ऑनलाईन टीम / मुंबई :
तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न राज ठाकरे यांना नुकताच विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असे उत्तर दिले होते. त्यावरून आता उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारण हे आपले आपण करायचे असते. राजकारणात परमेश्वरावर विसंबून राहणाऱ्या व्यक्तीला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंना लक्ष्य केले आहे.
परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. त्यामुळे अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलेे आपण करायचेे असतेे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या या टीकेला ‘मनसे’कडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांना भविष्यात शिवसेना-मनसे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे यांनी ‘परमेश्वराला ठाऊक’, असे उत्तर दिले होते. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा सवाल करण्यात आला. तेव्हा, म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असे म्हणालो, अशी हजरजबाबी प्रतिक्रियाही राज यांनी दिली होती.