Tarun Bharat

राज्य कबड्डी स्पर्धांचा वाजला बिगूल

राज्य असोसिएशनकडून तारखा जाहीर, सांगली, नाशिक, जळगावमध्ये होणार स्पर्धा

संग्राम काटकर/कोल्हापूर

लॉकडाऊनपासून बंद ठेवलेल्या कबड्डी स्पर्धांच्या धडाक्याला प्रारंभ होत आहे. राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह ऍड. अस्वाद पाटील (रायगड) यांनी मुंबईतील कार्यकारिणीच्या बैठकीत सांगली, जळगाव आणि नाशिकमध्ये राज्य कबड्डी स्पर्धांच्या तारख्या जाहीर केल्या आहेत. किशोर-किशोरी, कुमार-कुमारी आणि महिला व पुरुष अशा सहा गटांत या स्पर्धा होतील. त्याची माहिती कळताच कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनने वरील तिन्ही ठिकाणच्या स्पर्धांमध्ये जिल्हा संघ दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. संघ निवड चाचण्यांची जबाबदारीही क्रीडा संघटनांवर सोपवली आहे. त्यामुळे कबड्डीपटूंना चाचण्याच्या तारखांवर लक्ष ठेवत सराव गतिमान करावा लागणार आहे.

मार्च महिन्यात कोरोनाला रोखण्यासाठी कबड्डीची मैदाने सरावासाठी बंद ठेवली होती. कबड्डी खेळताना खेळाडूंचा क्षणाक्षणाला बॉडी कॉन्टॅक्ट होत असतो. एखादा जरी खेळाडू कोरोना वाहक निघाला तर संघातील कबड्डीपटूंसह संघ पदाधिकारी व प्रशिक्षकांना कोरोनाची बाधा होईल याची भीती होती. अशा परिस्थितीतही सरावात खंड पडू नये यासाठी शिरोली येथील एकविरा कबड्डी ऍपॅडमीचे प्रशिक्षक दीपक पाटील यांनी सहा महिने राज्यभरातील कबड्डीपटूंना ऑनलाईन प्रशिक्षण दिले. अनेक कबड्डपटूंनी तर रोज घराबरोबरच मोकळ्या माळावर जाऊन कबड्डीचा वर्कआऊट करत स्वतःला फिट ठेवण्यावर भर दिला होता. सुदैवाने ऑक्टोबरमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी होत गेल्याने नोव्हेंबरपासून बंद ठेवलेली मैदाने टप्प्या-टप्प्याने सरावासाठी खुली करण्यास मान्यता दिली. त्यामुळे घरात सराव करणाऱया कबड्डीपटूंनी कोरोनानंतर होणाऱया राज्य कबड्डी स्पर्धांमध्ये खेळण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर मैदानातील सरावाला वेग घेतला. सराव करत अधिकृतपणे स्पर्धा केव्हा सुरु होतील, याचीही प्रतिक्षा केली जात होती. आता मात्र प्रतिक्षा संपली आहे. मार्च व एप्रिल महिन्यात स्पर्धा होतील, असे जाहीर झाल्याने कबड्डीपटूंना  स्पर्धांमध्ये सरावाचे चीज करण्याची संधी चालून आली आहे.

सर्वात पहिली राज्यस्तरीय किशोर-किशोरी कबड्डी स्पर्धा 5 ते 8 मार्च दरम्यान जळगावात होत आहे. स्पर्धेत महागाव (गडहिंग्लज) येथील केदारी रेडेकर फाऊंडेशन जिल्हा संघ दाखल करणार आहे. त्यासाठी फाऊंडेशनकडून आयोजित केल्या जाणाऱया संघ निवड चाचणीत 16 वर्षाखालील व 55 किलो वजनाच्या मुला-मुलांनी भाग घेता येणार आहे. दुसरी स्पर्धा सिन्नर (नाशिक) येथे 25 ते 28 मार्च दरम्यान राज्यस्तरीय महिला व पुरुष कबड्डी स्पर्धा होत आहे. स्पर्धेत अनाजे (ता. राधानगरी) येथील युवा स्पोर्टस् क्लब जिल्हा संघ दाखल करणार आहे. लवकरच क्लबकडून संघ निवड चाचणीचे आयोजन केले जाईल. यात 85 किलो वजनाच्या पुरुष आणि 75 किलो वजनाच्या महिला भाग घेता येईल. 4 ते 7 एप्रिल दरम्यान सांगलीत राज्यस्तरीय कुमार-कुमारी कबड्डी स्पर्धा होईल. गुडाळ (ता. राधानगरी) येथील गुडाळेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन केले जाणार आहे. यात 20 वर्षाखालील आणि 70 वजनाच्या मुलांना व 65 वजनाच्या मुलींना भाग घेता येईल.  

खेळाडूंकडून माफीनामे घेतले आहेत...

कोरोना काळात शासन व राज्य कबड्डी असोसिएशनच्या नियम अटी धुडकावून लावत 4 ते 5 कबड्डी स्पर्धांचे आयोजन झाले. त्यांची जिल्हा कबड्डी असोसिएशनचने गंभीर दखल घेत जे कबड्डीपटू स्पर्धांमध्ये खेळले होते तसेच ज्यांनी पंचगिरी केली होती, त्यांच्यावर सहा महिने बंदी घालण्याचे पाऊल उचलले होते. पण त्यांच्या करिअरचा विचार करून जिल्हा कबड्डी असोसिएशनने बंदी मागे घेतली. तसेच खेळाडू व पंचांकडून माफीनामे घेत त्यांना जिल्हा संघ निवड चाचण्यांमध्ये भाग घेण्यास अनुमती दिली असल्याचे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह प्रा.संभाजी पाटील यांनी सांगितले.

Related Stories

सुरुपलीत गॅस सिलेंडरचा स्फोटात घर जळून खाक

Archana Banage

कर्नाटक : पावसामुळे निर्यातीक्षम कॉफीचे अतोनात नुकसान

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : 676 जणांची कोरोना तपासणी, नवे रूग्ण 3, कोरोनामुक्त 3

Archana Banage

प्रभाकर उर्फ बाबा सावंत यांचे निधन

Archana Banage

कोल्हापूर : शिक्षक बँकेला 2.60 कोटींचा नफा

Archana Banage

कोल्हापूर : चित्रकारांचे आर्थिक चक्रच थांबले

Archana Banage