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुविधा अतिदक्षता विभागात करण्यात आल्या आहेत असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. नुकतेच नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी राज्यमंत्री यड्रावकर यांनी केली. त्याठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्था, लाईट, ऑक्सिजन व्यवस्था व इतर यंत्रसामुग्री ही अतिशय उत्तम असून राज्यातील प्रमुख रुग्णालयातील सुविधेएवढीच उत्तम दर्जाची असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील इतर विभागांचीही पाहणी केली. तसेच नव्याने स्थापन झालेल्या आरटीपीसीआर लॅबचीही पाहणी केली.

गडचिरोली जिल्ह्यात कोरोना काळात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठया प्रमाणात आरोग्य सुविधा उभारल्या गेल्या. यामध्ये आरटीपीसीआर प्रयोगशाळा, प्रत्येक तालुक्यात कोविड केंद्र, मनुष्यबळ भरती तसेच आता अद्यावत असे अतिदक्षता विभाग यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट झाली आहे. भविष्यात अजून याबाबतचा पुढिल विस्तार पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली केला जाईल असे ते पुढे म्हणाले. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आध्यक्षतेखाली बैठक घेऊन मुंबई येथे जिल्ह्यातील आरोग्य सुविधेबाबत असणाऱ्या मागण्याबाबत चर्चा करु असे आश्वासन आरोग्य विभागाला त्यांनी यावेळी दिले. आरोग्य विभागातील कामकाजाचा सविस्तर आढावा त्यांनी यावेळी घेतला. जिल्याबयतील कोरोना परिस्थिती, मलेरीया साथ, रिक्त पदे, इतर अडीअडचणी त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला रुग्णालयात मोठया प्रमाणात रुग्ण येत असतात त्यामूळे त्या ठिकाणचे फायर ऑडीट तातडीने करुन घेणे व आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच फायर अलार्म बाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन मध्ये प्रस्तावित आहे त्यासाठी प्रशासन तातडीने निर्णय घेईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

रिक्त पदे लवकरच भरणार

आरोग्य विभागातील जिल्ह्यात असलेली 25 टक्के रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. नुकताच राज्य शासनाने रिक्त पदांपैकी 50 टक्के जागा भरा असा आदेश दिला आहे. त्यानूसार गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा पदभरती वेळेत होईल. यामध्ये आरक्षण हा मुद्दा राज्यभर सद्या सुरु आहे. त्यावरही लवकरच तोडगा निघेल असे त्यांनी याचेळी सांगितले.

शालीनी कुमरे यांचा सत्कार

जिल्हा सामान्य रुग्णालयातील 35 वर्ष सेवा केलेल्या व नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या अधिसेविका शालीनी कुमरे यांचा सत्कार राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाला. त्यांचे नामांकन राष्ट्रपती पुरस्कारासाठी नुकतेच करण्यात आले आहे. उत्कृष्ठ परिचारिका म्हणून राष्ट्रपती पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या त्या जिल्ह्यातील ऐकमेव महिला परिचारिका आहेत.

Related Stories

मलई खाणाऱ्या ठेकेदार, अधिकाऱ्यांनाही ‘खाकी’ दाखवा

Kalyani Amanagi

मनपा कर्मचारी संपाच्या पवित्र्यात

Archana Banage

आर के नगर येथील विद्युत वितरणचा कारभार न सुधारल्यास आंदोलन छेडणार

Archana Banage

कोल्हापुरात एसटीवर दगडफेक; चालक जखमी

Abhijeet Khandekar

सुरुपलीचे जॅकवेल जमिनदोस्त; ३० लाखाचे नुकसान

Archana Banage

केसीआर आणि प्रशांत किशोर यांची दुसऱ्या दिवशीही चर्चा सुरूच

Archana Banage
error: Content is protected !!