Tarun Bharat

राज्यात यापुढे लॉकडाऊन राहणार नाही

Advertisements

मुख्यमंत्री येडियुराप्पांचे स्पष्टीकरण : मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन करण्याचे जनतेला आवाहन

प्रतिनिधी /बेंगळूर :

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक जिल्हय़ांमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक स्थिती आणखी बिघडत असल्याने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी यापुढे बेंगळूरसह कोणत्याही जिल्हय़ात लॉकडाऊन राहणार नाही. कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

बेंगळूरसह अनेक जिल्हय़ांमध्ये आठवडय़ापूर्वी जारी केलेला लॉकडाऊनचा कालावधी बुधवारी सकाळी संपणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सायंकाळी फेसबूक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले. कर्नाटकात सुरुवातीला कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश आले होते. मात्र, अलिकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मात्र, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमात्र पर्याय नाही. सामाजिक अंतर, मास्कचा वापर करून कोरोनावर नियंत्रण आणता येऊ शकते. सर्व आमदार, मंत्री, डॉक्टर, परिचरिका, आशा कार्यकर्त्या जीवाची पर्वा न करता कोरोना नियंत्रणासाठी काम करीत आहेत. अशा प्रसंगी आपण सुरक्षेबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. 60 वर्षांवरील व्यकती आणि लहान मुलांनी घरातच राहून सरकारला कोरोनाविरुद्धच्या लढय़ासाठी सहकार्य करावे, असे आवाहन येडियुराप्पा यांनी केले.

‘5 टी’चे पालन करणार

कोरोना नियंत्रणासाठी ‘5 टी’चे पालन करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. ट्रेस (शोध), ट्रक (पाठपुरावा), टेस्ट (चाचणी) ट्रिटमेन्ट (उपचार) आणि टेक्नोलॉजी (तंत्रज्ञान) यांचा अवलंब केल्यास कोरोना नियंत्रण लवकर शक्य आहे. यावर आपला विश्वास आहे. कोरोनाबाधिताच्या संपर्कात येणाऱया किमान 45 जणांची कोविड चाचणी केली जात आहे. त्याचप्रमाणे रुग्णांना खासगी इस्पितळांमध्ये दाखल करण्यासाठी येणाऱया अडचणीही दूर करण्यात आल्या आहेत. राज्यात 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच नाहीत. त्यामुळे त्यांनी कोविड केअर सेंटर किंवा घरामध्येच विलगीकृत व्हावे, असे त्यांनी सांगितले.

जनतेने घाबरू नये

कोरोना रुग्णांना बेड पुरविण्यासाठी केंद्रीकृत व्यवस्था करण्यात आली आहे. रियल टाईम डॅशबोर्ड तयार करण्यात आले आहे. कोरोना नियंत्रणासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जनतेने घाबरण्याची आवश्यकता नाही. 100 मधील 98 रुग्ण लवकर संसर्गमुक्त होऊन इस्पितळातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे कोणीही आत्महत्येचा प्रयत्न करू नये, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे.

कंटेन्मेट झोनमध्ये नियम कडक

बुधवारपासून बेंगळूरमध्ये लॉकडाऊन राहणार नाही. राज्यात यापुढे पुन्हा लॉकडाऊन जारी केला जाणार नाही. मात्र कंटेन्मेट भागात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

लखीमपूर हिंसेवरून संसदेत मोठा गोंधळ

Amit Kulkarni

मेक इन इंडियाची कमाल, 6 पट वाढली शस्त्रनिर्यात

Patil_p

‘अग्निपथ’वर संरक्षण सल्लागार समितीची बैठक

Patil_p

अत्याचार पीडितेची ओळख जाहीर करणे चुकीचे

Patil_p

देशाला चौथी लस मिळण्याची अपेक्षा

Patil_p

प्रदूषणरहित इंधनाचा वापर करणार रेल्वे

Patil_p
error: Content is protected !!