Tarun Bharat

राणी चन्नम्मा नगरातील रस्त्यांची झाली वाताहत

प्रतिनिधी/ बेळगाव

स्मार्ट सिटी योजनेमध्ये ठराविक भागाचाच समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांचा विकास किंवा अन्य सुविधा उपलब्ध होणार नाहीत. योजनेमध्ये राणी चन्नम्मानगर, उद्यमबाग औद्योगिक वसाहतीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे अधिकृत वसाहत म्हणून ओळखली जाणारी राणी चन्नम्मानगर वसाहत विविध समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. हा परिसर कधी स्मार्ट होणार, असा प्रश्न येथील रहिवासी करीत आहेत.

स्मार्ट सिटी योजनेमध्ये शहराची निवड होण्यापूर्वी मुख्यमंत्री शहर विकास अनुदानांतर्गत शहराच्या विकासासाठी 400 कोटांचे अनुदान मंजूर करण्यात आले. मात्र, या अंतर्गत शहरवासीयांना आवश्यक असलेली कोणतीच विकासकामे राबविण्यात आली नाहीत. रस्त्यांचे डांबरीकरण, गटारींचे बांधकाम आदींकरिता निधीचा विनियोग करण्यात आला. या अंतर्गत काही रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र टिकावू आणि दर्जेदार विकासकामे राबवून समस्यांचे निवारण करण्याच्यादृष्टीने कोणतीच विकासकामे राबविण्यात आली नाहीत. काही निधीअंतर्गत नाल्यांचे बांधकाम करण्यात आले. या निधीअंतर्गत काही भागात क्रीडा उपयोगी मैदाने निर्माण करण्यात आली. जलतरण तलाव, उद्याने निर्माण करण्यात आली. पण नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्षच झाले आहे. मंजूर झालेल्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग करून स्मार्ट शहर निर्माण करता आले असते. मात्र दक्षिण आणि उत्तर विभागाकरिता निधीच्या वाटपावरून वाद निर्माण झाल्याने योग्य प्रकारे आराखडा तयार करून निधीचा विनियोग करता आला नाही. त्यामुळेच शहर आणि उपनगरांत विविध समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. बाजारपेठेत पार्किंगच्या सुविधा नाहीत. उपनगरांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी उद्यानांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे 400 कोटींच्या निधीमधून शहरामध्ये कोणता विकास राबविला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या निधीचा विनियोग व्यवस्थित झाला नसल्याने राणी चन्नम्मानगर आणि उद्यमबाग औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यांची वाताहत झाली आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत टिळकवाडीसह श्रीनगर परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांचा विकास केला जात आहे. मात्र, या योजनेमध्ये राणी चन्नम्मा नगरसारख्या अधिकृत वसाहतीचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे परिसरातील रस्त्यांचा विकास कधी होणार, असा मुद्दा राणी चन्नम्मानगर परिसरातील रहिवासी करीत आहेत. राणी चन्नम्मानगर येथील पहिला स्टेज, दुसरा स्टेजसह पार्वतीनगर, जैतनमाळला जोडणारे रस्ते आणि उद्यमबाग औद्योगिक वसाहतीला जाणाऱया रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या भागातील एकही रस्ता सुस्थितीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही रस्त्यांवर तर चिखल झाल्याने वाहनधारकांना ये-जा करणे कठीण बनले आहे. येथील प्रमुख रस्ता म्हणून ओळखला जाणाऱया रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरुप आले आहे. राणी चन्नम्मानगर येथून भवानीनगर, कावेरीनगर या भागातही जाता येते. पण रस्त्यांची दुरवस्था पाहता येथील रहिवाशांना नकोसे वाटत आहे. जलवाहिनी, विद्युत वाहिन्या आणि डेनेजची जोडणी करण्यासाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आल्याने सर्वत्र चरी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे दुर्दशा झालेल्या रस्त्यांवरून ये-जा करताना वाहनधारकांना अक्षरश: नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पार्वतीनगरपासून काँग्रेस रोडला पोहोचेपर्यंत दुचाकी वाहनचालकांचे आणि त्यांच्यासोबत असणाऱयांचे कंबरडेच मोडत आहे, इतकी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. दुचाकी वाहने नादुरुस्त होत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. येथील रिक्षा थांब्याजवळ भलेमोठे खड्डे पडले असून, रात्रीच्या वेळी अपघात घडत आहेत. संपूर्ण रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या परिसरातील कचऱयाची उचलही वेळेवर केली जात नाही. त्यामुळे पार्वतीनगर परिसरात कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. परिणामी नागरिकांना आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. राणी चन्नम्मानगर येथे निर्माण करण्यात आलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. काही वर्षांपूर्वी उद्यानाचा विकास करून विविध प्रकारची झाडे, लहान मुलांना खेळण्याचे साहित्य बसविण्यात आले होते. काही पक्षी आणि प्राण्यांचे पुतळे तयार करून उद्यानात ठेवण्यात आले होते. संपूर्ण उद्यान हिरवेगार करून नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. मात्र, सध्या उद्यानाची पूर्णत: दुरवस्था झाली असून, फिरण्यासाठी असलेले फुटपाथ मोडकळीस आले आहेत. त्यामुळे शहर स्मार्ट होत असताना अधिकृत वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱया राणी चन्नम्मानगर येथील रस्ते मात्र खेडेगावाप्रमाणे बनले आहेत. त्यामुळे येथील रस्ते कधी स्मार्ट होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. येथील रस्ते, उद्याने आणि अन्य समस्यांकडे महापालिका प्रशासन आणि अधिकाऱयांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. राणी चन्नम्मा नगरमधील रस्त्यांची दुरुस्ती करून हा परिसरदेखील स्मार्ट बनविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.  

Related Stories

खानापूरमधील ‘त्या’ शाळकरी मुलांच्या मृत्यूने हळहळ

Amit Kulkarni

हलगा-मच्छे बायपाससाठी पुन्हा हुकूमशाही

Amit Kulkarni

टाकीला चावी बसविण्याची मागणी

Amit Kulkarni

बैलूरसह परिसरात नियमित बस सोडा

Amit Kulkarni

मनपाच्या धर्तीवर कॅन्टोन्मेंटही राबविणार योजना

Amit Kulkarni

विमानतळावर बसविण्यात आली अत्याधुनिक साहित्य तपासणी यंत्रणा

Patil_p